Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विकेंद्रीकरणावर भर देत तालुकास्तरीय गावांच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6

मुंबई दि ७ :- शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येत असून ‘ट्रान्स हार्बर’ सारख्या प्रकल्पांमुळे तिसरी मुंबई वेगाने साकारली जात आहे. यापुढील काळात ‘इज ऑफ लिव्हिंग’ महत्त्वाचे ठरणार असल्याने योग्यवेळी विकेंद्रीकरणावर भर देऊन आता तालुकास्तरीय गावांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या इंग्रजीतील पुस्तकाचा लेखक श्री.सत्यजीत तांबे यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, आमदार प्रवीण दरेकर, ॲड. आमदार यशोमती ठाकूर, आमदार अमरिश पटेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष चौहान, गौर गोपाल दास, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकांना काय हवे आहे याची गाथाच ‘सिटीझनविल’ या पुस्तकाद्वारे उलगडण्यात आली आहे. आज आपण डिजिटल क्रांतीच्या युगात आहोत. बदलत्या तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. लोककल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक वाढवण्याची आवश्यकता असून या तंत्रज्ञानाचा उपयोग शहरे अधिक विकसित करण्यासाठी केला पाहिजे. ‘स्पीड ऑफ डेटा’ आणि ‘स्पीड ऑफ ट्रॅव्हल’ यामुळेच यापुढील काळात अधिक वेगाने प्रगती करता येणे शक्य होणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

गतिशक्ती योजनेत विविध विभागांचा डाटा विविध स्तरावर एकत्रित करण्यात येत आहे. यामुळे अधिक चांगले नियोजन करता येणार असून हे नियोजन अधिक वेगानेही करता येईल, असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

शहरीकरणाचे योग्य व्यवस्थापन आवश्यक

शहरीकरणासंदर्भात श्री फडणवीस म्हणाले, जगाच्या आजपर्यंतच्या विकासात शहरीकरण व स्थलांतरे ही अटळ बाब ठरली, मात्र ज्या देशांनी याचे योग्य व्यवस्थापन केले त्यांनी प्रगती केल्याचे आपण पाहतो.

साठ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) शहरांमधून निर्माण होतो, त्यामुळे शहरे बकाल होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. शेतीला सेवा क्षेत्राशी जोडण्याची आवश्यकता आहे.

राजकारण व समाजकारण क्षेत्रातील सर्वानीच स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. विविध विषयांचा खोलवर अभ्यास केला पाहिजे. लोकांना आपली मते मांडण्यासाठी ‘आपले सरकार’ हा प्लॅटफॉर्म तयार केला, याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, शहर विकासाच्या संदर्भात ‘सिटीझनविल’ हे पुस्तक मार्गदर्शक आहे. शहरे आता मोठ्या प्रमाणावर बदलत असून यातील जटील समस्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सोडविण्यावर भर दिला पाहिजे. समस्यांवर मात करण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता असल्याचे श्री थोरात यांनी सांगितले.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आशीष चौहान म्हणाले, तंत्रज्ञानामुळे आज सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असून देशवासीयांनी या बदलांना सामोरे जाण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे.

गौर गोपाल दास म्हणाले, नवी संकल्पना आत्मसात करण्यासाठी आपण नेहमी मोकळ्या मनाने आणि विनम्रतेने सज्ज असले पाहिजे. सारग्राही वृत्ती जोपासणे आवश्यक असून व्यक्तिविकासातूनच समाज विकासाची वाटचाल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लेखक सत्यजित तांबे म्हणाले, ‘सिटीझनविल’ हे पुस्तक वाचल्यानंतर यातील संकल्पना आपल्या देशात आणि राज्यात कशा राबवता येतील याची इच्छा निर्माण झाली. शहरांचा विकास या संकल्पनेत आता अनेक पैलू समाविष्ट झाले आहेत. लोकसहभागातूनच यापुढील काळात विविध आव्हाने पेलता येणे शक्य होणार असल्याचे श्री तांबे यांनी सांगितले.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे म्हणाले, क्रिकेटसह विविध क्रीडा प्रकारात आता चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. प्रत्येक नागरिकांने आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन श्री रहाणे यांनी केले.

सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्कर्षा रुपवते यांनी केले.

 

———-0000———–

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.