Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सत्यशोधक कार्याचा रथ पुढे नेण्याचे कार्य मुकुंदरावावर होते. ते तेवढ्याच निष्ठने व जोमाने पुढे नेणे गरजेचे होते. आर्थिक व सामाजिक पातळीवरील अन्याय शेतकरी पिढ्यानपिढ्यापासून निमूटपणे सहन करत होते. शिक्षणाच्या अभावामुळे कष्टकऱ्याचे व शेतकऱ्याचे वाढत जाणारे दारिद्र्य, सक्तीचे धार्मिक संस्कार, सामाजिक रूढीपरंपरा, सरकार, सावकार, सरकारी नोकरशाही, जमीनदार व प्रस्थापित धर्मरक्षकांकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी मुकुंदराव यांनी दीनमित्र’ या नियतकालिकातून शोषितांचे शोषण रोखण्यास आपली लेखणी अविरतपणे कार्यरत केली. त्यांच्या लेखणीचा मुक्त संचार बंदिस्त विचारांची पेरणी करणाऱ्या सनातन्यांना धोक्याचा वाटत होता. प्रस्थापित विचारांना शह देणारा कोणताही सत्यशोधक विचार, विज्ञाननिष्ठ असल्यामुळे पूर्णपणे तो तात्विक निष्कर्षावर आधारित होता का? प्रश्नाचे उत्तर शोधून कार्यकारणभाव विशद करणाऱ्या सत्यशोधक विचारांची बैठक तत्वनिष्ठ होती. त्यामुळे ‘बाबा वाक्यम प्रमाणम’ हा मंत्र सत्यशोधक विचारला कधीही मान्य होणारा नव्हता.
घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांवर अन्याय होत कामा नये. त्यांचे संघटन होणे गरजेचे, आपल्या न्याय हक्कासाठी श्रमिक जागा झाला पाहिजे. संघटनशक्तीचे महत्व कष्टकऱ्यांच्या मस्तकापर्यंत पोहचले पाहिजे. ‘आपल्या धडावर आपलेच शीर असले पाहिजे’ हा विचार मना मनात रुजविणे हे काम हिमालय पेलण्याइतकेच महान होते. शोषित आपल्या न्याय्य हक्कांविषयी जागरूक असेल तर लढा सोपा होतो, पण तो त्याच्या हक्कांविषयी अनभिज्ञ आहे. त्याच्या हक्कांची त्याला जाणीव नाही. जे काही माझ्या जीवनात घडते, त्यासाठी मी व माझे नशीब जबाबदार आहे. हा अंधश्रद्धाळू विचार तो सोडायला तयार नसेल तेव्हा शोषकाचे अधिक फावते. तो अन्याय करायला अधिक प्रमाणात धजावतो. त्यांचे प्रश्न सोडवणारा आपला न्याय दाता आहे हे शोषितांच्या लक्षात येत नाही. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक घटना पाप व पुण्याशी जोडली गेली आहे. पाप पुण्य कसे सिद्ध करायचे? हा संपूर्ण अधिकार धर्मरक्षकालाच होता. त्याच्या मनात सर्व तळागाळातील समाजा विषयी आस्था नाही, तरीही शोषितांचा विश्वास मात्र धर्मरक्षकांवर आहे. सत्यशोधकाची नवी न्यायव्यवस्था त्याला मान्य नाही. अंधश्रद्धेच्या व पंपरेच्या खाईत नेणाऱ्यास तो देव किंवा देवाचा वंशज समजतो, तेव्हा परिवर्तनाचा लढा जास्त बिकट होत जातो. हा अनुभव महात्मा फुलेंना आला, कृष्णराव भालेकर आणि मुकुंदराव पाटलांनाही आला. तरीही समाजागृतीचे कार्य हे निर्मिकाचे कार्य आहे, असे समजून जनजागृतीचा रथ प्रतिगामी विचारांच्या दलदलीत फसणार नाही. याची काळजी घेऊन ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य ध्यानी ठेवत निखाऱ्यावरुन वाट चाल करणे त्यांनी पसंत केले.
सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून पावणे दोनशे वर्षापासून धावणारा परिवर्तनवादी विचारांचा रथ प्रतिगामी शक्ती आजही मागे खेचताना दिसतात, याचे महत्वाचे कारण रुढीग्रस्त विचारांना संपूर्ण विरोध करणे आणि संपूर्ण पुरोगामी विचार स्वीकारणे हे आमच्या हिताचे कसे आहे? हेच आमच्या बहुजन समाजबांधवांना कळत नाही. भगिनींच्या देवभोळेपणाचा तर अधिक गैरफायदा घेतला जातो. तरीही वर्तमान स्थितीत सुशिक्षित महिलाही त्यातील वास्तवाचा विचार करायला तयार नाहीत. अंधानुकरण हा प्रकार आमच्या रोमारोमात भिनला आहे. वास्तववादी विचार मांडणारा कुटुंबप्रमुख वेडा ठरविला जातो. हे वास्तव आहे.
पुरोगामी विचार ऐकण्यास चार माणसे जमत नाहीत. प्रतिगामी विचार रुजविणाऱ्या स्थळी पाय ठेवायला जागा राहत नाही सर्व असेच होत राहिले तर सत्यशोधक विचारांचा पराभव होईल. याची जाण ठेऊन कृष्णराव भालेकरांच्या सहाव्या पिढीतही पुरोगामी विचारांची पेरणी सुरू आहे. तो दीपस्तंभ तेवत आहे. त्याचा शक्य होईल तेवढा प्रकाश समाजजीवनाला देणे सुरु आहे. जयंतीनिमित्ताने झालेल्या विचारांच्या प्रगटीकरणातून सत्यशोधक विचाराने भारावलेला जनसमूह पहावयास मिळाला. प्रत्येक वक्त्यांच्या विचारला वास्तवाची किनार होती. अबाल वृद्ध श्रोतावर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. यावरून फक्त तिसरी उत्तीर्ण असलेल्या मुकुंदराव पाटलांची प्रगल्भता व जिद्द किती मोठी होती, याची कल्पना आपणास येते. भावी पिढीत तो विचार रुजविण्यात ते किती यशस्वी झाले, याची आपणास खात्री पटते. मुकुंदरावांच्या पश्चात त्यांचे थोरले पुत्र दीनमित्रचे सहसंपादक माधवराव पाटील होते. त्यांनी हा वारसा पुढे अविरतपणे चालविला. सत्यशोधक समाजाचे २८ वे अधिवेशन तरवडीसारख्या लहान गावात घेऊन ते यशस्वी करून दाखविणे हे शिवधनुष्य पेलणे एवढे सोपे नव्हते.
सत्यशोधक उत्तमराव पाटील उर्फ नाना हे कृष्णरावांचे पणतू व मुकुंदराव पाटलाचे नातू, लौकिक अर्थाने शिक्षण फक्त इयत्ता नववी पण दीनमित्रकारांच्या नावाने या छोट्याशा गावात सुरू असलेल्या वाचनालयात पीएच. डी प्रबंधकारांसाठी त्यांनी किती साहित्य उपलब्ध करून ठेवले? अनेकांनी त्याचा उपयोग करून आपला प्रबंध पूर्ण केला. तो जास्तीस्त जास्त अभ्यासकांनी करून घ्यावा, यासाठी नानांचे सुरू असलेले प्रामाणिक प्रयत्न, शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीची १९९४ ला स्थापना केली.
सत्यशोधकांच्या विखुरलेल्या साहित्याचे एकत्रीकरण नानांनी केले. वडिलांकडून उपलब्ध असलेल्या ५७ संचयिका, त्याशिवाय वडील आजोबांकडून उपलब्ध होऊ शकणारे दुर्मिळ साहित्य, डॉ आंबेडकरांनी १९२७ ला मकुंदरावांना लिहिलेले पत्र, सत्यशोधक चळवळ पुढे नेत असताना मुकुंदरावावर झालेली केस, त्यानिमित्ताने मी काय मदत करू शकतो? असं म्हणत बाबासाहेबांनी पुढे केलेला मदतीचा हात. वाचनालयात भेट द्यायला आलेल्या प्रत्येकाजवळ वाचनालयात असलेल्या दुर्मिळ साहित्याचा उपयोग संशोधना साठी संशोधकांनी घ्यावा यासाठी असणारी नानांची प्रामाणिक तळमळ, पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू असताना प्रत्येक ठिकाणी नानांचे लक्ष, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची विचारपूस, स्वागत, यासाठी अत्यंत दक्ष, वयाच्या ८७ व्या वर्षीही हातात काठी न घेता सर्व कामेअतिशय तत्परतेने करण्याच्या त्यांच्या मानसिकतेवरून युवकांनी कोणता आदर्श घ्यावा ? दीनमित्रकार मुकुंदराव पाटील विद्यालयात पुरस्कार वितरण सोहळा पार पडावा आणि त्यात सहभागी होता यावं, हे माझं परमभाग्य सर्व सोहळा पार पडेपर्यंत सेवा देण्यासाठी दक्ष असलेले शिक्षक, विद्यार्थी पाहिल्यावर सकारात्मक विचार आणि संस्कार घेऊन जगणाऱ्या युवापिढ्या या ज्ञान मंदिरातून निर्माण झाल्या आणि होतील या विषयी संपूर्ण विश्वास वाटतो.
राज ठाकरेंच्या पुण्यातल्या व्याख्यानाकडे राज्याचे लक्ष, आज ‘नवं काहीतरी’ बोलणार
सत्यशोधक चळवळीवरील त्यांची असीम निष्ठा लक्षात घेऊन सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद गेवराई जि बीड येथे २०१० ला नानांकडे सुपूर्द करण्यात आले. ती जबाबदारी त्यांनी अत्यंत निष्ठेने दोन वर्षे पार पाडली. कर्मयोगी व्यक्तीला तसे पाहता पदाची काहीही गरज नसते. पद हे एक निमित्त असते. ते असले तरी चालते, नसले तरी चालते, पण जेव्हा अतियोग्य व्यक्ती ते पद स्वीकारतात तेंव्हा त्या पदाचे मूल्य वाढते. सतत कार्य करणाऱ्या व्यक्तीला पदाची कवचकुंडले नकोच असतात.
वर्ल्डकप जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्या भारतानं पाहा केलं तरी काय? विराटनंतर झाली बिकट अवस्था
आजही सत्यशोधक चळवळीत ते कार्यरत आहेतच. तिथे पदभाराची त्यांना गरज वाटत नाही. नानांचे चिरंजीव यशवंत पाटील आणि युवा नातू मुकुंद यशवंत पाटील सातत्याने या चळवळीत सक्रिय झालेले आहेत, म्हणजेच आता कृष्णराव भालेकरांची सहावी पिढी सत्यशोधक चळवळीत सक्रिय झाली आहे.
बाबा आमटेंची चौथी पिढी महारोग्यांच्या सेवेत सक्रिय झाल्याचे मला माहित होते. पण, एखादी विचारधारा धरून कृतीपर मार्गक्रमण करणारी सहावी पिढी तेवढ्याच निष्ठेने कार्यरत असल्याचे या निमित्ताने मला कळाले. जो विचार माणूस घडविणारा आहे. वैचारिक गुलामगिरी तून त्याला मुक्त करणारा आहे. माणसाचा उत्कर्ष नेमका कशात आहे, हे सांगणारा आहे. तो विचार एका पिढीतून पुढच्या पिढीत असा नैसर्गिकपणे संक्रमित होत जातो. जेष्ठांच्या अनुकरणाचे सहजगत्या जिथे अनुसरण होते. तिथे खऱ्या अर्थाने नतमस्तक व्हावेसे वाटले पाहिजे. आधुनिकीकरणाच्या नावाखाली पूर्वजांचे सद्गुण, त्यांची पुण्याई विसरून तंत्रशिक्षण घेणाऱ्या यांत्रिक पिढ्या जेष्ठांचा सन्मान करणे विसरून चालल्या आहेत. या पिढ्यातील नवोदितांना जुन्यातील सोनं पोहचविण्याच कार्य नानांचा परिवार करत आहे. त्या परिवारापासून माझे युवक मित्र काय धडा घेतील?
प्रा. वसंत गिरी ९०११२२९२३२
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील: प्रबोधनाच्या पहाटेचा एक देदीप्यमान तारा