Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भारतीय वन्यजीव संस्थेद्वारा तांत्रिक सहकार्याने केल्या जाणाऱ्या वार्षिक अभ्यासानुसार कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे चौथ्या टप्प्याच्या प्रगणनेचा अहवाल बघता २०२० नुसार ताडोबा बफर व कोअर क्षेत्र मिळून ८५ वाघ दिसून आले आहेत. येथे २०१० मध्ये १७ वाघांचे अस्तित्व दिसून आले होते. पण त्यानंतर ताडोबाला बफर झोनचे कवच मिळाले. परिणामी ताडोबा विस्तारले गेले. त्यानंतर २०१२ मध्ये ४९ वाघ दिसून आले. ही मोठी उपलब्धी मानली गेली. २०१२ पासून २०१५ पर्यंत ताडोबातील व्याघ्रसंख्येत उत्तरोत्तर मोठी वाढ दिसत होती. मात्र मागील काही वर्षात त्यास लगाम लागला असून ती संख्या स्थिर असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी ताडोबात वाघांची १०० चौरस किमीला ५.२९ घनता होती. त्यात वाढ झाली असून ती ६.५८ घनता झाली आहे.
राज्यात सर्वाधिक वाघांची नोंद ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लॅन्डस्केपमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण क्षेत्र व अन्नसाखळी बघता यापुढे ताडोबातील व्याघ्रवाढीला ब्रेक लागू शकतो. तृणभक्षी प्राण्यांची संख्या मुबलक असल्यानेच ताडोबात व्याघ्रवाढ दिसून आल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. पण आता व्याघ्रवाढ अवघड वाटते कारण संख्या वाढल्यास झुंजीच्या घटना वा मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडू शकतील अशी भीती भारतीय वन्यजीव संस्थेचे वरिष्ठ संशोधक डॉ. वाय.व्ही. झाला यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.
वन्यजीवांना मिळणार मोकळा अधिवास
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी पूर्ण व कोळसा अर्धे गाव प्रकल्पाबाहेर जायचे आहे. या गावातील जमीन वळती करण्याचा प्रश्न बाकी असून तो लवकरच सोडविला जाण्याचे संकेत आहेत. तेव्हा ही दीड गावे बाहेर गेल्यास ताडोबाचे क्षेत्र मोठे होणार आहे. परिणामी ही प्रक्रिया झाल्यास ताडोबात वन्यजीवांना मोकळा अधिवास मिळेल. त्यानंतरच्या पुढील काही वर्षात अन्य वन्यजीवांसोबत वाघांच्या संख्येत आणखी वाढीची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
देशात ७ महिन्यांत ८४ वाघांचा मृत्यू
जागतिक स्तरावर सुमारे ८० टक्के वाघ असणाऱ्या भारतात मागील ७ महिन्यात ८४ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील सर्वाधिक २७ वाघ हे मध्य प्रदेशात, महाराष्ट्रात १९ ,तर कर्नाटकात १२ वाघांचा मृत्यू झालेला आहे. त्यात ९ शिकारीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, व्याघ्र प्रकल्पात ४३ वाघांचा मृत्यू झालेला असून उर्वरित वाघांचा मृत्यू हा व्याघ्र प्रकल्पाबाहेर झाल्याने हा चिंतेचा विषय मानला जात आहे.