Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई, दि. १९ : बृहन्मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या आणि मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास वेगवान करणाऱ्या मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ (टप्पा-२) या मार्गिकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.
दरम्यान मुंबई-१ कार्ड आणि मेट्रो अॅप एनसीएमसी कार्डचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्थानक येथे मेट्रो प्रकल्पाच्या छायचित्रांचे प्रदर्शन आणि थ्रीडी आराखड्याची पाहणी केली. आणि मेट्रो स्टेशनवर स्वतः मेट्रोचे तिकीट घेऊन गुंदवली मेट्रो स्टेशन ते मोगरा मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास केला.
सुलभ वाहतुकीसाठी दोन स्मार्ट उपक्रम “मुंबई १” मोबाईल ॲप आणि एनसीएमसी
मुंबई १” मोबाईल अॅप : या ॲपमध्ये प्रवाशांसाठी मेट्रो संबधित सर्व आवश्यक माहिती देण्यात आली आहे.तसेच मेट्रो स्थानकावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी जे दरवाजे आहेत तिथे असलेल्या ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन पॉइंटवरून प्रवाशांना प्रवेश करता यावा यासाठी मोबाईल फोनवर हा ॲप एक क्यूआर कोड तयार करतो.
एनसीएमसी कार्ड
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) हे सुरूवातीला एमएमआरडीव्दारे चालवण्यात येणा-या मेट्रो कार्डवरती वापरल जाणार आहे.नंतर हळूहळू ही सुविधा लोकल ट्रेन्स आणि बसेससह सार्वजनिक वाहतूकीच्या इतर पर्यायांसाठी विस्तारीत करण्यात येणार आहे.डिजिटल व्यवहारासाठी या कार्डमध्ये १०० रूपये ते दोन हजार रूपयापर्यंत या कार्डला रिचार्ज करता येणार आहे.
मुंबई मेट्रो २ अ आणि ७ ची वैशिष्टयै
वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.पर्यावरणस्नेही मेट्रो नेटवर्क मुंबईकरांना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे
मेट्रो २ अ दहिसर पूर्व ते डीएन. नगर. ६४१० कोटी रूपयांचे १८.६ किमी मार्गिका असून १७ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.
मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व- दहिसर पूर्व) रूपये ६२०८ कोटी खर्चासह १६.५ कि.मी मार्गिका असून १३ स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांची किंमत जवळपास १२ हजार ६१८ कोटी आहे.
मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या टप्पा २ मधील स्थानके
मेट्रो लाईन-२अ- टप्पा-२
वळनई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी (पश्चिम).
मेट्रो मार्ग ७- टप्पा- २
गोरेगाव (पूर्व), जोगेश्वरी (पूर्व), मोगरा, गुंदवली.
वरील दोन्ही मेट्रो मार्गांसाठी दहिसर पूर्व हे संयुक्त स्थानक आहे.
मेट्रो मार्ग २अ- टप्पा- १
दहिसर (पूर्व), आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर- I.C. कॉलनी, एकसर, बोरिवली (पश्चिम), पहाडीएकसर, कांदिवली (पश्चिम), डहाणूकरवाडी.
मेट्रो मार्ग ७- टप्पा- १
दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे या स्थानकांचा समावेश आहे.
एकात्मिक मेट्रो मार्गिका
पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने एकमेव सर्वसमावेशक मुंबई मेट्रो नेटवर्कच स्वप्न बघितल होते ते प्रत्यक्षात उतरल्यामुळे गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.पर्यावरणस्नेही मेट्रो नेटवर्क मुंबईकराना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे
यामध्ये मुंबई मेट्रो मार्ग २अ (दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो मार्ग ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, म्हणजेच अंधेरी पूर्व) आता पूर्णपणे कार्यान्वित झाली असून मेट्रो मार्ग १ सह एकात्मिक केली आहे. दहिसर किंवा गोरेगाव ते घाटकोपर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे
रोलिंग स्टॉक
मेट्रो २ अ आणि मेट्रो लाईन 7 अनअटेण्डेड ट्रेन ऑपरेशनसाठी (युटीओ) विनाचालक ट्रेन विकसित करण्यात आल्या आहेत. सहा डबे असलेल्या ट्रेनची प्रवासी क्षमता २३०८ इतकी आहे. या ट्रेनची डिझाइन केलेला ताशी वेग ९० कि.मी. असून क्रियात्मक वेग ताशी ८० कि.मी. आहे. तर सरासरी वेग ताशी ३५ किमी आहे.स्थानकाची माहिती देण्यासाठी ऑटोमॅटिक पेसेंजर अनाऊन्समेण्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे.तसेच प्रत्येक दरवाज्यावर स्टेशनची माहिती देणारे डिजिटल रूटमॅपही आहेत.
सुरक्षा यंत्रणा
सर्व स्थानकावर बॅगेज स्कॅनिंग मशीन, हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहे.
रूफ टॉप सोलार सिस्टिम
मेट्रो स्थानकावर रूफ टॉप सोलर सिस्टिमने सुसज्ज करण्यात येणार आहेत. ती रेस्को मॉडेलवर आधारित योजना आहे. स्थानक, डेपो आणि मागाठणे आरएसएस बिल्डिंगच्या छतावरची उपलब्ध जागा सोलार सिस्टिम बसवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग ७ वरची स्थानक आणि संबंधित इमारतींवर बसवण्यात येणाऱ्या सोलार सिस्टिमची एकूण अंदाजित वीज निर्मिती क्षमता ३.० मेगावॅट – पीक एवढी असेल. सोलार सिस्टिमद्वारे निर्माण झालेली वीज स्थानकाच्या सहाय्यक भारांवर स्थानिक पातळीवर वापरली जाईल.
दिव्यांगासाठी सुविधा
दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांवर व्हीलचेअर, ब्रेलसह लिफ्ट बटणे आणि प्लॅटफॉर्मवर टॅक्टाइल टाइल्स आहेत जे दृष्टिहीन लोकांसाठी दिशादर्शक म्हणून काम करतील.
सार्वजनिक माहिती प्रणाली
प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व स्थानकांवर सार्वजनिक घोषणा आणि माहिती प्रदर्शित करणारी यंत्रणा देण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, सिग्नलींग, एस्कलेटर्स या सुविधाही करण्यात आल्या आहेत.
मेट्रो मार्ग ७ वरच्या स्थानकांना आयजीबीसीच ‘प्लॅटिनम ‘ मानांकन
पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरण संवर्धनाला महत्व देण्यात आले आहे.मेट्रो मार्ग ७ वरच्या १० मेट्रो स्थानकांना ‘आयजीबीसी’ तर्फे ‘प्लॅटिनम ‘ दर्जाचे मानांकन देण्यात आलं आहे. जोगेश्वरी (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान आणि ओवारीपाडा अशी या स्थानकाची नाव आहेत. आयजीबीसीच्या ‘ग्रीन मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम रेटिंग प्रोग्राम’ नुसार स्थानकाच मूल्यांकन करण्यात आले आहे. आयजीबीसीच्या मानांकन अहवालामध्ये मेट्रो मार्ग ७ साठीची पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी)ची अंमलबजावणी करण्यात आली आहे.आयएसओ १४००१ च्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केले आहे.
प्रवाशांची सुविधा व सुरक्षा
प्लॅटफॉर्म स्क्रिन डोअर्स (पीएसडी) ही मोटरव्दारे उघड बंद होणाऱ्या सरकत्या दरवाजांची अत्याधुनिक प्रणाली आहे. मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्म्सचं संरक्षण करण्यासाठी आणि मेट्रोमध्ये प्रवाशांच्या होणा-या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रणाली फार उपयुक्त ठरणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि दिव्यांग व्यक्तींनाही मेट्रोत सहज येता यावे म्हणून असे सरकते दरवाजे फार उपुयक्त आहेत.
000
काशीबाई थोरात/संध्या गरवारे/विसंअ/