Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘उजेड’ नावाचे गाव; महाराष्ट्रातील या गावात भरते आगळीवेगळी गांधी बाबाची जत्रा!

8

लातूर (युवराज पाटील) : ए मेरे वतन के लोगो.. जरा आंखो में भरलो पाणी.. जो शहिद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी… ह्या गाण्याचे बोल ऐकल्या नंतर डोळे भरून येतात… मनात कृतज्ञतेचा भाव दाटून येतो…अन सगळं वातावरण चैतन्याने भरून आणि भारून जातं… तो प्रसंग असतो, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे महाराष्ट्र दिन किंवा मराठवाड्यात १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन… हे दिवस आपण मोठ्या उत्साहात आणि कृतज्ञतेच्या भावनेनी साजरा करतो… पण असं एक गाव लातूर जिल्ह्यात आहे. त्या गावाचे नाव ‘उजेड’ आहे.

या गावात २४ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी बाबा यात्रा महोत्सव’ असतो. पाच दिवस हे गाव राष्ट्रप्रेमाने न्हाऊन निघतं. गावाला पूर्ण यात्रेचे रुप येतं. यात्रे निमित्त घरोघरी पावणे-रावळे येतात, लेकी बाळी येतात. २४ तारखेला महात्मा गांधीच्या मूर्तीची स्थापना होते. त्या दिवशी सर्व रोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर होते. येणारा प्रत्येक व्यक्ती मूर्तीला हार घालून नमस्कार करतो. गावात जागोजागी मिठाईचे दुकाने थाटली जातात. जेलबी तर क्विंटलने विकली जाते. अगदी यात्रेत दिसणारे वेगवेगळे रहाट पाळणे, स्पिकरवर देशभक्तीपर गीतं, एकूणच राष्ट्रप्रेमाच्या चैतन्याने बहरलेले असते.

ही परंपरा कशी आणि कधी सुरु झाली

गावातले लोकं सांगतात, स्वातंत्र्यपूर्व काळी गावात पीराची यात्रा भरायची १९४८ला हैदराबाद मुक्ती संग्रामातील पोलिसांच्या कारवाईनंतर ही यात्रा बंद झाली. १९५०ला देश प्रजासत्ताक झाल्यानंतर या गावातील लोकांनी एकत्र येऊन यात्रे बाबत मंथन केले. त्यातून गावात पुन्हा यात्रा सुरु करायची तर मग कोणाच्या नावाने… सर्वांना मान्य असलेले नाव ठरले महात्मा गांधी आणि तारीख ठरली २६ जानेवारीचा आठवडा… अन् नाव ठरले “महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सव”, त्यानुसार २६ जानेवारी १९५१ पासून या आगळ्या वेगळ्या यात्रेला सुरुवात झाली.

त्यावेळी गावचे पहिले सरपंच शिवलिंग स्वामी, त्या काळातील गावची असामी चांद पटेल, रामराव रेड्डी, गोविंद मास्तर, माधवराव जाधव, विश्वंभरराव पाटील, अण्णाराव बिराजदार,गोविंदराव चिमनशेट्टे, व्यंकटराव ढोबळे, अंबादास जाधव या सर्व गावकऱ्यांनी ठरवले की, ना कोण्या देवाची, ना कोणा धर्माची, आपण लोकशाहीची यात्रा “महात्मा गांधी बाबांच्या नावाने २६ जानेवारीला सुरु करायची. तेव्हापासून करोना काळातील दोन वर्षाचा अपवाद सोडून सगळे गाव एकत्र येऊन वर्गणी गोळा करून ही जत्रा उत्साहाने पार पाडतात. गावात येणारा प्रत्येक माणूस महात्मा गांधीच्या मूर्ती समोर नतमस्तक होतो. यात्रेत जाऊन जिलेबी खातो. या यात्रेत ५० ते ६० क्विंटल साखरेची जिलेबी विकली जाते.

पाच दिवस असते कार्यक्रमाची रेलचेल

यावर्षीच्या यात्रा महोत्सवाची सुरुवात २३ जानेवारी रोजी ग्राम स्वच्छतेने झाले. २४ जानेवारी रोजी महात्मा गांधीच्या मूर्तीची स्थापना झाली, त्यानंतर सर्व रोग निदान व उपचार शिबीर, रक्तदान शिबीर झाले. बुधवार दि. २५ जानेवारी रोजी शालेय क्रीडा स्पर्धा व भजन ( दरवर्षी पशु चिकित्सा होते पण यावर्षी लंम्पिमुळे रद्द केल्याचे सांगितले.) २६ जानेवारी रोजी झेंडावंदन प्रभात फेरी, संगीत वाद्य गायन व बक्षीस वितरण, रात्री ९ वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम, २७ जानेवारीला जंगी कुस्त्याचे सामने, रात्री सेवालय संस्थेच्या वतीने हॅपी म्युझिक शो आणि ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त अभिवादन करून यात्रेचा समारोप होतो.

उजेड म्हणजे प्रकाश पेरणारे गाव..

लोकशाहीचा महोत्सव करणाऱ्या ८ हजार लोकसंख्या या गावात गेली ७१ वर्षे अविरतपणे अशी जत्रा भरते म्हटलं तर खरं वाटणार नाही. एकदा तरी अनुभव घ्या आणि गांधी बाबाच्या जत्रेला गेलेच पाहिजे अशी भावना अनेकांना वाटते. लातूर शहरापासून ६० किलोमीटर अंतराव उजेड (हिसामाबाद ) हे गाव येते. एक गाव लोकशाहीचा आनंदोत्सव गेली सात दशक साजरा करत आहे. ही यात्रा एक आगळावेगळा अनुभव आहे आणि आनंद देणारी गोष्ट आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.