Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इमर्जन्सी, अॅनिमल आणि बऱ्याच बॉलिवूड सिनेमांचं प्रदर्शन लांबणीवर,समोर आलं खरं कारण

15

मुंबई: प्रेक्षक आता जगभरातील असंख्य सिनेमे बघतात. त्यामुळे त्यांना हिंदी सिनेमांमध्येही उत्तम दर्जाच्या तांत्रिक बाबी बघायच्या आहेत. अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमावर प्रेक्षकांनी प्रदर्शनापूर्वी त्यातील व्हीएफएक्सवर सडकून टीका केली होती. त्यानंतर निर्मात्यांनी सिनेमाच्या व्हीएफएक्समध्ये काही बदल केले. या प्रकरणामुळे आता इतर सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक सावध झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता मोठ्या पडद्यावर अधिक चांगल्या दर्जाची कलाकृती पाहता येईल; अशी आशा व्यक्त केली जातेय.

हॉलिवूडचे एकापेक्षा एक सरस सिनेमे आगामी काळात प्रेक्षकांसमोर येत आहेत. या सगळ्यांत हिंदी सिनेमांच्या कथा आणि आशय-विषयांसाठी चर्चेत असल्या, तरी तंत्रज्ञानाचा मुद्दा येताच हिंदी चित्रपटांत आजही उणिवा असल्याचं दिसतं. प्रेक्षकांना आता ‘वर्ल्ड सिनेमा’ची सवय झाल्यानं या तांत्रिक उणिवा त्यांना खटकतात. आधी ‘ब्रह्मास्त्र’, मग ‘पठाण आणि त्यापाठोपाठ ‘भेडिया’ आणि अलीकडच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटांतले व्हीएफएक्स दर्जेदार असणं अपेक्षित असताना ते मोठ्या पडद्यावर हास्यास्पद वाटले; असं प्रेक्षकांचं मत आहे. हेच लक्षात घेता अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांचं प्रदर्शन लांबणीवर टाकलं आहे आणि ‘व्हीएफएक्स’वर नव्यानं काम सुरू केलंय.

रणबीरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ प्रेक्षकांना कसा वाटला?

आगामी ‘अॅनिमल’ हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता. रणबीर कपूर अभिनित या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आल्यानंतर त्याविषयी आणखी चर्चा होऊ लागली. ऑगस्ट महिन्यात या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या ‘गदर २’ आणि अक्षयकुमारच्या ‘ओएमजी २’बरोबर होणार असल्याचं चित्र होतं. मात्र, आता संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख डिसेंबरपर्यंत पुढं ढकलण्यात आलीय. व्हीएफएक्सचं काम पूर्ण झालं नसल्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकललं असल्याची चर्चा आहे. सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शकाला अधिक वेळ हवा आहे. दिग्दर्शक संदीप व्हीएफएक्समध्ये तडजोड करू इच्छित नाही. यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्यास उशीर होत आहे. रणबीरच्या या चित्रपटातला अ‍ॅक्शन सिक्वेन्स भव्य असल्याचं सांगण्यात येतंय. रणबीरचा ‘अँग्री मॅन’चा अवतारही प्रेक्षकांना आवडला आहे. एक डिसेंबर २०२३ अशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख आहे.

सिनेमे प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत
शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट यंदाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत दाखल झालेला असला, तरी त्यातली अनेक व्हीएफएक्स हास्यास्पद होती. हे लक्षात घेत आता शाहरुखच्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या दोन्ही सिनेमांच्या टीम त्याच्या व्हीएफएक्सवर अधिक बारकाईनं काम करत आहेत. तीच गोष्ट कंगना रणोटच्या ‘इमर्जन्सी’ या सिनेमाची. या सिनेमात आणीबाणीच्या काळात घडलेल्या घटना दाखवण्यात येणार आहेत. कंगना यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. यासह ती ‘तेजस’, ‘चंद्रमुखी’ आणि एका ऐतिहासिक सिनेमाचं काम करतेय. या तिन्ही चित्रपटांसाठी तिनं हॉलिवूडमधल्या तंत्रज्ञांचीही मदत घेतली असल्याचं कळतंय. आपल्या कलाकृतीची खिल्ली उडवली जाऊ नये, हा त्यामागचा हेतू आहे. आगामी काळात अनेक विविधांगी विषय असलेले सिनेमेही येत आहेत. सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योद्धा’, टायगर श्रॉफचा ‘गणपथ’, विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ हे हिंदी चित्रपट येणार आहेत. तसंच सध्या हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल : डेड रेकनिंग’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ‘इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनी’ नुकताच प्रेक्षकांसमोर आला. त्यातला दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड जमून आल्यानं प्रेक्षक त्याचं कौतुक करत आहेत. म्हणूनच आगामी काळात हिंदी चित्रपटांसमोर व्हीएफएक्स व तंत्रज्ञानाचं आव्हान कायम असणार आहे. यात बॉलिवूडवाले कितपत यशस्वी ठरत आहेत; हे येणारी वेळच सांगेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.