Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मिळालेल्या माहितीनुसार, ललिताबाई गोविंदराव भोसले (३०, रा. खानापूर, ता. बसवकल्याण, जि. बीदर, कर्नाटक) असे महिला प्रवाशाचे नाव आहे. वाहक (कंडक्टर) महेश विकास माने आणि चालक मिलिंद चंदनशिवे असे एसटी बस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ललिताबाई गोविंदराव भोसले या उमरगा येथून नळदुर्गला जाण्यासाठी हैदराबाद-सोलापूर या एसटी बसमधून आपल्या दोन कुटुंब सदस्यांसह बुधवारी प्रवास करीत होत्या. नळदुर्गला उतरल्यानंतर त्यांची पिशवी चुकून अनावधानाने एसटी बसमध्येच राहिली होती. हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आला. तेव्हा त्या अक्षरशः हतबल झाल्या होत्या. पिशवीत सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम होती. तसेच त्यांचा भ्रमणध्वनीही पिशवीतच होता.
सुदैवाने ही पिशवी बेवारस स्थितीत एसटी वाहक महेश विकास माने यांना सापडली. त्यांनी सापडलेली पिशवी एसटी चालक मिलिंद चंदनशिवे यांच्याही निदर्शनास आणून दिली. पिशवीत पाहिले असता भ्रमणध्वनीसह सोने-चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज होता. वाहक आणि चालकाने ही किंमती पिशवी सोलापूर एसटी स्थानकावर पोहोचताच आगार प्रमुख अशोक बनसोडे यांच्या हवाली केली. पिशवीतील भ्रमणध्वनीच्या आधारे ललिताबाई भोसले यांच्याशी संपर्क झाला. तेव्हा त्यांच्यासह भोसले कुटुंबीयांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी सोलापूर एसटी बसस्थानक गाठले.
आगारप्रमुख बनसोडे यांची भेट घेतली. योग्य खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या समक्ष संपूर्ण ऐवजासह किंमती पिशवी ललिताबाई भोसले यांना जशीच्या तशी सुपूर्द करण्यात आली. बसवाहक महेश माने आणि चालक मिलिंद चंदनशिवे यांच्या प्रामाणिकपणाचे भोसले कुटुंबीयांनी कौतुक करत बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघां एसटी कर्मचाऱ्यांनी नम्रपणे नकार दिला. एसटी वाहक महेश माने हे मूळ शेटफळ (ता. मोहोळआ) येथील राहणारे असून गेल्याच वर्षी त्यांची एसटी वाहक पदावर नियुक्ती झाली आहे.