Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाल समुद्रातील धोक्याचे वादळ, जहाजांना धोका कशाचा? नुकसान टाळ्यासाठी उपाय काय? जाणून घ्या

9

मुंबई: जगात सतत कुठे ना कुठे युद्धे सुरू असतात. सध्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाइन अशी दोन प्रमुख युद्धे सुरू आहेत. या युद्धांचे परिणाम अर्थातच त्या दोन देशांपुरते मर्यादित राहत नाहीत. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारे या युद्धांचे पडसाद उमटत असतात. यात युद्ध सुरू असलेल्या देशांचे मित्रदेश, त्यांचे सहानुभूतीदार गट आणि विरुद्ध पक्षाचे असेच गट यांच्यात जगभरात कुठे ना कुठे चकमकी उडत असतात. सध्या ‘लाल समुद्रा’तही अशाच चकमकी उडत आहेत आणि त्याचा फटका व्यापारी जहाजांना बसत आहे. यात जगभरातल्या सर्वच देशांचे मोठे नुकसान होत आहे. येमेनजवळील एडनचे आखात आणि सुएझ कालवा या दरम्यान असलेला लाल समुद्र म्हणजे अरबी समुद्रातून भूमध्य समुद्राकडे जाण्यासाठीचा एकमेव मार्ग. या लाल समुद्राची सुरुवात येमेनजवळील एडनपासून होते आणि इजिप्तच्या अलेक्झांड्रिया बंदरापाशी हा मार्ग संपतो. या मार्गावरून जगभरातील व्यापारी जहाजांचा प्रवास चालत असतो. सध्या हाच मार्ग धोक्यात आला आहे.

जहाजांना धोका कशाचा?

या मार्गावरून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना गेल्या काही काळापासून येमेनमधील हौती या बंडखोर गटाने वेठीस धरले आहे. या जहाजांवर हल्ला करण्यात हे हौती चाचे पटाईत झाले आहेत. अलीकडे पॅलेस्टाइनला पाठिंबा म्हणून त्यांनी इस्रायलकडे जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे. शनिवारी लायबेरियाच्या रसायने वाहून नेणाऱ्या मालवाहू टँकर जहाजावर हल्ला करण्यात आला. गुजरातमधील वेरावळ बंदरापासून २०० किलोमीटर नैर्ऋत्येला असलेल्या या जहाजावर एक क्षेपणास्त्र धडकले. यात जहाजाचे नुकसान झाले असून, काही प्रमाणात जहाजावर पाणीही भरले आहे. हे जहाज इस्रायलशी संबंधित आहे. ते सौदी अरेबियाकडून भारताकडे निघाले होते, अशी माहिती ‘अँब्री’ या ब्रिटिश नौकावहन सुरक्षा संस्थेने दिली. ब्रिटनच्या नौकावहन व्यापार संस्थेनेही याला दुजोरा दिला आहे. हौती चाच्यांच्या या हल्ल्याला कंटाळून अनेक व्यापार वाहतूक संस्थांनी पुन्हा एकदा आफ्रिका खंडाला वळसा घालून जहाजे नेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्थातच वाहतूक खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि अन्नधान्य, ऊर्जा, दैनंदिन गरजेच्या वस्तू संबंधित देशांपर्यंत पोहोचण्यास वेळही लागत आहे. इटली-स्वित्झर्लंड यांच्या मालकीच्या दिग्गज मेडिटेरिनिअन शिपिंग कंपनीसह फ्रान्सची सीएमए-सीजीएम, डेन्मार्कची एसी मॉलर-मर्स्क आदी सुमारे डझनाहून अधिक कंपन्यांही लाल समुद्रातून आपली जहाजे नेणे सध्या स्थगित केले आहे.

अमेरिकेचा आरोप काय?

हौती चाच्यांच्या या हल्ल्यांमागे इराणचा हात आहे, असा थेट आरोप अमेरिकेने केला आहे. इराणकडून या बंडखोर गटाला केवळ शस्त्रास्त्रेच नव्हेत, तर व्यूहात्मक डाव व गुप्तवार्ता आदींबाबत साह्यही मिळत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. इराणने या आरोपांचा इन्कार केला आहे. हौती बंडखोरांना आपला राजकीयदृष्ट्या पाठिंबा असला, तरी त्यांच्या व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांशी आमचा काहीही संबंध नाही, असे इराणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘व्हाइट हाउस’च्या राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्त्या अॅड्रियन वॉटसन यांनी सांगितले, की लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमागे इराण मोठ्या प्रमाणावर गुंतला आहे. हौती बंडखोरांना इराण दीर्घकाळापासून शस्त्रे पुरवीत आला आहे. लाल समुद्रातील हा धोका म्हणजे एक जागतिक आव्हान असून, सर्व देशांनी मिळून त्याचा मुकाबला केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. हौती चाच्यांनी जहाजांवर डागलेल्या अस्त्रात आणि इराणच्या ‘केएएस-०४’ या ड्रोनमध्ये अतिशय साम्य आहे, असे अमेरिकेने केलेल्या तपासणीत आढळले आहे. इराणी आणि हौतींच्या क्षेपणास्त्रांतही कमालीचे साम्य दिसून आले आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे.

पुढील उपाय कोणते?

लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी २० हून अधिक देशांचे संयुक्त दल उभारण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने येमेनच्या हौती नियंत्रित भागांतून सोडण्यात आलेले किमान १४ हल्लेखोर ड्रोन नष्ट केले आहेत. अमेरिकी लढाऊ जहाजांनी आमच्यावर हल्ला केल्यास आम्हीही त्यांच्यावर प्रतिहल्ला करू, अशी धमकी हौती बंडखोरांनी दिली आहे. आपली स्वत:ची रडार आदी सुसज्ज यंत्रणा असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. अमेरिकेच्या मते, हौती बंडखोरांना इराणनेच रडार आणि तत्सम गुप्तचर मदत केली आहे. त्याशिवाय हौती बंडखोरांना व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे अवघड आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेने आता या मार्गाने जाणाऱ्या व्यापारी जहाजांना संरक्षण पुरविण्याचा पवित्रा घेतल्याने लाल समुद्राच्या तोंडाशी पुन्हा नवे हिंसक वादळ घोंघावू शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.