Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील मयुरी सावंत हिने आपले खाकी वर्दीचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविले आहे. आपली मुलगी अभ्यासाच्या जोरावर ‘खाकी वर्दीत’ दिसावी असे आई-वडिलांची मनीषा होती. यासाठी मयुरीने बारा बारा तास सातत्याने अभ्यास केला. सण, समारंभ काही काळ दूर ठेवले. मोबाईलचा आवश्यकतेसाठीच वापर केला आणि यशाला गवसणी घातली. मयुरी पहिलीपासून बारावीपर्यंत वाघळवाडीतील उत्कर्ष आश्रम शाळेतच शिकली. बारावीनंतर माळेगावच्या शिव विद्या प्रसारक मंडळ कॉलेजमध्ये बी. ई. मेकॅनिकलची पदवी प्राप्त केली. शाळेत शिकत असतानाच पोलिस वर्दीचे आकर्षण वाटत होते. वडील महादेव सावंत हे क्रीडाशिक्षक. स्पर्धा परिक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत जाण्याचा त्यांनीही प्रयत्न केला होता. त्यामुळे मुलीने पोलिस अधिकारी व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
यासाठी उत्तम गुणांनी बी.ई. मेकॅनिकल झालेल्या मयुरीने इतर नोकरीसाठी कुठेही एकही अर्ज केला नाही. आई-वडिलांचे वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मयुरी मागील सहा वर्षांपासून सातत्याने अपार परिश्रम घेत होती. पहिल्या तीन प्रयत्नांना अपयश आले. मात्र यामुळे खचून न जाता पोरीला वर्दीत बघायचंय हाच विचार मनात बाळगून जिद्दीने अभ्यास करून अखेर कुठल्याही कोचिंग क्लासशिवाय चौथ्या प्रयत्नात मयुरीने पोलिस उपनिरीक्षक पद कवेत घेतले.
खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मयुरीने पुण्यात जाऊन एक वर्ष सेल्फ स्टडी करत स्पर्धा परीक्षा तंत्र समजून घेतले. यानंतर २०१८ ते आजपर्यंत करंजेपूलच्या विवेकानंद अभ्यासिकेमध्ये दररोज सातत्यपूर्ण अभ्यास करत राहिली. २०२० मधील पीएसआयची परीक्षा दिली होती. तिला मुख्य परिक्षेत २४६ गुण होते तर मैदानी चाचणीत चक्क शंभरपैकी शंभर गुण मिळवले. मुलाखतीत १८ गुण मिळाले. विशेष म्हणजे २०२१ च्या पीएसआय परिक्षेतही ती यशस्वी ठरली असून तो निकालही बाकी आहे. निवृत्त रेल्वे पोलिस अंकुश दोडमिसे यांचे मैदानी चाचणीसाठी तिला मार्गदर्शन मिळाले तर चंदा सामंत, आशा जाधव, प्रतिक्षा काकडे, ऋतुजा भोसले या मैत्रिणींची अभ्यासात मदत झाली.
आश्रमशाळेत शिक्षकांच्या देखरेखीखाली रोज सकाळी व सायंकाळी सेल्फ स्टडी असायची. सेल्फ स्टडीमुळे कोचिंगची गरज पडली नाही. क्रिडाशिक्षकाची मुलगी असल्याने मैदानी चाचणीत पैकीच्या पैकी गुण मिळाले. अभ्यासिकेत शिक्षकाच्या देखरेखीखाली अभ्यास चांगला व्हायचा. दुपारच्या थोड्या विश्रांतीनंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे. मोबाईल गरजेपुरताच वापरला. उत्सवांमध्ये, समारंभांमध्ये अडकले नाही. मनापासून कष्ट केल्याने आई-वडिलांचे वर्दीचे स्वप्न साकार झाले, असे मयुरी म्हणते.
Read Latest Maharashtra News And Marathi News