Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
प्रचाराच्या यात्रेत सेल्फीचा थांबा; मध्य रेल्वेच्या २० रेल्वेस्थानकांत 3D सेल्फी बूथ, खर्च वाचून चक्रवाल
मुंबई शहर-उपनगरांना जोडणाऱ्या लोकल ट्रेन या मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जातात. शहरातील जवळपास प्रत्येक व्यक्ती कामानिमित्त रोज किमान एकदा तरी लोकलने प्रवास करते. शिवाय, बाहेरगावी जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमधूनही प्रवाशांचा प्रवास होतो. यामुळे योजनांची माहिती, नवे विक्रम याबाबत जागृती करण्यासाठी अधिक वर्दळीच्या ठिकाणांवर प्रचार करण्यावर राजकीय पक्षांचा भर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अंतराळातील भारतीय शक्ती, ठाणे स्थानकात ‘स्किल इंडिया’, कल्याणमध्ये ‘स्टार्ट अप इंडिया’, घाटकोपरमध्ये ‘न्यू इंडिया मेडिसीन’ आणि कुर्ला येथे ‘डिजिटल इंडिया’ असे सेल्फी बूथ उभारण्यात आले आहेत. रेल्वेस्थानकांवर उभारण्यात आलेल्या योजनांच्या सेल्फी बूथबाबत रेल्वेप्रवाशांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. सीएसएमटीमध्ये अंतराळ शक्तीच्या बूथमध्ये चांद्रयानाची प्रतिकृती उभारली आहे. चांद्रयानाच्या यशामुळे जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक झाले आहे. प्रवाशांचा वावर असलेल्या जागेत हे बूथ नसल्याने त्याची अडचण होत नाही. लहान मुले कुतूहलाने सेल्फी बूथवर फोटो काढतात व त्याबाबत माहिती विचारत आहेत, अशी प्रतिक्रिया खासगी बँकेत अधिकारी म्हणून काम करणाऱ्या नलिनी देशमुख यांनी दिली. तर, रेल्वे फलाटावर अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थांचे स्टॉल, प्रचंड गर्दी अशा अडचणी असताना यात आता सेल्फी बूथची भर पडली आहे. यामुळे वर्दळीच्या ठिकाणी असे उपक्रम राबवण्यास सर्वच राजकीय पक्षांना मनाई करायला हवी, असे एक प्रवासी प्रसाद पांडे यांनी सांगितले.
मुंबईबाहेर पुणे आणि नाशिक रेल्वेस्थानकांत देशाचे लष्करी सामर्थ्य, कोल्हापूर आणि अकोला येथे गॅस (उज्वला योजना), जळगावमध्ये नवभारत (जल), मनमाडमध्ये शेतीविषयक, नागपूरमध्ये ‘नवभारत’, शिवाजी नगर येथे ‘डिजिटल इंडिया’ आणि पंढरपूर रेल्वेस्थानकात स्वच्छताविषयक माहिती देणारे बूथ उभारण्यात आले आहेत.
सेल्फी बूथचा खर्च किती?
मध्य रेल्वेवर उभारण्यात आलेल्या सेल्फी बूथच्या खर्चाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, वर्दळीच्या रेल्वेस्थानकात तात्पुरते आणि कमी प्रवासी असलेल्या ठिकाणी कायमस्वरुपी स्वरुपाचे ३ डी सेल्फी बूथ (पॉईंट) उभारण्यात आले आहे. अ दर्जा असलेल्या रेल्वेस्थानकात तात्पुरत्या सेल्फी बूथसाठी प्रत्येकी सव्वा लाख रुपये आणि क दर्जाच्या रेल्वेस्थानकात कायमस्वरूपी सेल्फीसाठी प्रत्येकी सव्वासहा लाख रुपये खर्च आला आहे.