Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुण्यात मध्यरात्री मद्यधुंद तरुणीचा राडा; शेजाऱ्यांसह पोलिसांनाही केली मारहाण
पुणे – पुणे शहरातील वानवडी परिसरात एका उच्चभ्रु सोसायटीच्या परिसरात एका मद्यधुंद तरुणीने नववर्षाच्या सुरुवातीला धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीत येत तिने सामानाची तोडफोड केली. तर शेजारी आणि तिला रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांना देखील तिने मारहाण केली, पण त्यांनी सदर तरुणी एका बड्या पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असल्यामुळे कारवाईचा हात आखडता घेतला, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला.
पुण्यात ३१ डिसेंबरच्या रात्री एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीने सोसायटीत तूफान राडा घातला. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणीने सोसायटीतील नागरिकांना शिवीगाळ करत आवारातील सामानाची तोडफोड केली. एवढेच नाही तर तिला आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजाऱ्यांना देखील तिने मारहाण केली. मात्र, ही तरुणी ऐकत नसल्याने अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र, या तरुणीने पोलिसांना देखील मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ तारखेला नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या तरुणीने मद्यपान केले. यानंतर ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत सोसायटीत आली. यानंतर तिने सोसायटीच्या आवारात धुडगूस घालण्यास सुरवात केली. सोसायटीत येताच शिवगाळ करत तिने वॉचमनसाठी असलेला टेबल आणि खुर्ची रस्त्यावर फेकून दिले. यानंतर सोसायटीत राहणाऱ्यांना ती शिवीगाळ करू लागली.
तिला रोखण्यासाठी आलेल्या सोसायटीतील काही शेजाऱ्यांना तिने शीवीगाळ करत मारहाण करू लागली. नशेत असलेल्या तरुणीनं सोसायटीचं गेट बंद केलं. ती आवरत नसल्याने रहिवाशांनी पोलिसांना बोलावले. यावेळी या मुलीने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली.
अखेर पोलिसी हिसका दाखवत तिला पकडले दरम्यान, माहितीत ही मुलगी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती मिळाली. यामुळे तिला सोडून देण्यात आल्याचे सोसायटीतील राहिवाशांचे म्हणणे आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असतांना आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यात नागरीक मग्न असतांना या तरुणीने सोसायटीत येऊन राडा घातल्याने रहिवाशांना चांगलाच मनस्ताप झाला. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा राडा पाहून सोसायटीतील नागरिक संतप्त होऊन तरुणी भोवती जमले होते. तरी सुद्धा ती कोणाला जुमानत नव्हती.
वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे म्हणाले, या प्रकरणी 22 वर्षीय तरुणी विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सोसायटीतील एका गाडीची काच फुटली असून, त्याबाबत देखील तिच्यावर कारवाई करून नोटीस बजावण्यात आली आहे. तिचे वडील पोलिस निरीक्षक असून मागील 3 वर्षांपासून ते मुलगी व पत्नीपासून विभक्त राहत आहेत. या प्रकरणी सदर तरुणीवर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.