Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळांच्या विद्यमाने श्री मलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावात हा सोहळा संपन्न होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती असणार आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत. तसेच उदघाटन सोहळ्या प्रसंगी अश्व रिंगण होणार असून या साठी थेट संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणले जाणार आहे. यावेळी रिंगण सोहळ्यादरम्यान दिंडी वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. काही वेळातच मुख्यमंत्री शिंदे हे या सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डोंबिवली, कल्याण-शीळ रोड, खोणी-तळोजा रोडवर मोठी बॅनर बाजी करण्यात आली आहे. रस्त्यावरील एकही खांब किंवा मोकळी जागा सोडण्यात आलेली नाही.
शिवसेना शिंदे गटाच्या बॅनर वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो झलकविण्यात आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी करत एक प्रकारे शक्तिप्रदर्शन शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघात हा भाग येत असून त्यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले बॅनर लावत आपली ताकद देखील कमी नाही हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
२०१९ मध्ये शिंदे पिता-पुत्रांची बालाजी भक्ती
२०१९च्या निवडणुकीपूर्वीही डोंबिवली येथे दक्षिण भारतीयांची मतसंख्या लक्षात घेऊन तिरुपती श्रीनिवास मंगल महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी थेट उडपीहून ४०० आचारी बोलवण्यात आले होते. तर तिरुपतीहून पुजारी बोलवण्यात आले होते. चक्क अडीच लाख लाडवांचा प्रसादही वाटण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार सुभाष भोईर यांनीही त्यांना मोठी मदत केली होती.
यंदा पंढरीकडे धाव
वारकरी संप्रदायाची मत लक्षात घेऊन अखंड हरिनाम सप्ताहावेळी वारकरी संप्रदायाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात आर्थिक हातभार लावल्याची चर्चा आहे. याशिवाय त्यांनी नियोजनात हातभार लावल्याचेही बोलले जात आहे. या संपूर्ण कार्यक्रमात डॉ. श्रीकांत शिंदे स्वागताध्यक्ष असतील, तर मुख्यमंत्री शिंदेंची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे कल्याणसह राज्याचे लक्ष असणार आहे. शहरात जागोजागी हे लागलेले बॅनर म्हणजे एकप्रकारे शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे चित्र दर्शवितात.