Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देह व्यापार केला तर गुन्हे दाखल करू; ‘या’ भागातील महिलांना पोलिसांचा इशारा

17

हायलाइट्स:

  • देह व्यापार करणाऱ्या महिलांना इशारा
  • पुन्हा देहविक्री केल्यास गुन्हा दाखल होणार
  • पोलिसांनी भिंतींवर लावली पत्रके

नागपूर : शहरातील इतवारी भागातील गंगा जमना हा परिसर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. देहव्यापार (Sex Racket) होत असलेल्या या परिसरात पोलिसांकडून निर्बंध लादण्यात आले. त्यानंतर आता पोलिसांनी या भागात देह व्यापार करणाऱ्या महिलांना आणखी एक इशारा दिला आहे. यापुढे गंगा जमना परिसरात देह व्यापार कराल तर तुमच्याविरुद्ध गुन्हे दाखल करू, असा इशारा देणारी पत्रके लकडगंज पोलिसांनी गंगा जमना भागातील भिंतींवर लावली आहेत.

इतवारीतील गंगा जमना वसाहत देह व्यापारासाठी ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेऊन हा परिसर सील केला. तेव्हापासून या वसाहतीत अस्वस्थता आहे. ही वसाहत येथून हटवावी, अशी आजुबाजूच्या नागरिकांची मागणी आहे, तर ही वस्ती दोनशे वर्षे जुनी आहे. नागरिकांनी नंतर येथे घरे बांधली. त्यामुळे आम्हाला येथून हटवू नये, असं या वसाहतीतील महिलांचं म्हणणं आहे.

Jalgaon Rains: जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर ‘हे’ भीषण चित्र आलं समोर

या महिलांना बेघर करू नये म्हणून शहरातील काही सामाजिक संघटनाही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. मागील आठवड्यात दोन्ही गट एकमेकांपुढे उभे ठाकल्याने येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पोलिसांनी ही जागा सार्वजनिक ठिकाण म्हणून घोषित केले. मात्र सामाजिक संघटनांनी पोलिसांच्या या कृतीला विरोध केला आहे. आम्ही प्रसंगी प्राण देऊ पण येथून हटणार नाही, असं येथील महिलांचं म्हणणं आहे.

धक्कादायक! बाईकवर असताना साडीचा पदर चाकात अडकून भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

ही वसाहत हटवावी यासाठी यापूर्वीही अनेकदा आंदोलने झाली आहेत. पहिलं आंदोलन १९७९ साली झालं होतं. तर माजी खासदार व विदर्भवादी नेते दिवंगत जांबुवंतराव धोटे यांनीही काही वर्षांपूर्वी येथील महिलांच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन उभारले होते. आता पुन्हा एकदा ही वसाहत हटवण्याचा मुद्दा पुढे आला आहे आणि धोटे यांच्या कन्या ज्वाला धोटे महिलांच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी आता येथे पत्रके लावून देह व्यापार न करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि या सूचनांचं पालन न केल्यास गुन्हे दाखल करू, असं बजावलं आहे. येथील देह व्यापारामुळे लहान मुलींचं आयुष्य धोक्यात आलं आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र इशारा देतानाच पोलिसांनी पुनर्वसनासाठीही पुढे येण्याची तयारी दाखवली आहे. येथील महिलांना रोजगार किंवा अन्य व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल व मदतही केली जाईल, कौशल्य विकास केंद्र, समाज कल्याण केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून महिला सबलीकरणासाठी सहकार्य करू. आपल्या चांगल्या कामांना आमचं नेहमीच सहकार्य राहील, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र येथील महिला आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.