Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महापूर: सांगलीतील नुकसानीचा ‘हा’ आकडा राज्याची चिंता वाढवणारा

15

हायलाइट्स:

  • महापुरामुळं सांगली जिल्ह्यात मोठी वित्तहानी
  • जिल्हा प्रशासनानं प्रथमच केला आकडा जाहीर
  • ७३ हजार ९९७ पूरग्रस्त घरांचे पंचनामे

सांगली: सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या महापुराने कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांसह घरं, दुकानदार, बारा बलुतेदार आणि टपरीधारकांनाही याचा फटका बसला. महापुराने नुकसान झालेल्या बाबींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पूरग्रस्तांची नुकसान भरपाई, रस्ते व इमारत दुरुस्तीसाठी सुमारे ८०० कोटी रुपयांची सरकारकडे मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाणी शिरलेल्या ७३ हजार ९९७ घरांचे पंचनामे झाले आहेत. त्यापैकी घरात पाणी गेले अशा २९ हजार ५६८ कुटुंबांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. महापुराचा सांगली शहरासह वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यातील ११३ गावांना तडाखा बसला. कृष्णा आणि वारणा काठावरील गावं पाण्याखाली गेली. नदीचे पाणी घरात शिरल्याने हजारो लोकांना घर सोडावे लागले होते. ३२ हजार जनावरेही हलवावी लागली. ऊस, सोयाबीन, भूईमूग, केळी, द्राक्षांसह भाजीपाला वाया गेला. वारणा, कृष्णा नदीकाठावरील ९७ हजार ४८६शेतकर्‍यांची ४० हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली होती. पूर ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे सुरू केले होते. सुमारे पंधरा दिवस पंचनाम्याचे काम सुरू होते. हे काम अखेर पूर्ण झाले आहे.

वाचा: पक्षात बढती मिळताच ‘दादा’ गटाच्या विशाल पाटलांचे भाजप खासदाराला आव्हान

महापुराचे पाणी आलेले आणि पाण्यामुळे स्थलांतरित झालेल्या ७३ हजार ९६७ कुटंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत. ५२३ घरं पूर्णत: नष्ट झालेली आहेत. पक्की घरे १७४ नष्ट झाली. २९०० कच्ची घरं अंशत: नष्ट झाली असून १३८४ पक्क्या घरांचे नुकसान झाले. जिल्ह्यात १५०० गोठ्यांचेही नुकसान झाले असून, १९ झोपड्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. पुराच्या पाण्यामुळे १२१ लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. शेती, कुटुंबांशिवाय व्यापार्‍यांनाही फटका बसला. १२ हजार ५८३ दुकानदारांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. ९४५ बारा बलुतेदारांसह ७ हजार २४२ टपरीधारकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. पूरग्रस्तांना तत्काळ मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र सव्वा महिन्यांनंतरही मदत न मिळाल्याने नाराजी वाढली आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यांतील २४७ गावांतील आतापर्यंत १ लाख ५६५ शेतकर्‍यांच्या ३९ हजार ६९५ हेक्टर जमिनींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यात जमिनीच्या भुस्खलनाच्या ५८१ हेक्टरमध्ये शिराळा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ४४६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. तीन इंचापेक्षा जादा माती, गाळ साचलेल्या जमिनीचे क्षेत्र १४२ हेक्टर आहे.

पूरग्रस्त ४२ हजार ३१९ कुटुंबांना दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू आणि पाच किलो तूरडाळीचे ९५ टक्के कुटुंबाना वाटप पूर्ण झाले आहे. घरात पाणी गेलेल्या २९ हजार ५६८ कुटुंबांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. उर्वरित अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.