Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

औषधसाक्षरतेसाठी फार्मासिस्ट हवाच; फार्मासिस्टचे काम काय? आज काय स्थिती आहे?

5

मुंबई : मुंबईमध्ये दोनशे औषधांच्या दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली अन् त्यानंतर या कालावधीमध्ये विकण्यात आलेल्या औषधांची जबाबदारी नेमकी कुणाची, एफडीए अशा दुकानांवर कोणती कारवाई करणार, अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरु झाली. औषधविक्रेत्यांची नेमकी गरज काय आहे, त्यांची जबाबदारी नेमकी कोणती असते, ते औषधांच्या दुकानांमध्ये उपस्थित नसतील तर त्यामुळे आरोग्यहिताचे कोणते प्रश्न निर्माण होतात याचा शोध घेण्याचा हा प्रयास

फार्मासिस्टचे काम काय?

आजारी पडलो की आपण डॉक्टरांकडे जातो. ते औषध लिहून देतात. फॅमिली डॉक्टर असतील तर लिहून दिलेले औषध विकत घेतले की पुन्हा आणून दाखवा असे सांगतात. खरे तर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे देण्याचे काम हे औषधांच्या दुकानांमधील फार्मासिस्टकडून केले जाते. कोणते औषध कोणत्या लक्षणांवरती आहे, त्याचा नेमका उपयोग काय असा प्रश्न कुतूहलाने त्यांना विचारला जातो. रुग्ण वा त्याच्यासाठी औषध विकत घ्यायला आलेले कुटुंबीय किती उत्सुक आहेत, त्यामागील त्यांचा नेमका उद्देश काय आहे हे लक्षात घेऊन फार्मासिस्ट अत्यंत सुज्ञपणे ही माहिती देतात. कोणते औषध कोणत्या अन्नपदार्थांसोबत घ्यावे, ते घेताना कोणते पथ्य पाळावे, औषधांची मात्रा किती प्रमाणात घ्यावी ही माहिती फार्मासिस्टकडून दिली जाणे अपेक्षित आहे. औषध कोणत्या वेळी घेतले जाते. ते त्याच वेळी का घ्यायला हवे, ते योग्य पद्धतीने घेतले नाही तर त्याचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात याची माहितीही फार्मासिस्ट देऊ शकतात. औषधसाक्षरतेसाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

बिल्किस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका, ११ आरोपींची शिक्षेतील सूट रद्द
आज काय स्थिती आहे?

रुग्णालयांप्रमाणे औषधांची उपलब्धताही चोवीस तास असणे गरजेचे असते. मात्र, चोवीस तासांसाठी दुकानांमध्ये फार्मासिस्टची उपलब्धता नसते. छोट्या औषधांच्या दुकानांची उलाढाल मोठ्या साखळी दुकानांपेक्षा कमी असते. त्यामुळे दोन ते तीन फार्मासिस्टची उपलब्धता ठेवता येत नाही, असे कारण त्यांच्याकडून दिले जाते. राज्यात आज जवळपास ५० हजार औषधांची दुकाने आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक दुकानांमध्ये रात्रीच्या वेळी असणारे फार्मासिस्ट नसतात. मुंबई ठाणे येथे दोनशे दुकानांमध्ये औषधांची उपलब्धता नव्हती. फार्मासिस्टने काम सोडून दिले तर त्यांनी तशी नोंद एफडीएकडे करणे अपेक्षित आहे. हा नियम अनेकदा पाळला जात नाही. फार्मासिस्ट नसताना अनेक दुकाने सुरू राहतात. त्यामुळे त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेसंदर्भातही प्रश्न उपस्थित होतो.

काम खूप, सेवा अपुऱ्या

औषधनिर्माणशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर नोकरी मिळेपर्यंत अनेक पदवीधर औषधांच्या दुकानांमध्ये काम करण्यास पसंती देतात. डीफार्म झाल्यानंतर नोकरी करायची असेल तर फार्मासिस्टचा पर्याय स्विकारला जातो. या विषयातील इतर पदवीधर हे नोकरी, संशोधन या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा पर्याय निवडतात. फार्मासिस्ट म्हणून काम करताना मिळणारे वेतन वाढत्या महागाईच्या तुलनेमध्ये अत्यल्प आहे. कमी रजा, कामाचे जादा तास, कोणत्याही प्रकारची नोकरीची सुरक्षितता, विमा योजनांचे लाभ मिळत नसल्याने या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ करिअर करण्यासाठी हाताच्या बोटावर मोजणारे तरुण उत्सुक असतात. इतरांचा कल हा औषधांचे दुकान टाकण्याकडे असतो. हा व्याप वाढल्यानंतर दुकानांमध्ये फार्मासिस्टची संख्या वाढवली जात नाही.

ऑनलाइनशी स्पर्धा कशी?

मागील काही वर्षात औषधांच्या दुकानांचे स्वरूप बदलले. छोट्या मेडिकल स्टोअर्सची संख्या कमी होत गेली. एकाच व्यावसायिकांची दोन ते तीन दुकाने दिसून येतात. हा व्यवसाय सांभाळण्यासाठी प्रशासकीय मान्यता, स्थानिक राजकीय व्यक्तींचा वरदहस्त या गोष्टीही तितक्याच गरजेच्या असल्याचे चित्र दिसू लागले आहे. साखळी दुकानांनी छोट्या दुकानांचे कंबरडे मोडले तर ऑनलाइन स्पर्धांमध्ये आता ही साखळी दुकानेही सापडली आहेत. ऑनलाईन औषधांच्या विक्रीमध्ये मिळणारी घसघशीत सवलत, घरपोच मिळणारी सुविधा यामुळे अल्पावधीमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. मात्र या पोर्टलवर औषधविक्रेते असतात का याची चाचणी कऱण्याचे निकष तितक्या गांभीर्याने पाळले जात नाहीत.

एफडीएची भूमिका कशी हवी?

राज्यात औषधांची ५० हजार दुकाने आहेत, तर फार्मासिस्टची संख्या लाख-दीड लाख इतकी आहे. मनुष्यबळाचा तुटवडा नसला तरीही विविध शिफ्टमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळाची पुरेशी उपलब्धता नाही. त्यामुळे छोट्या आणि मोठ्या दोन्ही प्रकारच्या दुकानांमध्ये एकाच फार्मासिस्टची नियुक्ती केली जाते. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ अंतर्गत फार्मासिस्टची उपस्थिती नसताना औषधांची विक्री करणे हा गुन्हा आहे. त्याविरोधात कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. फार्मसिस्टची भरती न करणे, औषधांची माहिती आहे त्यामुळे त्यांची गरज नाही असे कारण पुढे करणे हा सामान्यांच्या आरोग्यहिताशी असलेला खेळ आहे. औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०, १९४५ फार्मसी कायदा यांच्यासह कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली तर रुग्णांना निश्चितपणे दिलासा मिळेल व डॉक्टरांनाही सहकार्य होईल.

अपात्रतेच्या निकालाला उरले अवघे काही तास, विधानसभाध्यक्ष नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.