Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भाज्यांनी सामान्यांचं टेन्शन वाढवलं, फळभाज्या २५ रुपये पावशेर, तर फळे ५० रुपये किलो, वाचा सध्याचे दर
एरवी हिवाळ्यात दहा रुपयांना दोन ते तीन पालेभाज्यांच्या जुड्या विकल्या जातात. तर १० रुपये पावशेरने बहुतेक फळभाज्या विकल्या जातात. असाच अनुभव जवळजवळ दरवर्षी येतो. मात्र मागच्या वर्षभरात सातत्याने अवेळी झालेल्या पावसाने भाज्या तसेच फळांचे गणित बिघडले. तब्बल सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापर्यंत आल्याचे भाव कधी नव्हे एवढे चढे राहिल्याचे पाहायला मिळाले. आता लसणाची परिस्थिती काहीशी तशीच आहे. सध्याही लसणाचे भाव ७० ते ८० रुपये पावशेरपेक्षा कमी नाहीत. जाधववाडीच्या बाजारात मंगळवारी साध्या लसणाची २८० रुपये किलो, तर गावरान लसणाची किलोमागे ४०० रुपयांनी घाऊक विक्री झाली. त्यामुळेच साध्या लसणाची ७० ते ८० रुपये आणि गावरान लसणाची १०० ते ११० रुपये पावशेरने किरकोळ विक्री झाल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. लसणाचे चढे भाव मागच्या अनेक दिवसांपासून कायम आहेत.
हिरव्या मिरचीची जाधववाडीच्या बाजारात मंगळवारी ९१ क्विंटल आवक झाली असली तरी ३००० ते ४५०० रुपये क्लिंटलने मिरचीची घाऊक विक्री झाली आणि किरकोळ बाजारात काकडा मिरचीची ३० रुपये व गावरान मिरचीची ४० रुपये पावशेरने विक्री होत आहे. त्याचप्रमाणे गवार, भेंडी, वांगे, सिमला मिरची आदी फळभाज्यांची २५ ते ३० रुपये पावशेरने अनेक ठिकाणी विक्री होत आहे, तर पत्ताकोबी, फुलकोबी, दुधीभोपळा अशा मोजक्या फळभाज्यांची १५ ते २० रुपये पावशेरने विक्री होत असल्याचे पाहायला मिळाले. अर्थात, काही दिवसांपूर्वी भाव कडाडलेल्या श्रावण घेवड्याचे भाव काहीसे उतरले असून, किरकोळ बाजारात मंगळवारी श्रावण घेवडा १५ ते २० रुपये पावशेरने विकला गेला.
टोमॅटोचे भावही मर्यादेत आहेत व सध्या टोमॅटोची ३५ ते ४० रुपये किलोने किरकोळ विक्री होत आहे. अजूनही पालेभाज्या महागच आहेत व मेथी १५ रुपये जुडीने विकल्या जात आहे. पालक, कोथिंबीरही कधी १० रुपये तर कधी १५ रुपये जुडीने विकत घेण्याची वेळ येत आहे. वाहतुकदारांच्या संप काळात गायब झालेला वाटाणा आता बऱ्यापैकी उपलब्ध झाला असला तरी ५० ते ६० रुपये किलोच्या खाली नाही, हेही दिसून आले. त्या तुलनेत फळांचे दर काहीसे दिलासादायक असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाज्यांच्या तुलनेत फळांचे दर बरेच कमी आहेत. हिवाळ्यात पपई काहीशी महाग असते; परंतु मंगळवारी पपई शहागंजच्या बाजारात चक्क २० रुपये किलोने विकल्या गेली. फळबाजारात पेरुही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, ३० ते ४० रुपये किलोने पेरुची विक्री होत आहे. अर्थात, सध्या पेरू अधिकतर पिकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. त्याचबरोबर संत्रीही फळभाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि पंजाब भागातून अधिकतर संत्री उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. हीच संत्री मंगळवारी ५० रुपये किलोने विकल्या गेली. सिताफळही ५० रुपये किलोने विकल्या गेले.
दौलताबाद परिसरातील अंजीर बाजारात ९० रुपये किलोने विकल्या जात आहेत. बाजारात काश्मीरचे डिलक्शन प्रकारचे सफरचंद आहेच; शिवाय बाहेर देशातील सफरचंदही विक्रीस उपलब्ध आहेत. देशी डिलक्शन ९० ते १०० रुपये किलो, तर बाहेर देशातील सफरचंदांची १२० रुपये किलोपासून विक्री होत आहे. मागच्या काही दिवसांपासून संकरित बोरांचीही मोठी आवक होत आहे आणि १५ ते २० रुपये पावशेप्रमाणे त्यांची किरकोळ विक्री सुरू आहे. पुन्हा अॅपल बोरांचीही काही प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शहागंजच्या बाजारात देशी स्ट्रॉबेरीचीही विक्री होत आहे. या स्ट्रॉबेरीची ४० रुपये पावशेरने, तर ७० रुपये किलोने विक्री होत आहे. अर्थात, आणखी चांगल्या प्रकारची स्ट्रॉबेरीदेखील बाजारात उपलब्ध आहे आणि अर्थातच त्यांचे दर जास्त आहेत.