Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सिंधुदुर्गातील शिराळेच्या गावपळणीला सुरुवात ४५० वर्षांची परंपरा जपणाऱ्या शिराळे गावच्या गावपळणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. गावपळणी दरम्यान शिराळेवासीय पाळीव प्राणी पशुपक्ष्यांसह आणि लागणारा धान्याचा साठा घेऊन नजीकच्या सडूरे गावाच्या हद्दीत दडोबा डोंगराच्या पायथ्याशी राहुट्यामध्ये विसावले आहेत. देवाला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावाबाहेर सर्व लोक बाहेर पडतात. तसेच गावभरणीच्या वेळी सुद्धा देवाला कौल लावूनच गाव भरणी केली जाते. देव गांगोचा हुकूम मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात. त्यामुळे तीन, पाच, सात दिवसांची ही गावपळण असते.
तळकोकणातील तीन ठिकाणची गावपळण असते. शिराळे ,आचरा, चिंदर या गावांची गावपळण असते. त्यामध्ये दरवर्षी गावपळण होणारा एकमेव गाव शिराळे आहे. या शिराळे गावातील ही दृष्य पाहिली की वाटेल की गावात घरे आहेत. पण माणसे कुठे दिसत नाही. गावच्या प्रथेनुसार वर्षातून एकदा इथे गाव सोडावा लागतो आणि गावात ५ दिवस कोणी माणूस थांबत नाही. असं इथले स्थानिक ग्रामस्थ सांगतात. तसेच जनावरे पाळीव प्राणी, कोंबड्या, गुरे ढोरे, सर्व वेशी बाहेर घेऊन जावे लागते. शाळा सुद्धा गावात ५ दिवस भरत नाही. ती सुद्धा गावाबाहेर भरवली जाते. त्यामुळे या गावात फक्त स्मशान शांतता असते.
गावाच्या वेशीबाहेर एका ठिकाणी दहा ते पंधरा झोपड्या बांधून गावातील लोक राहतात. ५ ते ७ दिवसासाठी लागणारे साहित्य, कपडे, गुरे, कोंबडी, कुत्रे सगळ काही न विसरता घेत वेशीबाहेर मुक्काम केला जातो. गावपळनीचे ५ ते ७ दिवस हे गावकऱ्यांसाठी मंतरलेले असतात. या गावपळनीसाठी चाकरमानी, माहेरवाशनी ही आवर्जून हजेरी लावतात. तीन दिवसानंतर गावच्या देवाला कौल लावून पुन्हा हे ग्रामस्थ माघारी गावात येतात. ही गावपळण एन्जॉय करण्यासाठी चाकरमानी देखील हजेरी लावतात. रात्रीच्या वेळी आम्ही सर्वजण गाण्याच्या अंताक्षरी खेळली जाते.
जिल्ह्यात अनेक रुढी परंपरा अजूनही या काळात पारंपरिक पद्धतीने जपल्या जातात. अशीच पद्धत म्हणजे वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची गावपळन. आजही कायम जपली जाते. महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवणे आणि त्यांचा आनंद घेण निरंतर शक्य होईल.