Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान’, हे स्लोगन घेऊन रत्नागिरीकर आणि प्रशासन जोरदार काम करत आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. रत्नागिरी विमानतळही लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होईल, अशी ही महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमिनतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने मंजूर केले आहेत. लवकरच सर्वसामान्य माणसाच्या सेवेत हे दाखल होईल आणि त्याला विमान प्रवास करता येईल. विकासाची अनेक कामे करत असताना मंडणगड, चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर असेल त्याचबरोबर अन्य ९ शहरांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे काम शासनाने केले आहे. काजू बोर्डाचे ५ वर्षासाठी १३०० कोटी मंजूर केले आहेत. आंबा बोर्ड असावे अशी आंबा बागायतदारांची मागणी होती, त्याला तत्वता मान्यता दिली आहे. त्याचबरोबर साडेनऊ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला असून लवकरच आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा होतील.
पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, ५०० वर्षापासून असलेली मागणी आणि भारतीयांची आस्मिता असणारे प्रभू रामचंद्राचे मंदिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. या ऐतिहासिक आणि महत्वाच्या पूर्णतेबद्दल जिल्हावासियांच्या वतीने प्रधानमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा विकासात्मक घोडदौड करतो.
प्रत्येकाच्या जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. जलजीवन मिशनमधून होणाऱ्या नळ पाणी योजनांसाठी ११०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, सिंधुरत्न ही ऐतिहासिक योजना आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी या योजनेमधून हाऊसबोट देण्यात आली आहे. महिलांनी चालविलेली हाऊसबोट येणाऱ्या पर्यटकांना पहायला मिळेल. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे. एपीजे अब्दुल कलाम जिल्ह्यातून घडले पाहिजेत. त्यासाठी गरिबांच्या मुलांना नासा आणि इस्त्रोला पाठविणारा राज्यातील पहिला जिल्हा रत्नागिरी ठरला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्याचा ३०० कोटींचा आराखडा असून शासन निश्चित यावर्षी वाढवून देईल. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडेल. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या सर्व योजनांसाठी नियमानुसार खर्च करण्याचे नियोजन आम्ही सर्व करत आहोत. पोलिसांच्या घरांचा प्रकल्प रत्नागिरीत होत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यांच्या वाहनांचा वा सीसीटीव्हीचा प्रश्न असो, ते सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री महोदयांशी झालेल्या चर्चेनुसार एसटीप्रमाणेच ग्रामीण भागातून येणाऱ्या सीटी बसचे तिकीटदेखील महिलांना ५० टक्क्यात मिळणार आहे. लवकरच हा निर्णय होईल. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा आहे त्यादृष्टीने प्राणी संग्रहालयाच्या कामास सुरुवात झाली आहे. देशातला पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो येथे होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळ्याचा लोकार्पण सोहळा ४ तारखेला होत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठी एकत्र काम करतो. दैनंदिनी रोशन आंबेकर हिला जिल्हा माहिती कार्यालयातील शिपाई पदावर पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी याबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेते निलिमा आखाडे, ज्युली रहाटे, रिध्दी माळी, मृण्मयी चिंचचौरे, साक्षी आंब्रे, गौरव सावंत, स्वरुप शिरगावकर, मानस गावकर, श्रृती पडघन, यश खामकर यांना प्रत्येकी १ लाख बीज भांडवल व प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि बी के एल वालावलकर यांना प्रशस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यांनतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.