Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अवघ्या काही महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून सुरू झालेला आरक्षणाचा लढा लाखों मराठा समाजाच्या बांधवांनी एकजुटीने एकतेची ताकद दाखवत प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२४ रोजी मुंबईकडे निघाला. नवी मुंबईत ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून राज्यातील महायुती सरकारला न्यायालयात टिकेल असं राजपत्र काढण्यास भाग पाडले. एकजुटीपुढे सरकारला अखेर राजपत्र काढून आरक्षणाची पूर्तता करावी लागली. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणाचा आशेचा किरण मिळाला आहे. मराठा आरक्षणासाठी समाज बांधवांच्या बलिदानानंतर ४३ वर्षांनी मराठ्यांची भूमी म्हणून ओळखला जाणार्या महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाचा लढा मराठ्यांनी शेवटास नेला आहे. मात्र आता न्यायालयात सरकारकडून कशी बाजू मांडली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाटण तालुक्यातील एका छोट्याश्या गावात अण्णासाहेब पाटील यांचा जन्म झाला. साखर कारखान्यात कामगार करणार्या अण्णासाहेबांनी खडतर आयुष्य काढले. एक कामगार म्हणून काम करत असताना त्यांनी पाठीवर ओझे वाहणार्या माथाडींचे हाल डोळ्याने पाहिले होते. माथाडी कामगारांविषयी असणारी तळमळ त्यांनी कार्यातून दाखवून दिली. १९६० मध्ये अण्णासाहेबांनी माथाडी कामागारांसाठी लढा पुकारला. लढा तब्बल सहा वर्ष माथाडींचा लढा चालला. १९६९ मध्ये काँग्रेस सरकार असताना अण्णासाहेबांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला माथाडींचा कायदा करावा लागला. केवळ माथाडींचा कायदा करुन अण्णासाहेब स्थिर झाले नाहीत.
राज्यभरात विखुरलेला मराठा समाज एकसंघ करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. १९८० मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी सर्वात आधी मराठा आरक्षणाची मागणी केली होती. १९८० ते १९८२ अशी दोन वर्ष गावागावातून मराठा समाजाला आरक्षणाचे महत्व पटवून देत एकत्र जोडले. २२ मार्च १९८२ रोजी आर्थिक निकषांवर मराठा आरक्षण देण्याच्या मागणी करीत त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा मुंबईत धडकला. त्यावेळी अण्णासाहेब पाटील काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी पक्षाच्या विरोधात जात मराठा आरक्षणाची मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी ही मागणी धुडकावली. त्यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी स्वतःवर गोळी झाडून बलिदानातून शेवट केला.
अण्णासाहेबांनी सुरु केलेला मराठा आरक्षणाचा लढा हा तिथेच थांबला नाही. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याचे सुपुत्र शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी १९९० मध्ये मराठा सेवा संघाची स्थापना केली. त्यांनी देखील मराठा समाजाला एकसंघ करत आरक्षणासाठी लढा दिला होता. १९९१ मध्ये छावा मराठा युवा सेनेच्या माध्यमातून वास्तूविशारद स्वर्गीय प्राध्यापक देविदास वडजे यांनी हा लढा सुरु ठेवला तर त्यांच्याच तालमित वाढलेले अण्णासाहेब जावळे, स्वर्गीय किसनराव वरखंडे, स्वर्गीय विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांची धार कायम ठेवली होती.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात २०२१ रोजी मराठा क्रांती मूक आंदोलन केले होते. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांचे देखील मराठा आरक्षण लढ्याला योगदान मिळाले आहे. पाटणचे सुपुत्र स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या रुपाने मराठा आरक्षणाच्या मागणीची ठिणगी पडली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावातील मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे वणव्यात रुपांतर झाले. ४३ वर्षांनी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाने आरक्षणाची लढाई तुर्तास तरी मराठा समाजाने शेवटाकडे नेली आहे.