Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नागपूर लोकसभा मतदारसंघात दलित, मुस्लिम, तेली, कुणबी आणि हलबा जातीचे मतदार आहे. यामध्ये मुस्लिम, दलित काही प्रमाणात कुणबी अणि हलबा हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या जागेवर केवळ दोनदा यश मिळाले आहे. यामध्ये नितीन गडकरी यांचाच समावेश आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विलास मुत्तेमवार हे पारंपरिक मतांच्या जोरावर सलग चार वेळा निवडून आले. मात्र नितीन गडकरींच्या सर्वसमावेशक राजकारणामुळे भाजपने नागपूर लोकसभा मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा येथे प्रभावी नाही कारण मराठा समाजाचे अस्तित्व अत्यल्प आहे. मात्र ओबीसी आरक्षण आणि जात जनगणनेची मागणी येथे प्रामुख्याने दिसून येत आहे. नुकतेच नागपुरातही यासाठी आंदोलन झाल्याचे दिसून आले. भाजपमधील ओबीसी नेतृत्वाचा या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग असल्याने या आंदोलनांमुळे भाजपचे फारसे नुकसान होण्याची शक्यता नाही.
निर्णायक हलबा समाज
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी उभा असलेला हलबा समाज यावेळी चांगलाच नाराज आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नसल्यामुळे हलबा समाज उघडपणे नाराजी व्यक्त करतो. नागपुरात हलबा समाजाचे एक लाखाहून अधिक मतदार आहे. त्यामुळे ही मते भाजप आणि काँग्रेससाठी तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.
हलबासोबतच दलित आणि मुस्लिम समांजांची मतंही महत्त्वाची आहेत. असंतुष्ट हलबा, दलित आणि मुस्लिम मतदार एकत्रितपणे काँग्रेसकडे वळल्यास भाजपचा धोका वाढण्याची शक्यता आहे. मात्र हे होऊ नये यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे.
नागपुरात दुहेरी लढतींचा इतिहास
नागपुरातील सर्वच निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये दुहेरी लढत पाहायला मिळते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आधीच नगण्य असलेल्या नागपुरातील या दोन्ही पक्षांची ताकद आणखी विभागली गेली आहे. याउलट नागपूरमध्ये आंबेडकरी विचारांचा वारसा जपणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे. मात्र हे मतदार रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात विभागलेले असल्याने नागपुरात तशी निश्चित एकगठ्ठा ताकद दिसत नाही.
भाजप २०२४ ची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार, काँग्रेसचा उमेदवारच ठरेना
२०१४ नंतर नागपुरातील बदल हा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. आयआयटी, आयआयएम, एम्स, लॉ स्कूल, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, मिहान प्रकल्पातील रोजगार वाढ, उड्डाणपुलांचे जाळे, मेट्रो रेल्वे आणि सिमेंट रस्ते हे भाजपसाठी निवडणूक जिंकवून देण्यासाठी प्रचारातील मुद्दे असणार आहेत. त्यामुळे नागपुरात २०२४ ची निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे. आगामी निवडणुकीत गडकरी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वावर विसंबून मतांचे अंतर वाढवण्यावर भाजपचा भर असेल.
नितीन गडकरी यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सेवा उपक्रम, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबवून सर्वसमावेशकतेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे निवडणुकीत त्यांना प्रत्येक स्तरातून मदत मिळाली. यंदा गडकरींची ही ताकद मोडून काढण्यासाठी काँग्रेसकडे कोणतीही ठोस योजना दिसत नाही.
गडकरींविरोधात कोणताही मोठा नेता निवडणूक लढवण्यास तयार नाही
नागपूर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करायचा आहे. मात्र गडकरींविरोधात कोणताही मोठा नेता निवडणूक लढवण्यास तयार नाही. प्रफुल्ल गुडधे, नितीन कुंभलकर, नयना झाडे , रमण पैगवार, गजराज हातेवार, अण्णाजी राऊत यांच्यासह एकूण ३८ उमेदवारांनी नागपूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. यासंदर्भात त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
मात्र नागपूर पदवीधर मातादास संघाचे प्रतिनिधित्व करणारे अभिजीत वंजारी, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार, प्रफुल्ल गुडधे या तिन्ही नेत्यांची ताकद तुलनेने कमकुवत असल्याने ते जास्त प्रभाव पाडू शकतील, याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना शंका आहे.
नागपुरात गटातटात विभागलेल्या काँग्रेसने काँग्रेसचा पराभव केल्याचेही बोलले जाते. मात्र दहा वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर काँग्रेसचे सर्व नेते गटबाजी विसरून भाजपविरोधात एकवटणार का? हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र सद्यस्थितीत वेगवेगळ्या गटात विभागलेली काँग्रेस अजूनही एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे.