Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कायमची प्रवेशबंदी
- कागल तालुक्यातील मुरगूड नगरपालिकेत ठराव
- राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापुरात आले असून शुक्रवारी दुपारी चार वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते सोमय्या यांच्या मंगळवारच्या दौऱ्याबाबत काय भूमिका मांडणार याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.
किरीट सोमय्या यांनी गेल्या आठवड्यात मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर या आरोपावर तक्रार देण्यासाठी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येण्याची घोषणा केली. पण त्याला मोठा विरोध झाला. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा इशारा दिला. यामुळे जिल्ह्यातील वातावरण बिघडू नये म्हणून प्रशासनाने सोमय्या यांना कराडमध्येच अडवण्यात आलं. या पार्श्वभूमीवर आपण मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी पुन्हा कोल्हापूर जिल्हा दौर्यावर येणार असल्याचं सोमय्या यांनी जाहीर केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
नगरपालिकेने नेमका काय ठराव केला?
मुरगुड नगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत सोमय्या यांना कायमची प्रवेशबंदी करण्याचा ठराव करण्यात आला. मुरगूड पोलीस ठाण्यात ते घोटाळ्यासंदर्भात फिर्याद देणार आहेत. त्याच गावात येण्यास नगरपालिकेने ठरावाद्वारे उघडपणे विरोध केला आहे. यामुळे ते आता मुरगुडमध्ये कसे जाणार, त्यांना येण्यास विरोध होणार का, याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफ हे कोल्हापुरात आले असून त्यांच्यावर झालेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी संघर्षाची भूमिका घेणार की किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष करणार याबाबतची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सोमय्या यांनी चिथावणीखोर भाषा वापरत कोल्हापुरातील वातावरण अशांत करू नये, अन्यथा त्यांच्या मुंबई येथील घरावर मोर्चा काढू, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.