Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मध्यप्रदेश: चौ’गुना’ विजय की, हिशेब चुकता? ज्योतिरादित्य शिंदे, यादवेंद्र राव यांच्यात लढत

9

मनोज मोहिते, मध्य प्रदेश : गुना लोकसभा मतदारसंघात राजेशाही आणि घराणेशाही आमने-सामने आहे. भाजपकडून लढणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांना पुन्हा एकदा चौ‘गुना’ विजय मिळविण्याची संधी आहे, तर काँग्रेसचे उमेदवार राव यादवेंद्रराव यांना हिशेब चुकता करण्याची संधी! शिंदे आणि राव यांच्यात राजकीय द्वंद्वाची परंपरा आहे. या परंपरेला यंदा कोणते वळण मिळते, याकडे गुनावासीयांचे लक्ष लागले आहे. सारी गणिते यादवांच्या व्होटबँकेपाशी येऊन थांबली आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी यादवेंद्र राव यांचे वडील देशराजसिंह राव यांना २००२च्या पोटनिवडणुकीत हरविले आहे. तेव्हा शिंदे काँग्रेसकडून तर, राव भाजपकडून लढले होते. माधवराव शिंदे यांचे अपघाती निधन झाल्याने रिक्त जागी ही पोटनिवडणूक झाली होती. सहानुभूतीची लाट ज्योतिरादित्य यांच्या बाजूने होती. शिंदे यांना तेव्हा ७४.२८ टक्के, तर सिनीअर राव यांना १७.९१ टक्के मते मिळाली होती. ही चौपटीहून अधिक मते होती. देशराजसिंह यांनी माधवराव शिंदे यांनाही टक्कर दिली होती, पण पराभवच हाती आला होता. या निवडणुकीत शिंदे भाजपकडून आणि देशराजसिंह यादव यांचे पुत्र यादवेंद्रसिंह हे काँग्रेसकडून लढत आहेत. मागील निवडणुकीत भाजपच्या कृष्णपाल यादव यांनी शिंदे यांचा पराभव केला होता. गडात पराभव हा शिंदे यांच्या जिव्हारी लागला होताच, त्यांच्या समर्थकांनाही तो स्वीकारणे अवघड गेला होता. यंदाच्या निवडणुकीत ती सल दूर करण्याचा त्वेष कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे.

आजवर शिंदेंचे राजकारण सर्वसमावेशक राहिले आहे. अलीकडे मात्र त्यांच्या ‘स्ट्रॅटेजी’त बदल झाला आहे आणि हा कसा झाला, हे आमच्या कळण्यापलीकडे आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी मुंगावली, कोलरास या मतदारसंघांत यादवांना संधी दिली. त्यामुळे यादवांचे पारंपरिक विरोधक, पण शिंदे यांचे पारंपरिक समर्थक दुखावले आहेत. हे दु:ख प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या बाजूने किती झळकते, यावर बरेच काही अवलंबून आहे. खुद्द शिंदे यांचे समर्थक ही व्यथा बोलून दाखवित आहेत. शिंदे यांनी कधी नव्हे, ते आता जातनिहाय मेळावे सुरू केले आहेत, हेही आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे मत व्यक्त झाले. जिंकणार तर ‘महाराजा’च; मताधिक्य किती, हा आमच्या चिंतेचा विषय आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. तर, शिंदे दोन लाखांवर मताधिक्याने निवडून येतील, असा चाहत्यांना ठाम विश्वास आहे. या निवडणुकीत अन्य पक्षांचेही उमेदवार आहेत. अपक्षही लढत आहेत, पण त्यांच्याकडे कुणाचे लक्ष आहे की नाही, हा प्रश्न पडावा, अशी येथे स्थिती आहे.

सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची संधी दिली, हे फक्त शिवसेनेतच होऊ शकतं | नरेश म्हस्के

रंगायचे आहे, रंगले आहे…

निवडणूक सहा दिवसांवर आली आहे, तरीही गुना निवडणुकीच्या रंगात पुरती रंगलेली दिसत नाही. मालवाहू गाडीचालक, कामगार, हॉटेलमालक अशा अनेकांना या निवडणुकीचा गंधही नाही. दुसरीकडे गुना शहराचा परिसर सोडून ग्रामीण भागात शिरलो की, गावेच्या गावे निवडणुकीच्या रंगांत रंगलेली दिसतात. जिल्हा मुख्यालय अशोकनगर, मुंगावली, चंदेरी या तालुक्यांच्या गावांच्या वाटेवरील अनेक लहान गावांतील भिंती दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ रंगलेल्या आहेत. ग्रामीण भागात असा कट्टर सामना आहे. ग्रामीण भाग शेतीप्रधान असून गहू, चणा, धान आणि मक्याचे पीक घेतले जाते.

रखरख चंदेरी…

साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंदेरीत उन्हाळ्याच्या भरदुपारी रखरख जाणवत होती. या साड्यांच्या विक्रीची दुकाने गावाबाहेर आहेत. गावात मोजकीच दुकाने आहेत. पण एरवी साडीच्या दुकानांतील अपेक्षित लगबग येथे नाही. येथे भाजप आणि काँग्रेसची निवडणुकीनिमित्तची कार्यालये आहेत. भाजपच्या कार्यालयाला भेट दिली असता तिथे पुढच्या सभेची तयारी सुरू होती. मुले काड्यांमध्ये भाजपचे झेंडे रोवत होते. आत सभागृहात दोघे वामकुक्षी घेत होते. आताच बैठक झाली आणि कार्यकर्ते बाहेर पडल्याचे एकाने सांगितले. काँग्रेसच्या कार्यालयात मात्र कुणीच नव्हते. दुसरीकडे कुठेतरी यांचीही तयारी सुरू असावी! ऊन वाढते असल्याने मतदानही किती होते, याकडेही लक्ष लागले आहे.
वेध लोकसभा निवडणुकीचा: नाराजी, रस्सीखेच, माढ्यात वेगवेगळ्या गटांचीच तटबंदी
‘गुन्यात क्षमता नाही’

गुना शहरात क्षमता नाही. त्यामुळे इथे विकास दिसत नाही. येथे उद्योग नसल्याने साऱ्यांचा भर नोकरीत असतो किंवा व्यवसायात. माझेच उदाहरण घ्या. मी एमबीए केले आहे. बारा वर्षे नोकरी केली, पण शेवटी टॅक्सीच्या व्यवसायात उतरलो. गाडीबाज झालो. वडील अजूनही माझ्या शिक्षणावर उगाच पैसा खर्च केला, असा टोमणा मारतात, पण करता काय! देवास उद्योगांमुळे वाढले. तसे गुन्याबाबत व्हावे, असे योगेंद्रसिंह सिकरवार म्हणाले.

ना. घ. देशपांडेंचे बंधू पहिले खासदार

गुना आणि विदर्भाचे एक राजकीय नाते आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्ड्याचे व्ही. जी. देशपांडे हे ग्वाल्हेरचे पहिले खासदार होत. हिंदू महासभेकडून ते १९५१च्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्वाल्हेर आणि गुना या दोन्ही जागांवरून निवडून आले होते. हे देशपांडे म्हणजे ‘शीळ’कार ना. घ. देशपांडे यांचे बंधू. व्ही. जी. देशपांडे यांनी ग्वाल्हेरची जागा सोडली. गुनाचे प्रतिनिधित्व केले. १९५७च्या निवडणुकीत देशपांडे यांना राजमाता विजयाराजे शिंदे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. गुना हा शिंदेंचा हक्काचा मतदारसंघ झाला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.