Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लखनऊ हा भाजपचा बालेकिल्ला. १९९१पासून अटलबिहारी वाजपेयी येथून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येथून रिंगणात आहेत. ते येथून सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाकडून रविदास मेहरोत्रा उभे आहेत. ही लढाई भाजपच्या बाजूने एकतर्फी समजली जात आहे. परंतु शहरात निवडणुकीचा माहोल दिसत नाही. मध्ये एखाद-दुसरे मोठाले पोस्टर दिसतात, परंतु त्यात राजनाथ सिंह यांची छबी नाही. दिसतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. समाजवादी पक्षाचे तर एकही पोस्टर दिसत नाही. नाही म्हणायला पक्षाचे पोस्टर लावलेल्या दोन गाड्या हॉर्न वाजवत बाजूने गेल्या.
लखनऊमधील वाहतूककोंडी फोडण्यासोबतच शहराच्या विकासाकडेही प्रत्येक सरकारने विशेष लक्ष दिले आहे. सगळी प्रमुख कार्यालये, शासकीय निवासस्थाने येथे एकवटली असल्याने, विकास न होण्याचा प्रश्नच नाही, असे येथील स्थानिक सांगतात. लखनऊत ठिकठिकाणी पार्क लक्ष वेधून घेतात. परंतु यातील बहुतांश पार्क हे मायावती सरकारच्या काळात तयार झाली आहेत. मुलायमसिंह, अखिलेश सरकारच्या काळातही दोन पार्क तयार झाली. ती हिरवाई जपणारी आहेत. बाकीची भव्य, दगडी बांधकामाची आहेत. बराचसा विकास या सरकारांच्या काळातच झाला आणि भ्रष्टाचाराचे आरोपही, असे जाणकार सांगतात.
एकूणच निवडणुकीचा माहोल दिसत नसला, तरी प्रचार जोमाने सुरू असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. ही पारंपरिक भाजपची जागा आहे. इतकी वर्षे ती भाजपकडे आहे. पण म्हणून प्रचारात शिथिलता नाही. ‘पितळेच्या भांड्याला वेळोवेळी स्वच्छ केले नाही, तर ते काळवंडते. तसेच प्रचाराचे आहे. ते राजकारण आहे. कोण कशी कोणती चाल खेळेल हे समजत नाही. त्यामुळे भाजपचा प्रचार घरोघरी सुरू आहे……’ भाजपचे कार्यकर्ते विश्वासाने सांगत होते.
याच धामधुमीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ सदस्यांकडून लखनऊचा नवाबी थाट जाणून घेतला आणि ते आठवणीत हरवले. ‘वाजपेयींच्या काळात बहुमत नसल्याने इच्छा असूनही त्यांना काही निर्णय घेता येत नव्हते. पण आता तसे होत नाही. खुलेपणाने निर्णय घेता येतात. तेव्हा एक प्रकारचे दडपण असायचे……’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्त प्रकाश नारायण पांडे खुलेपणाने बोलू लागले. वाजपेयी यांच्या काळात एकदा प्रचाराची घोषणाबाजी झाल्यावर मी ‘रामलल्ला, हम आऐंगे, मंदिर वही बनाऐंगे’ असा नारा दिला. आता सवयीने बाकीचे मागून म्हणतील, असे वाटले. पण शांतता पसरली. कुणाचाच आवाज आला नाही. असे एकप्रकारचे दडपण त्यावेळी होते…’ पांडे खळखळून हसत सांगत होते. लखनऊ सर्वार्थाने बदलले आहे. वाजपेयींच्या काळात त्याची सुरुवात झाली. त्यांनी ग्रामीण भागाला अधिक महत्त्व दिले होते. काही महामार्ग झाले. पण राजनाथ यांच्या काळात अंतर्गत विकास झाला, असा दावा नगर शायन कारवा सुभाष सिंह यांनी केला.
स्मारकाचे महाराष्ट्रीय नागरिकांना आकर्षण
गोमतीनगरमधील प्रसिद्ध आणि चर्चेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणजे भव्यता. हे स्मारक महाराष्ट्राला जोडते. या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, बिरसा मुंडा, यांचे पुतळे आहेत. म्हणूनच येथे दिवसाला सुमारे अडीच हजार महाराष्ट्रीय भेट देतात. हे स्मारक मायावती यांनी विकसित केले आहे. यावेळी मायावती यांच्या पुतळ्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले होते.