Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मटा ग्राउंड रिपोर्ट: काशीत नांदते मराठी संस्कृती, गंगाघाट परिसरात आजही महाराष्ट्रीय वैभवाच्या खुणा

9

ऋतुजा सावंत,वाराणसी : काशी विश्वेश्वर मंदिराच्या पुढे दहा पावले चालल्यावर रस्ता वळतो. तिथून जरासे पुढे गेल्यावर लक्षातही येणार नाही, अशी एक गल्ली लागते. ही गल्ली जितकी लांबलचक तितकीच अरुंद. उजवी-डावीकडे वाटा फुटलेल्या आणखी गल्ल्या. बरेच चालल्यावर मराठी खुणा दिसू लागतात. मराठी भाषेतील पाट्या लक्ष वेधून घेतात आणि अखेर भेटतात ती महाराष्ट्राची मराठमोठी मंडळी. घरामध्ये प्रवेश केल्यावर कांदेपोह्याचे दर्शन होते आणि उत्तर प्रदेशातही जपलेली मराठीमोळी संस्कृती उत्तरोत्तर अधोरेखित होत जाते.

दुर्गा घाटालगतच्या या परिसरात सातशे ते आठशे कुटुंबे महाराष्ट्रातील आहेत. अगदी सांगली, साताऱ्यापासून रायगड व आपल्या बाजूच्या पनवेलपर्यंत सगळ्याच भागांत त्यांचे मूळ आहे. २०० ते ३०० वर्षांपासून या कुटुंबांचे येथे वास्तव्य आहे. काही जणांना महाराष्ट्रातील आपली मूळ गावे ठाऊक आहेत. त्यांचा तेथे संपर्क आहे, तर काहींना ते माहित नाही. पण उत्तर प्रदेशच्या हिंदी भाषिक पट्ट्यात ही मंडळी मराठी संस्कृती टिकवून आहेत. यातील काही मंडळींशी चर्चा केली असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोर साकारले. त्यामुळे परिसराचा चांगला विकास झाला आणि रोजगार मिळत आहे, असे सांगितले. या कुटुंबांतील सदस्य धर्मपाठ करतात. यात्रेकरूंच्या राहण्याचीही सोय करतात. काही जण प्राध्यापक आहेत. तर काही बँकेत नोकरीला. परंतु काही मुलांना उत्तर प्रदेशच्या बाहेर नोकऱ्या मिळाल्या, तशी त्यांच्या कुटुंबांनी येथील घरे सोडली. यामुळे येथील मराठी नागरिकांची कुटुंबे अलीकडे कमी झाली आहेत. पूर्वी येथे सुमारे एक हजार कुटुंबे राहत असत, अशी माहिती या मंडळींनी दिली.

संत ज्ञानेश्वर काशीमध्ये आले होते. त्यांनी येथेही ज्ञानेश्वरीचा उपदेश दिला. तिथपासून महाराष्ट्रीय कुटुंबांनी काशीमध्ये येणे सुरू केले. संत ज्ञानेश्वर मणिकर्णिका घाटावर निवास करायचे असे म्हटले जाते. येथेच पंडितांची सभा झाली. यामध्ये ज्ञानेश्वरीला काशीच्या पंडितांनी स्वीकारले. हत्तीवरून ज्ञानेश्वरांची शोभायात्रा काढण्यात आली. संत एकनाथ, समर्थ रामदास यांचेही काशीमध्ये आगमन झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी गागाभट्ट काशीहून महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्राचे अनेक राजे, सरदार, श्रीमंतांनी काशीमध्ये वाडे, भवनांची निर्मिती केली. नाना फडणवीस वाडा, सांगलीकर वाडा हे त्यापैकीच एक… पं. भाऊशास्त्री वझे यांच्या काशीइतिहास या पुस्तकाच्या हवाल्याने सांगलीकर वाड्यातच काशी हिंदू विद्यापीठातील संस्कृत विभागाचे प्रमुख प्रा. माधव रटाटे यांनी इतिहासाची पाने उलडली.
मटा ग्राउंड रिपोर्ट: उत्तर प्रदेश: गर्व है हम लखनऊ में है… राजधानी विकासकामांबाबत मतदार समाधानी
अस्खलित मराठी, पण त्याला एक वेगळा बाज त्यांच्या भाषेत होता. या घरांमध्ये अस्सल मराठमोळे पदार्थ बनवले जातात. अगदी कधी तरी वेगळेपण म्हणून उत्तर भारतीय पदार्थ तयार केले जातात. सणांच्या महत्त्वानुसार गोड पदार्थांचा घमघमाटही येतो. पुरणपोळी, मोदक, गुळपोळी, तिळाचे लाडू… सगळेच पदार्थ आम्ही बनवतो, असे सुनीता म्हैसकर, सुजया म्हैसकर सांगत होत्या. येथे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गुढीपाडवा असे मराठमोळे सणही उत्साहाने साजरे केले जातात. आंग्रे वाड्यातील काशी गणेशोत्सव हा येथील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव. याला १२६ वर्षे पूर्ण झाली आहेत. नूतन बालक गणेशोत्सवही अनेक वर्षांपासून सुरू आहे. या काळात भजन, कीर्तन, गोफनृत्य, पद्मगान होते, असे नूतन गणेशोत्सवाचे नारायण कृष्ण भागवत सांगत होते. ‘वंदुनिया गिरजा कुमरा, घेऊनिया फिर फेरा…’ पद्मगान त्यांनी लागलीच गाऊन दाखवले. गिरगावच्या चाळीत फिरतानाचा माहोल या बोळांमध्ये पावलोपावली दिसत होता.

महाराष्ट्रातील परप्रांतीयांच्या विरोधाचा त्रास

‘महाराष्ट्रात परप्रांतीयांविरोधात राजकीय पक्षांनी मोहीम उघडल्यानंतर येथे आम्हालाही काहीसा त्रास झाला होता. यानंतर उत्तर प्रदेश महाराष्ट्र एकता मंडळ स्थापन करण्यात आले. होमहवन करण्यात आले. परंतु आता योगी सरकारच्या काळात शांततापूर्ण वातावरण आहे. आपला समाज हा प्रामाणिक, मेहनती समजला जातो’, असे काशी महाराष्ट्रसेवा समितीचे माजी मंत्री मकरन्द म्हैसकर सांगत होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.