Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lok Sabha Elections 2024: निवडणूक आयोगाकडून पाच टप्प्यांतील मतसंख्या जाहीर, कोणत्या टप्प्यात किती झालं मतदान?
‘१७-सी या अर्जामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतांची नोंद असते. ‘ईव्हीएम’ स्ट्राँग रूममध्ये नेण्यापूर्वी सील केल्यावर ते उमेदवारांना किंवा त्यांच्या एजंटना दाखविले जाते आणि त्यांच्या संमतीजनक स्वाक्षऱ्या त्या अर्जावर घेतल्या जातात,’ याकडे आयोगाने लक्ष वेधले.
निवडणूक आयोगाला सर्व मतदान केंद्रांवरील मतदानाची अंतिम आकडेवारी त्यांच्या वेबसाइटवर जाहीर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. या निकालामुळे आयोगाच्या मतदानाच्या ‘ईव्हीएम’मधील नोंदणीकृत आकडेवारीबाबतच्या दाव्याला बळ मिळाले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर दुसऱ्याच दिवशी आयोगाने पहिल्या पाच टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी प्रसृत केली.
‘प्रत्येक मतदान केंद्रावर जर चार उमेदवारांना १७ सी हा अर्ज दिला गेला असला, तरी किमान साडेदहा लाख मतदान केंद्रे असल्याने ४२ लाखांहून अधिक लोकांकडे हा दस्तावेज असेल. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या ४२ लाख लोकांना एकाच वेळी कसे मूर्ख बनवले जाऊ शकते आणि मतदान टक्केवारीच्या आकड्यांत कसे काय फेरफार केले जाऊ शकतात,’ असा प्रश्नही आयोगाने विचारला.
पाचही टप्प्यांतील मतटक्क्यांमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे ठामपणे सांगताना, निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्यासाठी अपप्रचार करण्याची नवी पद्धती बनल्याचे आयोगाने सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादातही स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदानाची टक्केवारी वेबसाइटवर अपलोड करण्याची मागणीच अवास्तव आहे, असे निवडणूक आयोगाने न्यायालयाला सांगितले होते. ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात तशी मागणी केली होती.
तपशील ‘व्होटर टर्नआऊट’वर
निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर टर्नआउट’ ॲपवर मतदानाची टक्केवारी सतत (२४ तास) उपलब्ध असते. ती कोणीही पाहू शकते, असे आयोगाने म्हटले आहे. या ‘ॲप’वर मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी मतदानाचा अंदाजित तपशील प्रसृत केला जातो. मतदान संपल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत सर्वांत जवळच्या अंदाजानुसार ‘पोल क्लोजिंग’ टक्केवारी याच अॅपवर जाहीर केली जाते, असेही आयोगाचे म्हणणे आहे.
पाच टप्प्यांत किती मतदान?
(एकूण मतदार, मतदान करणारे कोटींमध्ये आणि मतदानाची टक्केवारी या क्रमाने)
पहिला टप्पा १६.६३-११.००-६६.१४
दुसरा टप्पा १५.८६-१०.५८-६६.७१
तिसरा टप्पा १७.२४-११.३२-६५.६८
चौथा टप्पा १७.७०-१२.२४-६९.१६
पाचवा टप्पा ८.९५-५.५७-६२.२०