Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मोहोळ यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत हा सारा प्रकार घडला. पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाणी सोडणे आवश्यक होते. जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याची सूचना २२ जुलैपासून पुणे महापालिका नियंत्रण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यांना दिली होती, असे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाने दिले. धरणातील पाण्याचा विसर्ग बुधवारी मध्यरात्री अचानक ४० हजार क्युसेकपर्यंत वाढवल्याने अनेक घरांत पाणी घुसले होते.
‘धरणातून यापूर्वीही ३० ते ३५ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले गेले. मात्र, तेव्हा पूर आला नव्हता. यंदाच ही वेळ का आली,’ असा प्रश्न विचारून मोहोळ यांनी, ‘भविष्यात योग्य खबरदारी घ्या,’ अशी तंबी जलसंपदा विभागाला दिली.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, ‘पीएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, ‘महावितरण’चे मुख्य अभियंता राजेंद्र पवार उपस्थित होते.
खडकवासला धरणातून सोडले पाणी सिंहगड रस्त्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यामध्ये फारशी वाढ अपेक्षित नाही. नदीपात्रात सांगितल्यापेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले किंवा पाणी सोडण्याचे नियोजन चुकले. त्याचा फटका पुणेकरांना बसला.– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री
नदीत पाणी सोडले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाने कळवले होते. प्रत्यक्षात विसर्ग अधिक प्रमाणात झाला. खुल्या पाणलोट क्षेत्रातून आलेल्या पाण्यामुळे विसर्ग वाढल्याचा दावा जलसंपदा विभाग करीत आहे. मात्र, त्याबाबत आम्ही काही सांगू शकत नाहीत. जलसंपदा विभाग जिल्हाधिकाऱ्यांकडे खुलासा करील.– डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका
‘महापालिकेत स्वतंत्र कक्ष सुरू करा’
हवामान खाते आणि स्कायमेट यंत्रणेकडून पावसासंबंधी मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून नियोजन करण्यासाठी पुणे महापालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली. ‘धरणात जमा होणारे पाणी तसेच विसर्ग याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सर्व यंत्रणांना माहिती द्या. विशेष मदतीबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा,’ अशा सूचना त्यांनी केल्या.
साडेचार हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
‘पूरबाधित परिसरात मदतकार्य सुरू असून सुमारे साडेचार हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना जेवण, नाश्ता, पाणी, औषधे, ब्लँकेट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहर आणि हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांच्या मदतीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात येत असून मदतीसाठीचे प्रस्ताव तत्काळ राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत. अतिवृष्टीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
पूरग्रस्त भागाची स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना अन्न, स्वच्छ पाणी देण्याची सोय करावी. नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करा.– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री