Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Baramati News: नामवंत मल्लांनी गाजवलं बारामतीचं मैदान; पहिल्या क्रमांकासाठी हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे यांच्यात झाली अटीतटीची लढत..!
या मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात झाली. प्रचंड ताकदीच्या या पैलवानांनामध्ये तुल्यबळ लढत झाली. अखेरीस ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने आणि युवा नेते जय पवार यांच्या पुढाकारातून बारामती शहरातील शारदा प्रांगणात निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं. या मैदानाला क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार दत्तात्रय भरणे, युवा नेते जय पवार यांच्यासह आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू गिता फोगट, पवनकुमार, योगेश्वर दत्त, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आदी कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात झाली. सुरुवातीला तब्बल ३० मिनिटे या दोघांमध्ये तुल्यबळ लढत झाली. त्यानंतर त्यांना १० मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला. दोघांनीही आपले कौशल्य पणाला लावल्यामुळे अखेरीस ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. दुसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी गणेश जगताप यांच्यात झालेल्या लढतीत पृथ्वीराज पाटील याने घुटना डाव टाकत विजय मिळवला.
तिसऱ्या क्रमांकासाठी महान भारत केसरी माऊली जमदाडे विरुद्ध महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख यांच्यात लढत झाली. तब्बल २६ मिनिटे झालेल्या या लढतीत बालारफीक शेख याने दुहेरी पट डावात विजय मिळवला. मुंबई महापौर केसरी भारत मदने विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी लढत झाली. त्यामध्ये भारत मदने याने निकाल डावावर ही कुस्ती जिंकली. या मैदानात महिलांच्याही कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये राज्यातील नामवंत महिला मल्लांनी सहभाग घेत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली.
आगामी काळात कुस्ती क्षेत्रासाठी शक्य ती मदत..
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत आयोजित केलेल्या कुस्ती मैदानाचं कौतुक करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच क्रीडा क्षेत्राला अधिकचं महत्व देत भरीव निधीची तरतूद केल्याचं सांगितलं. आगामी काळात कुस्ती क्षेत्रासाठी शक्य ती मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून बक्षीस देण्याबाबत अजितदादांनी सूचना दिल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम होत असतात. त्यामुळं अजितदादांनी स्थापन केलेल्या बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून हे मैदान भरवलं जावं असं सर्व सदस्यांची इच्छा होती. त्यानुसार हे मैदान आयोजित केल्याचं युवा नेते जय पवार यांनी सांगितलं. कुस्ती हा मातीतला खेळ आहे आणि ही परंपरा कायम राखायची आहे. आजच्या मैदानात केवळ पुरुषांसाठी मैदान आयोजित न करता आपण महिला मल्लांनाही संधी दिल्याचेही त्यांनी नमूद केले.