Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
प्रकाश महाजन काय म्हणाले?
जय मालोकार नावाच्या आमच्या तरुण कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पक्ष आणि पक्षाचे नेते त्याच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पुण्याच्या पूरपरिस्थितीवर राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्यावर अमोल मिटकरी यांनी सरळसरळ राज ठाकरे यांना सुपारीबाज नेता म्हटलं. ते एका वैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडे असा कुठला पुरावा आहे? ते त्यांनी सांगावं. बेछूट आरोप करणं ही मिटकरींची सवय, याआधी त्यांनी भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी अखंडित असताना ब्राह्मण समाजाविषयी अत्यंत घाणेरडे अनुद्गार काढले आहेत, याकडे प्रकाश महाजन यांनी लक्ष वेधलं
राज ठाकरेंवर टीका केल्याच्या रागातून कार्यकर्ते जाब विचारायला गेले असता झालेल्या बाचाबाचीचं पर्यवसन मिटकरींच्या गाडीवर दगडफेक करण्यात झालं. त्याचं समर्थन कुणी करत नाही, पण याचा तणाव येऊन आमच्या तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कारण मिटकरी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये बसले होते, आणि कारवाई करा म्हणून ठिय्या मांडला होता. माझं उलट म्हणणं आहे की अमोल मिटकरी, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र सरकारने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्वरित दाखल करावा, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.
शब्दाची निवड महत्त्वाची आहे. राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणायला काय पुरावा आहे? सुपारीबाज तर अजित पवार आहेत. जरंडेश्वर कारखाना त्यांनी कसा हडपला, एकत्र पवार कुटुंब असताना कन्नडचा कारखाना त्यांनी कसा हडपला? खुद्द पंतप्रधानांनी ७० हजार कोटींचा घोटाळा राज्य सहकारी बँकेत झाल्याचं सांगितलं, पण आम्ही असे मर्यादा सोडून आरोप कधी केले का? मनसेच्या वैभव खेडेकरांचा सुनील तटकरेंच्या प्रचाराला विरोध होता, पण तरी तुम्ही खेडेकरांना तयार करा, म्हणून राज ठाकरेंपाशी जाऊन बसलात. मनसेने मनापासून प्रचार केला नसता, तर रायगडचं चित्र वेगळं दिसलं असतं. तेव्हा राज ठाकरे सुपारीबाज वाटले नाहीत का? तेव्हा तुमचा फायदा होता, असा प्रतिप्रश्नही प्रकाश महाजन यांनी विचारला.
यांची साधी गाडी फुटली, तर उमेश पाटील म्हणतात राज ठाकरेंवर खटला भरा, अटक करा. मग एकाचा मृत्यू झाला, त्याला कोणाला जबाबदार धरायला पाहिजे? म्हणून मी अजित पवारांना सुपारीबाज बोललो, माझी गाडी फोडायची तर फोडा, पण मी गाडीच ठेवत नाही, स्कूटर वापरतो, ती फोडायची तर फोडा, दगड मारुन तर बघा. आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून पाठिंबा दिला, पण आता अजित पवारांनाच महायुतीत राहायचं नाही, म्हणून काहीतरी करुन भांडण काढत आहेत, असंही ते म्हणाले.