Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shriyal Shashthi Vrat 2024 : श्रीयाळ श्रेष्ठांसाठी खास मातीचा राजवाडा ! श्रीयाळ षष्ठीचे महत्त्व जाणून घ्या
Importance of Shriyal Shashthi: नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळ षष्ठी साजरी केली जाते. श्रीयाळ श्रेष्ठ यांनी दुष्काळात आपल्या घरातील धान्य जनतेला दिले तसेच समाज उपयोगी अनेक कामे केली. श्रीयाळ श्रेष्ठ शंभोशंकराचे भक्त होते. श्रीयाळ श्रेष्ठ यांच्या नावाने श्रीयाळ श्रेष्ठ असे व्रत केले जाते. ग्रामीण भागात सक्रोबा किंवा सकरोबा म्हणून त्यांची ओळख आहे. जेजुरी गडावरील मंदिरात तसेच कडेपठारावरील मंदिरात सक्रोबाचे पूजन केले जाते. या लेखात जाणून घेऊया श्रीयाळ श्रेष्ठ व्रत आणि पूजनाचे महत्त्व
Shriyal Shashthi 2024
श्रावणातील पहिला सण नागपंचमी आणि त्यानंतर येते ती श्रीयाळ षष्ठी. आपल्यकडे श्रीयाळ श्रेष्ठ व्रत करुन विधीवत पूजा केली जाते. महाराष्ट्रातील काही भागात श्रीयाळ अर्थात सक्रोबा यांच्या पूजेसाठी खास राजवाडा तयार केला जातो. हा राजवाडा तयार करण्यासाठी लागणारी माती देखील खास असते. चला तर जाणून घेऊया श्रीयाळ षष्ठीचे महत्त्व आणि उत्सवाचा थाट
श्रीयाळ षष्ठी व्रत
श्रीयाळ षष्ठी हे व्रत श्रावण महिन्यमधील षष्ठी तिथीला केले जाते. या दिवशी प्रात:काळ किंवा मध्यान्ह काळात या व्रताचे विधीवत पूजन केले जाते. या तिथीला उमा महादेवाची पंचोपचार किंवा दशोपचारी पूजा करून त्यांना वर्णवायन दिले जाते. वर्णवायन म्हणजे वालाचे दाणे बेलाच्या, विड्याच्या किंवा हळदीच्या पानावर ठेवावे. त्याच्या सोबत दक्षीणा ठेवावी. ही पूजा शिव मंदिरात केली जाते. समजा तुम्हाला ही पूजा घरात करायची असेल तर शिवपरीवाराची प्रतीमा ठेऊन ही पूजा करतात. विदर्भातील महिला श्रीयाळ षष्ठीचे व्रत पाच वर्षे करतात. हे व्रत करताना मातीचा राजवाडा केला जातो.
श्रीयाळ श्रेष्ठांच्या राजवाड्याचा थाट
श्रीयाळ श्रेष्ठ यांना काही ठिकाणी श्रीयाळ शेठ असेही म्हणतात. ते शिवभक्त असल्यामुळे त्यांना शंकरोबा किंवा सकरोबा असे ही म्हटले जाते. श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये जेजुरगड मंदिरामध्ये आणि कडेपठार मंदिरामध्ये सक्रोबा पूजन केले जाते. पूजनात खास राजवाडा तयार केला जातो. असे सांगतात हा राजवाडा तयार करण्यासाठी वारुळातील थोडी माती आणली जाते. तसेच बांबूच्या कामठ्या वापरून राजवाडा बनविला जातो. पुरातन काळात घराची सजावट करताना धान्याचा वापर केला जात असे. त्याचप्रमाणे श्रीयाळ श्रेष्ठ यांच्यासाठी राजवाडा तयार करताना गहु, तांदूळ, विविध डाळी वापरून सजावट केली जाते. फक्त एवढचं नाही तर राजवाड्याच्या आत मातीच्या भांड्यांमध्ये डाळ, तांदूळ, गहू, ज्वारी, साखर इ. धान्ये भरून ठेवली जातात. राजवाडा आतून धान्याने भरलेला असतो.
अन्न बनवण्यासाठी लागणारी मातीची भांडी ठेवली जातात.
राजवाड्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली जाते तर हवेलीच्या वरील भागामध्ये श्रीयाळची मूर्ती बनविली जाते. मंदिरातील सदरेवर आरती करून ती हवेली डोक्यावर घेऊन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. पायरी मार्गाने खाली उतरून नगर पेठेतून लेंडी ओढ्यानजीकच्या चिल्लाळाची विहीर येथे आरती करून विसर्जन केले जाते. यावेळी तरुण ढोल सनई वाजवून देवाची सेवा करतात तर पूजारी पूजेची व्यवस्था करतात.
दानशूरपणासाठी श्रीयाळ श्रेष्ठ ओळखले जातात. त्यांचे नावाने व्रत करुन किंवा त्यांची आठवण म्हणून समजासेवा केली जाते. तुम्ही यंदाच्या श्रीयाळ षष्ठीला (१० ऑगस्ट) तुम्हाला जमेल तसा दानधर्म करा किंवा एखाद्या गरजवंताला मदत करा.