Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान; स्मारक कोसळण्याच्या घटनेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्घाटनाचा मला ‘शॉकच’ होता
सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांचे स्मारक उभे करताना राज्य शासनाने ऊन, वारा, पाऊस याचा विचार केला नव्हता का ? या सरकारचा मी निषेध करते.
उद्घाटनाचा मला “शॉकच” होता
पुरंदरच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासंबंधी त्या म्हणाल्या, उद्घाटनाचा मला शॉकच होता. स्थानिक आमदार, खासदार यांना चार तास आधी कळवले गेले. काल जरी कळवले असते तरी आजचे कार्यक्रम रद्द करता आले असते. उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्याआधी केवळ चार तास आम्हाला कळवलं जात आहे. आम्हाला डावलंले जात असल्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन बैठकीत आमचा बोलण्याचा अधिकार नाकारला जातो, असे राजकाण मी याआधी पाहिलेले नाही. शरद पवार कृषीमंत्री असताना शिरुरचे तत्कालीन खासदार आढळराव पाटील यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने पवार कार्यक्रमाला गेले नव्हते, अशी आठवण सुळे यांनी करून दिली. सत्तेत आम्हीही राहिलो आहे, पण या पद्धतीचे राजकारण केले नाही, असे त्या म्हणाल्या.
गृहमंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे
हे सरकार विधानसभा निवडणूका पुढे ढकलू पाहत आहे. आज लेकीबाळी सुरक्षित नाहीत. पुण्यात पोलिसांवरच कोयता गँग हल्ले करत आहे. गृहमंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. आता निवडणूकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना दौरा करण्याचे सुचले असल्याचा टोला त्यांनी लगावला.
पुतळा बनविणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका
मुंबई: सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याचे काम करणाऱ्या ठाण्यातील कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले की, देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु किल्ल्यावर उभारलेला छत्रपतींचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला, त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. ही पंतप्रधानांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. पुतळ्याचे काम निकृष्ट का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच, पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी सुळे यांनी केली.
तर या घटनेमुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. केवळ पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे अनावरण करायचे सत्ताधाऱ्यांचे ध्येय होते. त्यामुळे त्याचा दर्जा, गुणवत्ता याची काळजी घेतली गेली नाही. हे इव्हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमिशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची एवढेच काम निष्ठेने सुरू आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला.
आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी एक्सवर पोस्ट करत, बेजबाबदार सरकारचा जाहीर निषेध. सरकार फक्त दिखाव्यांसाठी काम करते का, महापुरुषांच्या स्मारकांच्या कामातही दलाली खाल्ली का, असा प्रश्न आज पडतो. महाराष्ट्राला दलालीच्या दलदलीत अडकवणाऱ्या या टेंडरबाज सरकारला जमीनदोस्त केल्याशिवाय महाराष्ट्र आता स्वस्थ बसणार नाही. द्वेष पसरवण्याच्या गोष्टींमध्ये डराव-डराव करणारे स्थानिक नेते याबाबत सरकारला जाब विचारतील, असेही ते म्हणाले.