Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘दहिकाला उत्सव’ हर्षोल्हासात साजरा होत आहे. मुंबईतील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी उत्सवांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटी देत आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने यंदाच्या उत्सवाला राजकीय रंगही चढला आहे. कोण कुणाची हंडी फोडणार, विधानसभेत सत्तेचा थर कोण लावणार? अशा प्रश्नांसह राज्यात सुरू असलेल्या राजकीय समीकरणांवर पत्रकारांनी फडणवीस यांना विचारले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यावर फडणवीस यांनी लक्ष वेधणारी प्रतिक्रिया दिली.
निवडणूक काळात अनेक पक्षांतले अनेक जण इकडे तिकडे करत असतात. तिकडचे काही इकडे येतात, इकडचे तिकडे जातात. मागच्या आठवड्यात अनेकांनी भाजपमध्ये प्रेवश केला. त्यामुळे कोण कोणाची भेट घेतं, हे महत्वाचे नाही. मात्र, मला विश्वास आहे की, हर्षवर्धन पाटील किंवा इतरही नेते आमच्यासोबत आहेत आणि आमच्याचसोबत निवडणुकीतही असतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांची कोंडी!
इंदापूरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असून गेल्या १० वर्षांपासून दत्ता भरणे तेथील प्रतिनिधित्व करतात. अशावेळी महायुतीत विद्यमान आमदारालाच उमेदवारी द्यायची असा निकष ठरल्याने हर्षवर्धन पाटील यांची सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत कोंडी झाली आहे. मागील वेळीही विधानसभेचे तिकीट मिळत नसल्याने त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपला आपलेसे केले. आता भाजपमध्ये जाऊनही वरिष्ठ नेते विधानसभा उमेदवारीची शाश्वती देत नसल्याचे संकेत मिळताच त्यांनी पुढची पावले टाकायला सुरुवात केली आहे.
अजित पवार यांचे कट्टर समर्थक दत्ता भरणे २०१४ पासून इंदापूरमधून निवडून येत आहेत. हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी अजित पवार नेहमीच दत्ता भरणे यांना बळ देत आले. किंबहुना दादा विरुद्ध भाऊ हा संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे. आघाडी सरकारमध्ये एकत्र असताना देखील दोघांमध्ये अनेक वेळा मतभेद व्हायचे पण आघाडी धर्म म्हणून मतभेद मागे पडायचे.
गेल्या पाच वर्षांत राज्यातली राजकीय समीकरणे एवढी बदलली आहेत की कोण कोणत्या पक्षात किती दिवस राहणार याचा अंदाज लावणेही कठीण झाले आहे. बदलत्या राजकीय समीकरणांनुसार पक्षीय बदलाचा संगीत खुर्चीचा खेळ अगदी सहजरित्या खेळला जातोय. त्यामुळे स्थानिक समीकरणांनुसार अनेक नेते कार्यकर्त्यांना पुढे करून इप्सित गाठत आहेत. शरद पवार यांना मिळत असलेली सहानुभूती, हर्षवर्धन पाटील यांनी २० वर्षांत मंत्री म्हणून केलेले काम, स्थानिक राजकारणावर विशेषत: सहकारावर असलेला दबदबा पाहून यंदा इंदापूर विधानसभेची चुरस वाढलेली असेल, हे नक्की!