Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shaktipeeth Mahamarg Update: प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्यातील शेतकऱ्यांनी केलेला विरोध पाहता राज्य सरकारकडून या महामार्गाच्या कामाला ब्रेक लावला जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून सरकार शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, परभणी, धाराशीव, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून प्रस्तावित असलेल्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध आहे. विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय केला जाईल, असे स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला राज्यात फटका बसला. लोकसभा निवडणुकीत कांद्याप्रमाणे शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दाही चर्चेत होता. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला या महामार्गाचा सद्यस्थितीबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महामंडळाने अहवाल तयार करायला सुरुवात केली आहे.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचा जसा विरोध आहे, तसा काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी महामार्ग व्हावा म्हणून प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. या महामार्गाचे आरेखन, संरचना आदी तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत. तर, काही स्तरावर पर्यावरणविषयक परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळाकडून येत्या आठ दिवसांत राज्य सरकारला प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबतचा अहवाल सादर केला जाईल. या अहवालावर राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहिती महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी अद्याप निधी उपलब्ध करून दिलेली नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
असा असेल महामार्ग
नागपूरपासून ७५ आणि वर्ध्यापासून आठ किलोमीटरवरील पवनार येथून हा महामार्ग सुरू होणार आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणेपर्यंत तो जाणार असून, याद्वारे महाराष्ट्र आणि गोवा जोडले जाणार आहे. पवनार ही आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी. पेडणे येथे पत्रादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या महामार्गाद्वारे १९ तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. यात माहुर, तुळजापूर, कोल्हापूर ही शक्तिपीठे, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे, दत्तगुरूंशी संबंधित कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही स्थळे, नांदेडचा गुरुद्वारा, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि पत्रादेवी मंदिराचा समावेश आहे.