Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Good News For Mahila Bachat Gat: बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘यशस्विनी’ पोर्टलवरील बचत गटांना ‘कम्युनिटी बिझनेस सेंटर’शी (सीबीसी) जोडण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना
महिला व बालविकास विभागाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेद्वारे महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत. दुसरीकडे, विविध बचत गटांतील महिला विविध वस्तूंच्या निर्मितीचे लघु उद्योग चालवत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ राबविण्यास सुरुवात केली असून, अभियानाला ‘लाडकी बहीण योजने’ची जोड देण्यात येणार आहे. त्यासाठी महिला फेडरेशनद्वारे ‘यशस्विनी’ नावाचे ऑनलाइन पोर्टल नुकतेच कार्यान्वित केले आहे. पोर्टलद्वारे बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची खरेदी-विक्री करणे शक्य होणार आहे. बचत गटांचे स्वतःचे खाद्यपदार्थ, मसाले, कापडी पिशव्या, भरडधान्य, लाकडी कोरीव काम, पादत्राणे, बांबूच्या वस्तू गृहसजावटीच्या वस्तू यांसारखे काही उद्योग आहेत. ते सुरू ठेवून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिलांना शिलाई मशिन, मिरची कांडप, दाल मील यांसारखी साधने अतिरिक्त व्यवसायासाठी देण्यात येणार आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सव्वालाख, महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत ‘उमेद’ बचत गटांमध्ये सव्वालाख अशा सुमारे अडीच लाख बचत गट राज्यात आहेत. प्रत्येक गटात १० ते १२ महिला आहेत. त्यापैकी सुमारे दोन हजार बचत गटांनी ‘यशस्विनी’ पोर्टलवर त्यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे.
बचत गटांच्या वस्तूंसाठी बाजारपेठ
बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘यशस्विनी’ पोर्टलवरील बचत गटांना ‘कम्युनिटी बिझनेस सेंटर’शी (सीबीसी) जोडण्यात येणार आहे. ‘सीबीसी’ हा मोठा बचत गट असेल. ‘सीबीसी’ हे ‘यशस्विनी’ पोर्टलवर खरेदीच्या ऑर्डर देईल. त्यानुसार ‘यशस्विनी’ पोर्टलमार्फत त्या उत्पादनांचा पुरवठा करील. राज्यात कोणत्या भागांत एकाच प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन घेण्यात येते, अशा बचत गटांना एकत्रित करण्याचा भविष्यात विचार आहे. त्यानुसार, कपडे, खाद्यपदार्थ, पोल्ट्री, डेअरी असे व्यावसायिक बचत गट एकत्रित केले जाणार आहेत. पुढील सहा महिन्यांत बचत गटांतील ‘लाडकी बहिणीं’ना ‘लखपती बहीण’ करण्याचे उद्दिष्ट महिला व बालविकास विभागाने ठेवले आहे.
डोळ्यात तेल घालून होणार अर्जतपासणी; ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोगस अर्जांद्वारे लाभ लाटल्याने सरकारचा निर्णय
बचत गटांना नोंदणीची संधी
महिला बचत गटांसह महिला उद्योजकांची उत्पादने ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून वितरणातील दरी कमी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून ‘यशस्विनी’ हा डिजिटल ब्रँड विकसित केला असून, त्याद्वारे वस्तूंची विक्री करता येणार आहे. उत्पादित मालासाठी स्टोअरेज, ऑर्डर प्रोसेसिंग, पॅकेजिंग, शिपिंग, वेअर हाउस या सुविधा बचत गटांना उपलब्ध करून देण्याचे काम पोर्टलद्वारे केले जाणार आहे. यासाठी बचत गटांना http://yashaswini.org यावर नोंदणी अर्ज करता येणार आहे. या पोर्टलवर नोंदणीसाठी कोणतेही शुल्क नाही.
प्रत्येक बहीण लाडकी न राहता ती लखपती बहीण करण्याचे आता राज्य सरकारचे धोरण आहे. लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण धोरण एकत्रित राबवून बचत गटातील महिलांना लखपती बहीण करण्यात येणार आहे.– डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा