Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Bandra stampede at Bandra -Gorakhpur Express: मुंबईतील वांद्रे स्थानकात एका एक्स्प्रेसमध्ये चढताना चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ९ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
हायलाइट्स:
- मुंबई वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरी
- गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये चढताना घडली घटना
- नऊ प्रवाशी जखमी, दोघे गंभीर
जेव्हा इतकी मोठी घटना घडते तेव्हा रेल्वेकडून एखदा हेल्प लाइन नंबर जारी करण्यात येतो किंवा माहिती पुरवली जाते. पण, आज सकाळी जी ही इतकी भीषण घटना घडली त्याबाबत रेल्वेकडून अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. पश्चिम रेल्वेच्या अनियोजनामुळे स्थानकात इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं सांगितलं जात आहे. दरवर्षी दिवाळीला मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करतात. उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह बाहेरराज्यात जाणाऱ्या लोकांची संख्याही मोठी असते. त्यासाठी वांद्रे स्थानकातून जादा गाड्याही सोडल्या जातात. पण, त्यावेळी आरपीएफ, जीआरपी, पश्चिम रेल्वेचे कर्मचारी यांनी यासाठी कुठलंही नियोजन केलेलं नव्हतं.
पाहा गर्दीचा चित्तथरारक व्हिडिओ
ही गोरखपूर एक्स्प्रेस एक अनारक्षित गाडी होती. या गाडीत कुठलंही आरक्षण नव्हतं. अशा गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे या गाडी वेळी अधिक नियोजन करणं गरजेचं होतं. पण, ते झालं नाही आणि इतकी भीषण घटना घडली. पश्चिम रेल्वेचं नियोजन अयशस्वी झाल्याचं दिसून येत आहे. पण, याबाबत रेल्वेने कुठलीही माहिती दिली नाहीये.
दिवाळी आणि छट पूजा या सणानिमित्त १०० हून अधिक जादा गाड्या सोडल्या जात आहेत. या गाड्याही अपुऱ्या पडत आहेत. दरवर्षी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. पण, रेल्वे यासाठी नियोजन करण्यात अयशस्वी ठरली आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रेल्वे मंत्री हे मुंबईत आहेत. ते भाजपच्या नेत्यांच्या बैठका घेत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ते स्वत: लक्ष देऊन सारं काम पाहात आहेत. तर, दुसरीकडे राज्यासह देशात रेल्वे अपघात आणि अशा प्रकारच्या चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांकडून या घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारानेच ही घटना घडल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे. जखमींना तात्काळ मदत मिळाली नसल्याचाही आरोप केला जात आहे.
जखमी प्रवाशांची नावं पुढील प्रमाणे –
शबीर अब्दुल रेहमान – पुरुष (४०) परमेश्वर सुखधर गुप्ता – पुरुष (२८) रविंद्र हरिह चुमा – पुरुष (३०) रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजामती – पुरुष (२९) संजय तिलकराम कांगय – पुरुष (२७) दिव्यांशू योगेंद्र यादव – पुरुष (१८) मोहम्मद शरीफ शेख – पुरुष (२५) इंद्रजित सहानी – पुरुष (१९) नूर मोहम्मद शेख – पुरुष (१८) अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत.