Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Trainee No Stipend : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना मानधन न मिळाल्याचं समोर आलं आहे. मानधनासाठी सतत फेऱ्या मारव्या लागत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत महास्वयम् या वेबसाइटवर ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून, पात्र प्रशिक्षणार्थींना रुजू आदेश दिले होते. या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शिक्षणानुसार ६ ते १० हजार रूपये मानधन मिळणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रातील कार्यालये आदी ठिकाणी प्रशिक्षणार्थी रुजू झालेले आहेत. मात्र, त्यांचे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. काही ठिकाणी मानधन देण्यात आले आहे. मात्र, ते प्रमाण फार कमी स्वरूपाचे आहे.
मानधनासाठी राज्य सरकारने महास्वयमचे नवीन पोर्टल सुरु केले असून, त्यावर आस्थापनेच्या मार्फत लॉगइन करून हजेरी पत्रक अपलोड करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, विविध आस्थापनेतील कर्मचार्यांना याबाबत कोणतीही कल्पना नाही. प्रशासनात सुसूत्रता नसल्याने प्रशिक्षणार्थींना नाहक त्रासाचा समाना करावा लागत आहे. यात मात्र प्रशिक्षणार्थींचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना सतत कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याची माहिती एका प्रशिक्षणार्थींने दिली आहे
स्वत:ची माहितीही स्वत:च भरावी लागत आहे
महास्वयमच्या नवीन पोर्टलची माहिती आस्थापनेतील प्रमुखाने भरायची असताना त्यांच्याकडून कोणतेही दखल घेतली जात नाही. पोर्टलचा आयडी, पासवर्ड आस्थापना प्रमुखांकडे असताना बर्याच ठिकाणी सायबर कॅफेच्या मदतीने स्वतः प्रशिक्षणार्थीच त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून माहिती भरत आहेत. मात्र, ही प्रक्रिया खरी आणि योग्य आहे, याबाबत त्याच्याही मनात शंका आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावे, यासाठी हे प्रशिक्षणार्थी काम करत आहेत.
जिल्हा परिषद शाळेत गेल्या दोन महिन्यांपासून प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले आहेत. गेल्या आठवड्यात महास्वयमच्या नवीन पोर्टलवर ऑनलाईन हजेरी पत्रक अपलोड करण्याचे आदेश आलेले होते. आता पुन्हा मुख्याध्यापकांच्या सही, शिक्क्यासह केंद्र प्रमुखांकडे ऑफलाइन स्वरूपात हजेरी पत्रक द्यायचे नवीन आदेश आलेले दिसत आहेत. यात नेमके खरे काय आणि खोटे काय, काहीच कळत नाही. महास्वयमवर लॉगइन मुख्याध्यापकाने करायचे की आम्ही करायचे, याचे काहीच स्पष्ट नाही. यातून आमचा खूप मानसिक मनस्ताप होत आहे. माझ्यासारखे अनेक प्रशिक्षणार्थी या मानसिक त्रासातून जात असल्याचं प्रशिक्षणार्थीने सांगितलं.