Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nashik Central Assembly Constituency: शहरातील तीन मतदारसंघांत उमेदवार देणाऱ्या ‘मनसे’ने येथून माघार घेतल्याने या निवडणुकीला कलाटणी मिळाली आहे. काँग्रेसमधील बंडाळी थांबविण्यात ठाकरे गटालाही यश आले आहे.
सन २००९ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर नाशिक शहरातील मतदारसंघांचे विभाजन होऊन नाशिक मध्य मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघातील सामाजिक व जातीय समीकरणे काँग्रेसला पूरक असली, तरी २००९ च्या पहिल्या निवडणुकीत या मतदारसंघाने मनसेच्या बाजूने कौल दिला. वसंत गितेंनी मनसेकडून उमेदवारी करीत काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांचा ३१ हजार मतांनी पराभव केला. परंतु, २०१४ मध्ये मात्र फरांदेंनी पहिल्याच प्रयत्नात गितेंचा २८ हजार २८७ मतांनी पराभव केला. त्यानंतर २०१९ मध्ये गितेंनी माघार घेतल्याने या ठिकाणी आमदार फरांदे आणि काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांच्यात लढत रंगली. परंतु, फरांदेंनी पाटील यांचा २८ हजार ३८७ मतांनी पराभव केला. यंदा त्या हॅटट्रिकच्या तयारीत आहेत. दुसरीकडे २०१४ चा वचपा काढण्यासाठी गिते सज्ज झाले आहेत.
‘हार्ट ऑफ द सिटी’ अशी ओळख असलेल्या या मतदारसंघावर मराठा, ओबीसी, मुस्लिम आणि दलित समाजाचे वर्चस्व आहे. जातीय समीकरणांसोबतच धार्मिक मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर या मतदारसंघात भाजपऐवजी महायुती आणि ठाकरे गटाऐवजी महाविकास आघाडी असा सामना होत आहे. या मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंना साडेतीन हजारांचे मताधिक्य दिल्याने ‘मविआ’त उत्साह आहे.
या मतदारसंघात वंचितकडून माजी नगरसेवक मुशीर सय्यद रिंगणात आहेत. येथे मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या निर्णायक असली, तरी मतविभाजन होईल असे चित्र सध्यातरी नाही. मनसेचे उमेदवार अंकुश पवार यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याचा फायदा आमदार फरांदेंनाच होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांची बंडखोरी रोखण्यात गितेंना यश आले आहे. त्यामुळे दोघांचे पारडे समान झाले आहे.
मालेगाव मध्य वगळता उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकेल; गिरीश महाजनांचा दावा
विविध समस्यांची जंत्री
गोदावरी नदीच्या पुराचा धोका, पूररेषेत बांधकाम, गावठाण भाग, अरुंद रस्ते, सर्वाधिक बाजारपेठा, काझी गढीचा प्रश्न, सर्वाधिक झोपडपट्ट्या, पार्किंग, वाहतुकीची समस्या आदी प्रमुख प्रश्न या मतदारसंघात आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी ठोस नियोजनाची गरज स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
मतदारांची संख्या
पुरुष : १,७५,१४०
महिला : १,७०,१९६
तृतीयपंथी : ५७
एकूण मतदार : ३,४५,३९३