Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Tripurari Pornima 2024 Deep Daan : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपदानाचे महत्त्व आणि कथा, जाणून घ्या

9

Tripurari Purnima Importance: भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. म्हणून कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा खास असते तिला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात. 

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Tripurari Pornima 2024 Deep Daan : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपदानाचे महत्त्व आणि कथा, जाणून घ्या

Tripurari Purnima Katha Kahani : त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेवून जाणारा, प्रकाशाची वाट दाखविणारा. या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे, गंगास्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे. बौद्ध धर्मात तर असे मानले जाते की, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन आणि उपोसथ व्रत करतात. सर्व लहान-थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात.

दिव्यांची आरास

हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपूर वात लावली जाते. तसेच घरोघरी, अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात. अनेक गड-किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात. घाट, गड किल्ले दिव्यांनी सजवले जातात अगदी रांगोळीसुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते.

कार्तिकेयांचे पूजन

कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. या दिवशी दिपदान केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे. तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते.

पवित्र नद्यांमध्ये स्नान

कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे, असे सांगितले आहे. यानंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे. लक्ष्मी नारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा. सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे. सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल, तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी, असे सांगितात. या दिवशी लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी पुन्हा लक्ष्मी नारायणाची आरती करावी.

त्रिपुर वातीचे महत्त्व

त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते. काहीजण १०५ वातींचा दिवा लावतात तर काही जण ७०० वातींंचा दिवा लावतात. एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा आहे. कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे. पणतीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते. बाजारात त्रिुपर वात मिळते त्यामुळे तुम्ही त्रिपुर वातीचा दिवा लावू शकता.

त्रिपुरारी पौर्णिमेची कथा

त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकरा यांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, म्हणूनच ते त्रिपुर अरी म्हणून ‘त्रिपुरारी’ या नावाने ओळखले जातात. त्रिपुरासुरांच्या वधाची एक अख्यायिका सांगितली जाते. तारकासुरांच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्य पुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले. थोरला तारकाक्ष, मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला. ही तीन स्थानं ‘त्रिपुरे’ म्हणून ओळखली जायची. त्रिपुरे म्हणजे तीन शहरे, जी आकाशातून फिरणारी असावीत. हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत. त्या वेळी, मध्यान्ह समयी, अभिजीत मुहूर्तावर आणि चंद्र – पुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत!’ असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला होता. या त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकांत हा:हा:कार माजवला. देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली असे सांगितले जाते. काही पौराणिक कथांनुसार, श्रीविष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारांमध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. अठरा पुराणांमध्ये मत्स्यपुराणाचा समावेश आहे. श्रीविष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला, तो पुढे मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

त्रिपुर पौर्णिमेला हरिहर भेट

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णुची भेट होते ही एक महत्त्वाची भेट आहे. शंभोमहादेव विष्णुकडे येवून त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात. या दिवशी विष्णूची सहस्त्र नावे घेवून बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे. इतरवेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो. अनेक घरांमध्ये विधीवत ही पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्ध्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्ध्य देण्याची सुद्धा प्रथा आहे.
कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा, या दिवशी घरात, मंदिरात दिवा लावला जातो. दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समजातील वाईट प्रथा, परंपरा, विचार यांचा अंधार दूर होवो हीच प्रार्थना आहे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.