Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना; प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज – महासंवाद

3

  • 21 लाख 34 हजार 500 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
  • जिल्ह्यात 2 हजार 288 मतदान केंद्र
  • निवडणूकीसाठी 9 हजार 152 अधिकारी व कर्मचारी
  • 51 हजार 155 नवमतदार   

बुलढाणा, दि.19 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघासाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. मतदारसंघात एकूण 21 लाख 34 हजार 500 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 2 हजार 288 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात आले असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत.

जिल्ह्यात 21 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार : दि. 30 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 21 लक्ष 34 हजार 500 असून यामध्ये पुरुष मतदार 11 लक्ष 9 हजार 791, महिला मतदार 10 लक्ष 24 हजार 671 तर तृतीयपंथी मतदार 38 आहे.  विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे : 21-मलकापूर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 50 हजार 56, महिला मतदार 1 लक्ष 38 हजार 326 तर तृतीयपंथी 6 असे एकूण 2 लक्ष 88 हजार 385 मतदार आहेत. 22- बुलढाणा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 452, महिला मतदार 1 लक्ष 47 हजार 638 तर तृतीयपंथी 16 असे एकूण 3 लक्ष 7 हजार 106 मतदार आहेत. 23- चिखली विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 57 हजार 170, महिला मतदार 1 लक्ष 48 हजार 546 तर तृतीयपंथी 2 असे एकूण 3 लक्ष 5 हजार 718 मतदार आहेत. 24-सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 68 हजार 601, महिला मतदार 1 लक्ष 54 हजार 393 तर तृतीयपंथी 1 असे एकूण 3 लक्ष 22 हजार 995 मतदार आहेत. 25-मेहकर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 378, महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 578 तर तृतीयपंथी 4 असे एकूण 3 लक्ष 5 हजार 960 मतदार आहेत.26- खामगांव विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 55 हजार 632, महिला मतदार 1 लक्ष 42 हजार 285 तर तृतीयपंथी 5 असे एकूण 2 लक्ष 97 हजार 922 मतदार आहेत. तर 27-जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 505, महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 905 तर तृतीयपंथी 4 असे एकूण 3 लक्ष 6 हजार 414 मतदार आहेत.

जिल्ह्यातील सातही मतदारसंघात 85 वर्षावरील जेष्ठ मतदार 29 हजार 201, दिव्यांग 18 हजार 26 तर या निवडणूकीत प्रथमच मतदान करणारे 51 हजार 155 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

जिल्ह्यात 2 हजार 228 मतदान केंद्र : जिल्ह्यात लोकसभेसाठी 2 हजार 265 मतदान केंद्र होती. यात 23 नविन मतदान केंद्रांची वाढ होऊन विधानसभा निवडणूक 2024 साठी जिल्ह्यामध्ये 2 हजार 288 मतदान केंद्र आहे. जिल्ह्यात 350 सर्वाधिक मतदान केंद्र मेहकर येथे असून सर्वात कमी 305 मतदारसंघ मलकापूर येथे  आहे. बुलढाणा येथे 337, चिखली 317, सिंदखेड राजा 340, खामगांव 322 तर जळगाव जामोद येथे 317 मतदान केंद्र आहे. एकूण मतदान केंद्राच्या 50 टक्के मतदान केंद्रावर वेब कॉस्टींग केल्या जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला व दिव्यांग मतदान केंद्र स्थापित करण्यात आले असून युवासाठी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी सहा मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात 115 उमेदवारांमध्ये लढत : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात 115 उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. मतदारसंघनिहाय उमेदवारांची माहिती याप्रमाणे : मलकापूर येथे 15, बुलढाणा येथे 13, चिखली येथे 24, सिंदखेड राजा येथे 17, मेहकर येथे 19, खामगांव येथे 18 व जळगांव जामोद येथे 9 असे एकूण 115 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

मतदान पथकांच्या वाहतुकीसाठी व्यवस्था : मतदान पथके नेमुन दिलेल्‍या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मुख्यालयावरुन नियोजित मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले असून मतदान पथकांचे परिवहन व्यवस्थेकरीता एस.टी महामंडळाची   बसेस 268,  स्कुल बस 56, जीप 359 व ट्रक 17 वाहन वापरण्यात येणार आहेत.

ओळखीसाठी 12 पुरावे ग्राह्य : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळख पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे. त्यामध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

मतदानाच्या दिवशी सुट्टी : प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे याकरिता शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. ही  सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व स्थापना कारखाने दुकाने इत्यादींनाही लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता, येईल असेही शासनाने जाहीर केले आहे.

मतदानासाठी मुनष्यबळ व बंदोबस्त : मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सातही मतदारसंघातील 2 हजार 288 मतदान केंद्रासाठी 9 हजार 152  मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले असून मतदारसंघनिहाय माहिती याप्रमाणे : मलकापूरसाठी 1 हजार 220, बुलढाणासाठी 1 हजार 348, चिखलीसाठी 1 हजार 268, सिंदखेड राजासाठी 1 हजार 360, मेहकरसाठी 1 हजार 400, खामगांवसाठी  1 हजार 288 तर जळगाव जामोदसाठी 1 हजार 268 अधिकारी व कर्मचारी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे. तर 702 मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनामार्फत आवश्यक प्रमाणात पोलीस बल तैनात ठेवण्यात आला असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीकरीता मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी आठवडी बाजारामुळे मतदान केंद्राच्या परिसरात गर्दी होऊन मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा पोहोचू नये म्हणून संबंधित गावांतील आठवडी बाजार दि. 20 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहे.

वोटर हेल्पलाईन ॲप सुविधा : मतदारांच्या सोयीसाठी व त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्याकरीता वोटर हेल्पलाईन ॲप, हेल्पलाईन व लिंक तयार करण्यात आले आहे.  https://electoralsearch.eci.gov.in  या लिंकवरुन किंवा 1950 किंवा Voter Helpline App: https://play.google.com/store/apps/details?id =com.eci.citizen चा वापर करावा.

 विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील 1 हजार 144 मतदान केंद्रावर वेब कास्टींगव्दारे निगरानी ठेवली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रावर सावली मंडप, प्रतिक्षा कक्ष, एनएसएस/एनसीसी स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक आदी सुविधा मतदारांना पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

0000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.