Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि.१३: महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केले आहे. आता 2028 ते 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बिकेसी, वांद्रे येथे 13 ते 15 डिसेंबर दरम्यान आयोजित वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद, अध्यक्ष राजेश शर्मा, प्रमुख वक्ते पद्मश्री टी. व्ही. मोहनदास पै, सहसचिव शैलेश त्रिवेदी यासह जगातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच मात्र भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी बनेल. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेने भारताची संस्कृती आणि विविध क्षेत्रातील विकास तत्वावर आधारित वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या आहेत. पाश्चिमात्य आणि आपल्या संस्कृतीमध्ये मूलभूत अंतर आहे. पाश्चिमात्य संस्कृतीत जो सक्षम आहे तोच विकास करू शकतो मात्र, आपल्या संस्कृतीमध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याचा हक्क आणि अधिकार आहे .
भारताच्या नेत्रदीपक प्रगतीने सर्व जगाला थक्क करून टाकले आहे. सर्वाधिक गतीने पुढे येणारा भारत जगात तिसरी महासत्ता म्हणून पुढे येत आहे. जगातील लोक म्हणत होते की, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश कशाप्रकारे प्रगती करू शकतो? परंतु देशातील कुशल मनुष्यबळ हेच विकासाचे महत्त्वाचे साधन असून प्रत्येकाला विकासामध्ये सोबत घेऊन जात आहोत असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र आज मोठ्या गतीने पुढे जात आहे. महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी सल्लागार कमिटीची स्थापना केली असून यामाध्यमातून महाराष्ट्र कोणकोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो याचा अभ्यास करुन यावर आधारित महाराष्ट्राच्या विकासाची धोरणे आखली जात आहेत. जागतिक पातळीवरती महाराष्ट्र विकासाला पूरक एक साखळी बनवत आहे. यामध्ये लॉजिस्टिक धोरण, सर्वाधिक गतिमान रस्त्यांचे जाळे बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग 700 किलोमीटर असून जो 16 जिल्ह्यांना जोडला आहे. हा महामार्ग थेट जेएनपीटी या बंदराला जोडला आहे, यातून अत्यंत चांगल्या पुरवठादारांची साखळी निर्माण होत आहे, रस्ते, विमान वाहतूक, बंदर विकास या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर राज्य शासन भर देत आहे. देशासोबतच महाराष्ट्राला मेरीटाईमची ताकद बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ध्यास आहे. सन 2014 पासून पंतप्रधान श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला गती दिली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगीतले.
पंतप्रधान श्री. मोदी यांनी देशाच्या विकासाला गती देणारी नवीन धोरण बनवले आहेत. भारताने गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेवरती आणले आहे. सन 2030 पर्यंत भारताला 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवणार आहोत. हे उद्दिष्ट आम्ही 2028 पर्यंतच पूर्ण करू. जागतिक पातळीवरील आर्थिक संस्थांच्या माध्यमातून भारत देश सात ट्रिलियन इकॉनॉमीचे किंवा 9 ट्रिलियनचेही उद्दिष्ट गाठू शकतो असे सर्वेक्षण समोर येत आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित विकासावर अधिक भर देण्यात येत आहे. सन 2020 च्या देशपातळीवरील विकास सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र देशात भू-जल पातळीमध्ये देखील प्रथम होते. राज्यातील वनांचे आच्छादन देखील जास्त आहे. ग्रीन ऊर्जा, नदीजोड प्रकल्प यातून शाश्वत विकासावरती राज्य शासन भर देत आहे असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी सांगितले.
प्रमुख वक्ते पद्मश्री टी. व्ही. मोहनदास पै म्हणाले की, देशामध्ये उपलब्ध मनुष्यबळ हे आपल्या विकासाचे बलस्थान आहे. विकसित भारत हेच भारताचे भवितव्य आहे. भारतीय संस्कृती हा विचार आहे तो जगात पुढे नेणे गरजेचे आहे. युवांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणे, आरोग्य, शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, महिला सबलीकरण यावरती काम होणे गरजेचे आहे. भारताला जगातील महसत्ता बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे विकासाचे अनेक पैलू यावेळी श्री. पै यांनी मांडले.
०००
०००