Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न – महासंवाद
बीड, दि. ३० (जि. मा. का.): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागप्रमुखांची बैठक झाली. जिल्हा पातळीवरील नागरी समस्या, सुरक्षा आणि इतर विविध मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक सूचना केल्या. सर्व प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका ठेवून काम केल्यास बीडबाबत सर्वत्र निर्माण झालेले वातावरण बदलेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील नियोजन सभागृहात चालू वर्षाचा नियोजन आराखडा आणि त्यात आतापर्यंत झालेल्या खर्चाची स्थिती याचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात सर्वसाधारण योजनेचा आराखडा 484 कोटीचा असून अनुसूचित उपयोजना आराखडा 129 कोटींचा आहे. यासोबतच ओटीएसपी अंतर्गत 2 कोटी 50 लक्ष अशी एकूण 615 कोटी 50 लाखांचा नियतव्यय मंजूर आहे. यात सर्वसाधारण अंतर्गत चार 467.70 कोटी रुपयांच्या च्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यंत्रणांना 125.39 कोटी (एकूण रकमेच्या 40 टक्के) निधी वितरित करण्यात आलेला आहे. ज्यात जानेवारी अखेर 123.3 कोटी खर्च झाला आहे.
एकूण आराखड्यातील 536.44 कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली असून त्यातील वितरित एकूण निधी 156.48 कोटी व खर्च 154.3 कोटी इतका आहे.
यावेळी आज झालेल्या या बैठकीस व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, तसेच खासदार रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, बीडचे पालक सचिव तथा आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे तसेच जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने, पोलिस अधिक्षक नवनित कॉवत व सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांची उपस्थिती होती.
नियोजन समिती सदस्यामध्ये आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, सुरेश धस, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित. आदी या बैठकीला उपस्थित होते.
बीडमध्ये गुंतवणूकदार येण्यासाठी वातावरण बदलणे आवश्यक आहे या भूमिकेतून काम करा गुंतवणूक येण्यासाठी आवश्यक अशी मुंबई ते बीड थेट रेल्वे सुरू करण्यासोबतच येणाऱ्या काळात बीडसाठी विमानतळ देण्याबाबतही सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील यापुढील सर्व जिल्ह्यांचा उर्वरित निधी आढाव्यानंतर मोकळा करू त्यामुळे सर्वांनी आताच कामाला लागावे असेही ते म्हणाले. नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी आधी शहर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्यावे पुढील भेटीत मला संपूर्ण शहर स्वच्छ दिसले पाहिजे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
आज या बैठकीपूर्वी त्यांनी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांकडून विविध कामांचा आढावा घेतला व सर्वांनी चांगले काम करावे अशा सूचना देताना कामात दिरंगाई करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशाराही दिला.
नियोजन समितीच्या बैठकीत यावेळी प्रशासनातर्फ सर्वांचे स्वागत संविधान देऊन करण्यात आले. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी यावेळी आढाव्याचे सादरीकरण केले. आरंभी सर्वांच्या उपस्थितीत निपूण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता संख्याज्ञान विषयक मिशन जरेवाडी या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.आज 30 जानेवारी हुतात्मा दिन असल्याने बरोबर 11.00 वाजता सर्वांनी 2 मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन या सभेदरम्यान केले. सभेच्या यशस्वितेसाठी जिल्हा नियोजन अधिकारी, डॉ. सुधिर चिंचाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच नियोजन विभागाचे इघारे आणि इतरांनी परिश्रम घेतले.
पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा पहिलाच बीड दौरा होता. आजच्या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी प्रत्येक सदस्याला म्हणणे मांडण्याची संधी दिली. यावेळी उपस्थित सर्व सूचना पालक सचिवांनी आढावा घेत मुंबईत पाठवाव्यात असेही निर्देश त्यांनी दिले.
००००