Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. अशा या विशेष संमेलनानिमित्त लातूर जिल्ह्यातील बोलीभाषेचे वेगळेपण मांडणारा हा लेख…_
भाषा ही एक सामाजिक संस्था असून तो मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भाषेच्या अस्तित्वाशिवाय दैनंदिन, भावनिक, वैचारिक आणि व्यावहारिक देवाण घेवाण अशक्य आहे. म्हणूनच लेखक ज्या परिसरात जन्मतो, तेथील भाषा शिकतो, त्या परिसरातील बोलीभाषेमधील शब्दांचा, भाषेचा उपयोग करून आपल्या सुख-दुःखात्मक अनुभवांची मांडणी आपल्या साहित्यातून करत असतो. मराठवाड्यातील लातूरच्या परिसरातील, मराठी ग्रामीण साहित्यातून अभिव्यक्त झालेल्या भाषाशैली मधून हे दिसून येते. ग्रामीण साहित्याशी नाळ बांधून लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी ग्रामीण परिसर जिवंत करण्यासाठी तेथील वास्तवाबरोबरच ग्रामीण बोलीभाषेचा वापर केला आहे. ग्रामीण कथा, कादंबरी, कविता आदि साहित्यप्रकारातून लातूरच्या बोलीभाषेचा पदोपदी प्रत्यय येतो, हे लातूरच्या मराठी ग्रामीण साहित्यातील भाषाशैलीचे ठळक वैशिष्ट्ये आहे.
लातूरची भूमी कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात नेत्रदीपक अशी आहे. या मातीचा सुंगध घेऊन आलेली शब्दकळा ग्रामीण साहित्यातून बोलीरूपाने आजही दरवळत आहे. रा.रं. बोराडे, शेषराव मोहिते, जनार्दन वाघमारे, योगीराज माने, भास्कर बडे, फ. म. शहाजिंदे, सुरेंद्र पाटील, बी. एम. देशमुख, श्रीराम गुंदेकर, प्र.ई. सोनकांबळे, ललिता गादगे, विलास सिंदगीकर, अंबादास केदार आदी लातूरच्या ग्रामीण दलित साहित्यिकांच्या साहित्यातून ग्रामीण भाषेतील शब्दकळा, म्हणी, वाकप्रचार, प्रतिमा, प्रतीके, उपमा, अलंकार, आदिंचा वापर केलेला असल्यामुळे भाषेला एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्यात बोलीभाषेचा जिवंतपणा आला आहे. म्हणूनच लातूरच्या अस्सल ग्रामीण बोलीभाषेतील मराठी ग्रामीण साहित्य हे लातूरचे खरे भूषण आहे.
मराठवाडी बोली वेगळी आहे असे म्हणण्या इतपत या बोलीत वेगळेपणा आहे. निजामी सत्तेतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक दृष्टीने संपन्न आहे. मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र्य जाणिवेची भाषा बोलली जाते. लातूर जिल्ह्यातील भाषेवर उर्दू, कन्नड, तेलगू, इंग्रजी व शेजारच्या जिल्ह्यातील भाषांचा प्रभाव दिसतो. लातूरच्या बोलीभाषेचा विचार लातूर जिल्ह्यातील ग्रामीण-दलित लेखकांच्या साहित्याधारे अभ्यास करावा लागतो. आधुनिक युगातही हा वेगळा प्रभाव या भाषेवर दिसतो.
लातूर कर्नाटकी सीमेवर असल्यामुळे कर्नाटकी ‘हेल’ काढून ही बोली बोलली जाते. शब्द, वाक्यरचना, म्हणी, वाक्यप्रचार या सगळ्यावरच कन्नड प्रभाव आहे. लातूर जिल्ह्यातील माणूस बोलताना उंच पट्टीत ‘का करुलालाव की आन् का नाय की’ असे भेटल्याभेटल्या बोलायला सुरुवात करतो. याशिवाय ‘गिरा लावणे’ म्हणजे ‘ग्रहण लावणे’ एखाद्याचे कुणामुळे तरी नुकसान झाले असेल किंवा काही संकटे येत असतील तर ‘गिरा लावला’ असा शब्दप्रयोग आजही केला जातो. ‘नकर’ म्हणजे ‘थोडसे’, ‘उगं नकर लागल्यालं हाय’ तसेच ‘कुठे आहेत’ असे म्हणायचे असेल तर ‘कुठ हाव’ असा शब्दप्रयोग केला जातो. तसेच मटमन (मटकन), आपरुग (आपरुक), मुरगाळून (पाय दुमडून), दलिद्री (दरिद्री), टुचभर (थोडसं), जवारी (ज्वारी), आगरी (शेकोटी) असे वेगवेगळे शब्दप्रयोग ग्रामीण भागात बोलले जातात.
लातूर जिल्ह्यातील स्त्रियांच्या तोंडी माय, कडू, हाट्या असे अनेक शब्द वापरले जातात. निजामी राजवटीचा प्रभाव मराठवाडा-लातूरवर असल्यामुळे निजामी राजवटीतील वक्त, कैफियत, जुमला, हमिशा, इमाम, मोगलाई, फितवून, फारारे, मुनिम, दम, कोशिश असे कितीतरी शब्द लातूरच्या मराठी बोलीभाषेत वापरले जात आहेत. थोडक्यात, लातूरच्या भाषेवर निजामी राजवटीचा प्रभाव असल्यामुळे ती वेगवेगळ्या ढंगाने बोलली जाते हे लातूरच्या मराठी भाषाशैलीचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच अशा भाषाशैलीचा प्रभाव लातूरच्या मराठी ग्रामीण साहित्यातून आजही ठळकपणे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील साहित्यिकांनी लातूरच्या अस्सल मराठमोळी मराठवाडी भाषाशैलीमधून ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन आपापल्या कथा, कविता, कादंबरी, नाटक आदि साहित्यप्रकारातून घडविले आहे. आजही ग्रामीण जीवनातील रुढी, प्रथा, परंपरा, कृषिसंस्कृती, निसर्ग, नातेसंबंध, शेतकरी, शेतमजूरांच्या जीवनाचा दस्ताऐवज ग्रामीण भाषाशैलीमधून मांडला जात आहे.
मराठी ग्रामीण साहित्यातील आघाडीचे कथा कादंबरीकार प्राचार्य रा.रं. बोराडे लातूर जवळील काटगावचे होते. त्यांनी लातूरची पहिल्यांदा अस्सल ग्रामीण शब्दकळा आपल्या साहित्यातून मांडून या बोलीचा परिचय मराठी साहित्याला करून दिला. ‘पेरणी’, ‘ताळमेळ’, ‘वरात’, ‘नातीगोती’, ‘बोळवण’, ‘वाळवण’, ‘फजितवाडा’, ‘माळरान’, ‘राखण’, ‘गोंधळ’, ‘खोळंबा’ आदी कथासंग्रह तर ‘पाचोळा’, ‘सावट’, ‘चारापाणी’, ‘आमदार सौभाग्यवती’, ‘इथं होत एक गावं’, ‘रहाटपाळणा’, ‘राजसा’ कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्यातून लातूर, धाराशिव (तत्कालीन उस्मानाबाद) परिसरातील ग्रामीण बोलीभाषेचा सुयोग्य वापर केलेला आहे. रा.रं. बोराडे यांच्या ‘पाचोळा’ या कादंबरीतील बोलीभाषेसंदर्भात डॉ. विठ्ठल जंबाले असे म्हणतात की, ” ‘पाचोळा’ ही बोराडे यांची बहुचर्चित कादंबरी. निवेदन आणि संभाषणाकरिता बोलीभाषेचा वापर असल्यामुळे ही कृतीचे वेगळेपण दर्शविते. पहिल्या वाक्यापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत या कादंबरीत बोलीभाषेचा (ग्रामीण भाषेचा) सर्जनशील वापर केल्यामुळे ही कादंबरी नजरेत भरते. कादंबरी कथनाचे सामर्थ्य बोलीभाषेत आहे. विशेषतः मराठवाड्यातील लातूर परिसरातील बोली या कादंबरीत योजिली आहे.” म्हणजे, ‘पाचोळा’ या कादंबरीतून लातूर परिसरातील बोलीभाषेचा यथोचित वापर केला आहे.
शेषराव मोहिते यांनी ‘असं जगणं तोलाचं’ व ‘धूळपेरणी’ या कादंबऱ्यामधून ग्रामीण भाषा शैलीतून शेतकरी जीवनाचे चित्रण केले आहे. शेषराव मोहिते यांच्या कांदबऱ्या संदर्भात डॉ. गणेश देशमुख असे म्हणतात की, “लग्न, त्यासाठी कर्ज, शेतीवर ते फेडण्याची इच्छा व उत्पन्न येऊनही ‘भाव’ न मिळाल्याने शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करणारा या कादंबरीतील ‘हाणमू’ आजच्या शेतकऱ्याचे प्रतिनिधिक रूप आहे. केवळ समस्या मांडून चालणार नाही तर त्यावर प्रभावी उपाययोजना सूचविण्याची चिंतनशील वृत्ती जोपासणारे मोहिते शेतकरी जीवनाशी कमालीची निष्ठा बाळगून आहेत. तर ‘धूळपेरणी’ शेती व गावापासून तुटू पाहणाऱ्या ‘श्रीराम’ ची शेतकऱ्यांच्या नव्या पिढीची कहाणी येते.” अर्थात् शेषराव मोहिते यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शोकात्म जीवन, त्यांच्या समस्या याचे वास्तव चित्रण लातूर परिसरातील ग्रामीण बोलीभाषेतील शब्द, म्हणी, वाक्यप्रचार आणि ग्रामीण जीवनातील निसर्गविषयक प्रतिमा, प्रतीके यांचा वापर करून केला आहे. त्यामुळे त्यांच्या कादंबरीलेखनात जिवंतपणा आलेला आहे.
जनार्दन वाघमारे यांनी ‘बखर एका खेड्याची’ या कादंबरीतून १९९३ साली झालेल्या भूकपामुळे किल्लारी परिसरातील विशेषतः ‘कौठा’ गावात झालेल्या जिवित व वित्तहानीचे चित्रण ग्रामीण भाषाशैलीत केले आहे. याशिवाय ‘मूठभर माती’ या आत्मकथनातून या परिसरातील त्यांचे अनुभव सांगितले आहेत.भास्कर बडे यांनी ‘चिकाळा’ या कथासंग्रहातून ग्रामीण समाजजीवनाचे दर्शन ग्रामीण भाषाशैलीतून घडविले आहे. ग्रामीण व प्रमाण भाषेतून स्वतःचा जीवनपट उलगडला आहे. त्यांच्या भाषेवर लातूर व बीड जिल्ह्यातील बोलीभाषेचा प्रभाव आहे. फ. म. शहाजिंदे यांनी ‘निधर्मी’, ‘शेतकरी’, ‘ग्वाही’ आदि काव्यसंग्रहातून ग्रामीण भाषाशैलीत सामाजिक व्यथा, वेदनांनी भरलेले समाजवास्तव चित्रित केले आहे. याशिवाय ‘मीतू’ ही प्रेमपत्रात्मक कादंबरीही लक्षणीय आहे. सुरेंद्र पाटील यांनी ‘चिखलवाटा’ आणि ‘झुलीच्या खाली’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या. मधून ग्रामीण शेतकऱ्याच्या समस्या, कृषिसंस्कृती यांचे ग्रामीण भाषाशैलीतून दर्शन घडविले सुरेंद्र पाटील यांच्या साहित्य लेखनातून लातूर जि जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील कर्नाटकातील कानडी भाषेचा पडलेला प्रभाव याचे यथार्थ दर्शन घडविले आहे.
डॉ. श्रीराम गुंदेकर यांचे ‘उचल’ व ‘लगाम’ हे दोन कथासंग्रह प्रकाशित आहेत. सत्यशोधली संशोधन व म. फुले यांच्या विचाराला आयुष्यभर त्यांनी वाहुन घेतले आहे. त्यांनी कथावाङमयातून अत्यंत प्रभावीपणाने लातूरच्या बोली भाषेचा वापर केला. श्रीराम गुंदेकर यांच्या भाषाशैलो संदर्भात डॉ. वासुदेव मुलाटे असे म्हणतात की, “श्रीराम गुंदेकरांना प्रत्यक्ष ग्रामीण जीवनाचा अनुभव आहे. किंबहुना त्या व्यथापूर्ण ग्रामीण वास्तवाशी त्यांची नाळ अजूनही तुटलेली नाही. याचा प्रत्यय देणारी अनेक स्थळे त्यांच्या कथांमधून सापडतात. बहुतेक कथा कधी संपूर्ण बोलीभाषेतून तर कधी बोलीशी जुळेल अशा प्रमाणात शेती शब्दांची, वाक्यांची सरमिसळ करून लिहिल्यामुळे प्रत्ययकारितेत भरच पडली आहे.” म्हणजेच श्रीराम गुंदेकर यांच्या कथालेखनात कधी ग्रामीण बोलीभाषा तर कधी बोलीशी जुळेल अशी प्रमाणभाषा त्यांनी वापरलेली आहे.
मराठवाड्यातील – लातूर परिसरातील साहित्यिकांच्या भाषेवर उर्दू, कानडी, इंग्रजी, हिंदी अशा देशी – विदेशी भाषेचा प्रभाव आहे. कारण या विविध भाषेतील शब्दांचा वापर कळत-नकळतपणे लेखक कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक आदि साहित्यप्रकारातून करत आहेत. म्हणूनच डॉ. प्रल्हाद लुलेकर असे म्हणतात की, “मराठवाड्यातील भाषेवर १९४८ पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या उर्दू भाषेचा, शेजारच्या कन्नड आणि तेलगू भाषेचा, खानदेशातील अहिराणीचा, काही प्रमाणात वऱ्हाडीचा परिणाम झाल्याने त्याचे परिणामही भाषेला लाभले आहे. सहचर्याचा हा परिणाम अपरिहार्य असतोच याचाच अर्थ असा की, लातूर परिसरातील साहित्य हे विविध भाषेतील शब्दांचा कमी अधिक प्रमाणात वापर करून निर्माण झालेले आहे, होत आहे. हे लातूरच्या भाषाशैलीचे ठळक वैशिष्ट्ये आहे.
लातूर परिसरातील लोकांच्या आणि साहित्यिकांच्या भाषा शैलीवर सीमाभागातील कानडी, भाषेचा प्रभाव प्रभावीपणे आजही जानवतो आहे. लातूर जिल्ह्याची बोली कन्नड ढबीने बोलली जाते. यामध्ये कोणतेही वाक्य बोलताला उच्चार सुलभ करून बोलण्याची प्रवृती दिसते, तसेच कर्नाटकी शैलीपेमाणे हेल काढून बोलण्याची सवय दिसते. बोलत असताना बऱ्याच वेळा क्रियापद अगोदर बोलले जाते व नंतर बाकीचे वाक्य बोलले जाते. उदा जाताव का ये गावाला ? (गावाला जाता का?) तसेच बोलताना बऱ्याच वेळा वाक्याच्या मध्ये शेवटी हेल काढून ‘ये’ चा उच्चार केला जातो. लातूर जिल्ह्याच्या बोलीत बरेच नवीन शब्द दिसतात ते महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या इतर भागात हे शब्द वापरले जात नाहीत. उदा. ‘नकर’ हा शब्द ‘थोड’ साठी वापरला जातो. उदगीर परिसरात हा शब्द सर्रास वापरला जातो. औसा तालुक्यात ‘बोगाणं’ हा शब्द ‘भगुणं’, पातेलं यासाठी वापरला जातो. तसेच याच पारिसरात ‘आयनास’ हा शब्द ‘अनायसे’ साठी वापरला जातो. आणखी खूप वेगळे शब्द लातूर जिल्हा परिसरात बोलले जातात. स्त्रिया, पुरुष, लहान मुले यांच्या बोलीत फरक असलेला दिसतो.
– प्राचार्य डॉ. आशा मुंडे
श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला महाविद्यालय, लातूर
(लातूर : वसा आणि वारसा ग्रंथातून साभार)