Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे – महासंवाद

11

नवी दिल्ली येथे २१-२२-२३ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत होणारे हे साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत. या संमेलन निमित्ताने ‘मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे’ या लेखाद्वारे सुरुवातीच्या कालखंडातील लेखन-प्रकाशन क्षेत्राचा घेतलेला हा आढावा…!

मराठी प्रकाशनाचे आद्य प्रवर्तक म्हणून कलकत्त्याच्या डॉ. विल्यम कॅरी यांच्याकडे पहिले जाते. त्यांनी बंगालमधील श्रीरामपूर येथे सन १८०५ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘मराठी भाषेचे व्याकरण’ या देवनागरी लिपीतील पुस्तकाने मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली. एकोणिसाव्या शतकात भारतात पोर्तुगीजांनी मुद्रणयंत्रे आणून धर्मप्रचाराच्या दृष्टीने काही ग्रंथ प्रकाशित केले. त्याला व्यावसायिक स्वरूप नव्हते. कालांतराने सरकारी व खाजगी शाळांसाठी क्रमिक पुस्तकांची आवश्यकता भासू लागल्यावर मराठी साहित्यिकांच्या मदतीने सरकार स्वतः पुस्तके तयार करून वाटप करू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेर २,१९३ पुस्तके प्रसिद्ध झाल्याची नोंद मिळते. विसाव्या शतकातही शालेय पुस्तकांचीच प्रकाशने अधिक होती. १९१९ मध्ये पहिले महायुद्ध संपले. भारताचे इतर देशांशी वैचारिक दळणवळण सुरू झाले. विल्यम कॅरी हे ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार, तसेच मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक, मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ, बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते. दिनांक १० जानेवारी १८०० रोजी कलकत्त्यापासून २९ किलोमीटरवर असलेल्या श्रीरामपूर येथील डॅनिश वसाहतीत आले. तेथे त्यांनी चर्च व शाळा काढली. एक छापखाना उभारला. ते बंगाली, संस्कृत आणि पौर्वात्य संस्कृती भाषांशिवाय ते इंग्रजी, फ़्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू भाषांत पारंगत होते. आपल्या छापखान्यातून सन १८३४ पर्यंत त्यांनी बंगाली व मराठीसह नागरी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, कानडी, तेलुगू, पंजाबी, उडिया, अरेबिक, पर्शियन, चिनी आदि चाळीस भाषांमधून ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या दोन लक्ष बारा हजार प्रती छापून प्रसिद्ध केल्या होत्या. सन १८०५ ते १८२५ दरम्यान मराठी भाषेत, देवनागरी लिपीत त्यांनी सेंट मॅथ्यूचे शुभ वर्तमान, बायबलचा नवा करार, जुना करार वगैरे १४ धार्मिक ग्रंथ प्रकाशित केले. सन १८१० साली केरी यांनी ‘अ डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ हा मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला. ६५२ पृष्ठांच्या या शब्दकोशात नऊ ते दहा हजार मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ दिला आहे. सन १८१४ साली ‘सिंहासन बत्तीशी’ हे संस्कृत पुस्तकाचे मराठीत भाषांतर त्यांनी प्रसिद्ध केले. या पुस्तकात राजा विक्रमादित्याच्या सिंहासनाच्या बत्तीस कथा ३२ पुतळ्यांच्या मुखातून वदवल्या आहेत. १८१६ साली ‘रघुजी भोसल्याची वंशावळी’ हे पुस्तक मराठी भाषेत आणि मोडी लिपीत लिहून मुद्रित केले.

‘लिखिलेल्या ४९ पृष्ठांपेक्षा अधिक मजकूराला मुद्रित करून प्रकाशन योग्य करणे ग्रंथ !’ अशी युनेस्कोने ग्रंथाची व्याख्या केलेली आहे. जगाचा विचार करता या व्यवसायास नवव्या शतकाच्या मध्यास चीनमध्ये सुरुवात झाली. तोपर्यंत ग्रंथाच्या नकला तयार होत असतं. मुद्रणामुळे ग्रंथाच्या प्रती निर्दोष व त्वरेने तयार करता येऊ लागल्या. यूरोपात पंधराव्या शतकात खिळामुद्रण सुरू झाले. सोळाव्या शतकात हा धंदा फ्रान्समध्ये स्थिर झाला आणि तेथून इंग्लंडमध्ये गेला. जगात, बांधलेल्या पृष्ठांच्या ग्रंथाचे अस्तित्त्व चौथ्या शतकापासून, रोमन युगापासूनच आढळते. सन १५०१ मध्ये आल्दो मानूत्स्यो या नागरिकाने ग्रंथाचा अवाढव्य आकार बदलून त्याला आजचा आकार आणला. प्राचीन ग्रंथ हस्तलिखित स्वरूपाचे, मोठ्या आकाराचे असत. थोलकाधीअर नावाच्या लेखकाचे थोलकाप्पियम हे पुस्तक २ हजार ५०० वर्षांपूर्वीचे जुने आहे. पूर्वी ग्रंथप्रकाशक असा स्वतंत्र व्यवसाय नव्हता. हस्तलिखितांच्या प्रती तयार करणारा ‘प्रकाशक’ असायचा. त्याच्या दुकानात कागदाच्या अथवा कातड्याच्या मोठमोठ्या गुंडाळ्यांवर ग्रंथ लिहिले जात असे. कालांतराने चर्च, विद्यापीठे, गिल्ड्‌स, मुद्रक व प्रकाशक अशी प्रकाशन व्यवसायाची स्थित्यंतरे क्रमाक्रमाने होत गेली. अनेक शतकांच्या मार्गक्रमणेतून पुस्तकांची मागणी वाढू लागली. लेखकांना लोकप्रियता मिळू लागली. अठराव्या शतकाच्या अखेरीस पुस्तकविक्रेते आणि ग्रंथालये यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये दरवर्षी सु. ९३ ग्रंथ प्रसिद्ध होत. पूर्वीच्या काळी ग्रंथनिर्मितीच्या खर्चासाठी राजेराजवाडे, सरदार, धनिक यांची मदत घ्यावी लागे.

खरतरं ग्रंथप्रकाशन हे अतिशय कठीण, कौशल्याचे व जिकीरीचे काम ! ग्रंथाचा विषय, व्याप्ती, पृष्ठसंख्या, त्याला मिळणारे ग्राहक, त्याचे रास्त मूल्य यांचा विचार प्रकाशकाला करावा लागतो. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ग्रंथप्रकाशन हा भारतात व्यवसाय होऊ शकला नाही. सन १८६७ मध्ये कार्यवाहीत आलेल्या ‘द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अॅक्ट’ मुळे ग्रंथनिर्मिती व्यवहारास आकार प्राप्त होत गेला. स्वतंत्र महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ग्रंथालय विकास योजनेमुळे ग्रंथालयांची संख्या वाढली. ब्रिटिश सत्ता भारतात पक्की झाल्यानंतर राज्यकारभार चालविण्यासाठी दुय्यम दर्जाच्या नोकरवर्गाची गरज निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी शाळा उघडल्या. या शाळांतून देशी भाषा हेच माध्यम होते. सन १८३३ मध्ये ‘मेकॉले मिनिट’ प्रसिद्ध झाले. शाळेतील देशी भाषांचे स्थान इंग्रजीला मिळाले. या शाळांमुळे ग्रंथप्रकाशनास चालना मिळाली. महाराष्ट्रात छापून तयार झालेले पहिले पुस्तक ‘पंचोपाख्यान’ होय. ते सन १८२२ मध्ये बाँबे करिअर छापखान्यात छापून प्रसिद्ध करण्यात आले होते. सन १८४७ साली लेखाधिकार कायदा (इंडियन कॉपीराइट ॲक्ट) संमतझाला, ग्रंथकारास संरक्षण मिळाले. सन १८६७ च्या ग्रंथनोंदणी कायद्यामुळे सरकारकडे पुस्तके येऊ लागली. १८६७ च्या पूर्वीच्या प्रकाशित ग्रंथास ‘दोलामुद्रिते’ / ‘आद्यमुद्रिते’ म्हणत. दोलामुद्रितांच्या काळात मराठी भाषेत १२८ प्रकाशकांनी ४३५ ग्रंथ प्रकाशित केले होते. त्याहीपूर्वी प्रकाशने शिलामुद्रित असत. सन १८६७ नंतर खिळामुद्रण सुरू झाले. टॉमस ग्रॅहॅम यांनी या मुद्रणकलेची सुरुवात केली. मराठीतील पहिले पंचांग सन १८५८ मध्ये गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर छापले. कॅरी, एल्‌फिन्स्टन, कँडी, जार्व्हिस, मोल्सवर्थ या ब्रिटिशांनी मराठी भाषेवर प्रेम केल्याचे दिसते. याकाळात परशुरामपंत गोडबोले यांचे नवनीत (१८५४), बाबा पदमनजी यांची यमुनापर्यटन (१८५७) कादंबरी, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे साक्रेतिसाचे चरित्र (१८५२), अमरापूरकर यांचे प्रबोधचंद्रोदय (१८५१) नाटक ही मराठीतील काही नामांकित प्रकाशने होती. सन १७९५ मध्ये नाना फडणीस यांनी तयार केलेल्या श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या लाकडी ठशांपासून तो खिळामुद्रणापर्यंत ५० वर्षांत मराठी प्रकाशकांनी बरीच मजल मारली. सन १८५९ च्या सुमारास गोविंद रघुनाथ केतकर यांच्या ज्ञानसागर शिळा छापखान्यात एका ग्रंथाच्या १५० प्रती निघत होत्या. भाषा समृद्ध करण्यासाठी कोशवाङ्‌मयही समृद्ध करण्याचा प्रयत्न मराठी पंडितांच्या मदतीने ब्रिटिशांकडून सुरु झाला. यातून डॉ. विल्यम कॅरी यांचा मराठी-इंग्रजी कोश (१८०५), बाळशास्त्रींचा मराठी-इंग्रजी कोश (१८२०), मोल्सवर्थ-कँडी यांचा मराठी-इंग्रजी कोश (१८३१), रत्नकोश (१८६१), हंसकोश (१८६३) निर्माण झाले. मुद्रक, प्रकाशक व विक्रेते या घटकांनी एकत्र यावे. कोणाकडून या मंडळींवर अन्याय झाल्यास त्याचा प्रतिकार करता यावा, या हेतूने त्या काळात प्रिंटर्स, पब्लिशर्स, बुकसेलर्स असोसिएशन या नावाची संस्था आद्य मराठी मुद्रक-प्रकाशक जावजी दादाजी यांनी सन १८९३ ला स्थापन केली. न्या. रानडे यांनी १८७४ मध्ये मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. केशव भिकाजी ढवळे, जगत्‌हितेच्छू प्रकाशनाचे गोंधळेकर, कर्नाटक प्रकाशनाचे मंगेश नारायण कुलकर्णी, दामोदर सावळाराम यंदे, मनोरंजक ग्रंथ प्रकाशन मंडळी, तुकाराम पुंडलिक शेटे आदिंनी प्रकाशन व्यवसायासाठी प्रयत्न केले. मनोरंजन मासिकाचे संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र, गणेश महादेव वीरकर मंडळी मराठी प्रकाशन क्षेत्रात कार्यरत होती. मात्र मराठी जनतेने ग्रंथखरेदीच्या बाबतीत उदासीनवृत्ती दाखविल्यामुळे त्यांना फारसे यश मिळाले नाही.

सन १८९४-९५ च्या डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रॅन्स्लेशन सोसायटीच्या अहवालात, ‘मराठी भाषेत ग्रंथ कमी होतात. याचे कारण मराठे लोकांत ग्रंथकर्तृत्व-शक्ती कमी आहे हे नाही, तर ग्रंथवाचनाची अभिरुची कमी आहे हे होय. म्हणून उपयुक्त व मनोरंजक ग्रंथ तयार करून ते अल्प किंमतीने लोकांस विकत देता येतील, अशी तजवीज केली पाहिजे’ अशी नोंद आढळते. रियासतकार सरदेसाई, नाथमाधव, पारगावकर, सावरकर, खांडेकर वगैरेंचे वाङ्‌मय सन १९२० ते १९४० दरम्यान गणेश महादेव आणि कंपनी यांनी प्रसिद्ध केले. सन १९१४ मध्ये के. भि. ढवळे प्रकाशन संस्था स्थापन झाली. ग्रंथनिर्मिती, लेखकांची निवड, सचोटीचे व्यवहार आणि मराठी वाङ्‌मयाबद्दलचे प्रेम ही या संस्थेची वैशिष्ट्ये होती. मराठी ग्रंथांना रूपसंपन्न करण्याचे याच संस्थेला जाते. स्वातंत्र्योत्तर काळात माध्यमिक व उच्च अभ्यासक्रमांत मराठीला स्थान मिळू लागले. मराठी ग्रंथप्रकाशनांची संख्या वाढली. भाषेच्या दृष्टीने विचार करता प्रकाशनाबाबत सन १९६४ साली इंग्रजी व हिंदी या भाषांच्या खालोखाल मराठीचा क्रम राहिला आहे. सन १९७० मध्ये मराठीत १,५१४ पुस्तके प्रसिद्ध झाली. देशमुख आणि कं., पुणे काँटिनेंटल प्रकाशन, पुणे व्हीनस प्रकाशन, पुणे मौज प्रकाशन, मुंबई मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई पॉप्युलर प्रकाशन, मुंबई ठाकुर आणि कं., अमरावती सुविचार प्रकाशन, नागपूर व उद्यम प्रकाशन, नागपूर ही त्यावेळची काही प्रमुख नावे होतं. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने, काही खाजगी संस्थांनी श्रेष्ठ ग्रंथांस पारितोषिके देऊन या व्यवसायाला उत्तेजन देण्याचा अभिनंदनीय कार्यक्रमही चालू केला. ग्रंथालयासाठी स्वतंत्र खाते स्थापन झाले. साक्षरता प्रसारासाठी खेडेगावापर्यंतही ग्रंथांचे लोण पोहोचविण्यात आले. विश्वविद्यालये, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, भारत सरकार वगैरे संस्थाही उपयुक्त ग्रंथांस अनुदान देऊ लागल्या. दुर्दैवाने इतक्या प्रयत्नातून सावरूनही आजचा मराठी वाचक तितका जागरूक झालेला नाही. ग्रंथालयासारख्या उपक्रमाबाबत मराठी माणूस मागे आहे. वाचकांना ग्रंथ विकत घेणे परवडावे म्हणून लोकप्रिय ग्रंथांच्या स्वस्त आवृत्त्या, प्रकाशनपूर्व सवलत-योजना, खंडशः पैसे देऊन ग्रंथ-खरेदी करण्याची योजना यांबाबत अलिकडे मराठी प्रकाशकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. जगात युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था, ग्रंथप्रदर्शने, परिसंवाद, चर्चासत्रे वगैरेच्या साहाय्याने या धंद्याची बैठक भक्कम पायावर उभी करीत आहेत. पश्चिम जर्मनीत फ्रँकफुर्ट येथे दरवर्षी भरत असलेले आंतरराष्ट्रीय ग्रंथ-प्रदर्शन, दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरणारे वर्ल्ड बुक फेअर आज प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही ग्रंथ प्रदर्शने होतात. त्यांचे प्रमाण घटलेले आहे. ग्रंथ हे शिक्षणाचे प्रमुख माध्यम हे तत्त्व गृहीत धरून सरकारने साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ माध्यमातून प्रयत्न सुरु केले. सन १९७३ दरम्यान ग्रंथमुद्रणास योग्य अशा कागदाचे दुर्भिक्ष्य, छपाईच्या दरातील वाढ यांमुळे पुस्तकांच्या किंमती वाढल्या आणि वाढत्या महागाईमुळे विक्री कमी झाली. भारतातील आजच्या बहुतेक प्रकाशन संस्था व्यक्तिगत मालकीच्या आहेत. भारतातील इंग्रजी, संस्कृत भाषांतील ग्रंथांना परदेशांतील वाचनालयांतून मागणी आहे.

पुण्याचा विचार करता शनिवार पेठ, नारायण पेठ हा भाग मुख्यत: मुद्रण, छपाई क्षेत्राने व्यापलेला आहे. याच भागातील सदाशिव पेठेमध्ये शनिपारजवळ फिरताना ‘दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन’ची इमारत दिसते. पुण्यात सन १९१० च्या दशकात प्रिंटिंग क्षेत्र वेगाने विकसित होत असताना कागदटंचाई, प्रशिक्षित मनुष्यबळाची वानवा निर्माण झाल्याने या क्षेत्रातील काही ध्येयवादी व्यक्तींनी एकत्र येऊन १९ मे १९१९ या दिवशी पुणे मुद्रक संघाचे हे रोपटे लावले होते. आता या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. महाराष्ट्रात सन १९७०-८० च्या दशकापर्यंत पुण्या-मुंबईसह औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक शहरात मोजके प्रकाशक कार्यरत होते. महाराष्ट्रभर विद्वान लेखकांची मांदियाळी होती. वाचकप्रेम अनुकरणीय होतं. प्रकाशनविश्व जोरात कार्यरत होतं. नंतरच्या कालखंडात हळूहळू नवनवीन प्रकाशन संस्था उदयाला येत गेल्या. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी शासनाने सकारात्मक योजना राबवल्या. विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत अनेकांनी प्रकाशन संस्था उभारल्या. एकविसाव्या शतकात पुस्तके प्रकाशित करण्याबाबतचा प्रकाशकांचा दृष्टीकोन बदलला. माहितीपर, अनुवादित, वाचकाला वाचायला आवडणाऱ्या पुस्तकांचे प्रमाण वाढले. दुर्दैवाने सर्वच प्रकाशकांना भरपूर पैसा मिळतो हा चुकीचा समज या काळात अधिक दृढ झाला. प्रकाशन व्यवसायातील नैतिकतेसंदर्भातील अनेक बाबी ठळकपणे चर्चिल्या जाऊ लागल्या. शाळांमधील ग्रंथालयांच्या खरेदीवर शासकीय अनुदानाचा परिणाम होत गेला. कमी-जास्त किंमती, खरेदीतील अधिक सवलती यामुळे काही प्रकाशन संस्था डबघाईला आल्या. विविध कारणांमुळे ग्रंथालयामध्ये दर्जेदार पुस्तके मिळणे दुर्मीळ झाले. ग्रंथालयांच्या खरेदीत गुणात्मकता असायला हवी. ते सामाजिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे. असे मुलभूत सिद्धांत अडगळीत गेले. परिणामस्वरूप ग्रंथालयापासून वाचक दुरावला. या साऱ्यावर सारासार विचारमंथन होण्यासाठीच या संमेलनाचे प्रयोजन असावे. आजही महाराष्ट्रात ‘एक लेखक एक प्रकाशक’ या संकल्पनेवर कार्यरत असलेले लेखक आहेत. अगदीच नाही म्हणायला गेली काही दशके ‘एक लेखक एक प्रकाशक’ या विचारानुसार कार्यरत लेखक-प्रकाशक आपल्याला भेटतात. त्यांना सर्वांसमोर आणल्यास लेखक-प्रकाशक संवाद समन्वयाचे गुपित उलगडता येऊ शकेल.

अडचणींचा डोंगर उभा असला तरीही, सातत्याने उत्तमोत्तम पुस्तके काढणारे प्रकाशक आपल्या व्यक्तिगत वाचकांच्या आणि ग्रंथ प्रदर्शनांच्या बळावर भाषिक सामर्थ्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न पूर्वीपासून करताहेत. पूर्वी प्रकाशक पायाला भिंगरी लावून सर्वदूर प्रवास करत. चांगल्या मराठी प्रकाशकांची चांगली पुस्तके आजही ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचत असतात. चालणारी पुस्तके वर्षभर चालतात. परंतु धावणाऱ्या दोन पुस्तकांसाठी प्रकाशकांना इतर दहा पुस्तकांची निर्मिती करावी लागते. अशा पुस्तकांनाही ग्रंथ प्रदर्शनातून उठाव मिळतो. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनाचा चांगला फायदा होतो. दुर्दैवाने आज राज्यात ग्रंथ प्रदर्शनासाठी लागणाऱ्या हॉलची वाढलेली भाडी, वाहतूक व प्रवास खर्च, कामगारांचे पगार, मुक्कामाचा खर्च, मंडप किंवा अन्य सुविधांचा खर्च आणि तुलनेने विक्रीच्या व्यस्त प्रमाणामुळे ग्रंथ विक्रेत्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचे गणित बिघडलेले दिसते. अनेक प्रकाशकांनी बाहेरगावची ग्रंथ प्रदर्शने बंद केली आहेत. खरतरं ही प्रदर्शने गावोगावची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम करतात. त्यामुळे शासनाने अशा उपक्रमांना सढळ हाताने मदत करायला हवी आहे. म्हणूनच या संमेलनाच्या निमित्ताने भरलेला ‘ग्रंथमहोत्सव’ अधिक महत्त्वाचा आहे. आज जगभर असलेल्या महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून मराठी माणसांपर्यंत वस्तूंप्रमाणे मराठी पुस्तकांची निर्यात होण्याच्या मुद्द्यावर विचार होणे गरजेचे आहे. शासकीय ग्रंथप्रदर्शनात प्रकाशकांचा सहभाग आणि वाचकांची सोय पाहिली जायला हवी. ‘आयएसबीएन’ क्रमांकाची उपलब्धी सहज व्हायला हवी. लेखक-प्रकाशकांना सरकारी विश्रामगृहांत मुक्कामासाठी सवलत मिळायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगणकीय मराठी टंकलेखन युनिकोड वापरासाठी शासनाने पुढाकार घ्यायलाच हवा आहे. अलिकडे जवळपास प्रकाशक लेखकांकडून टाईप केलेला मजकूर मिळावा असा आग्रह करीत असतात. आजच्या युगात ‘युनिकोड वापर कार्यशाळा’ ही एक मोठी आवश्यकता म्हणून पुढे येते आहे.

ग्रंथाचे संपादन आणि मुद्रितशोधन हा या क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. परदेशातील प्रकाशकांकडे असणाऱ्या संपादकांप्रमाणे मराठीत आता ही पद्धत रूढ होते आहे. पत्रकार, त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आपल्या वृत्तपत्रे, नियतकालिकातील सदरांची पुस्तके काढण्याचे प्रमाण वाढते आहे. वाढत्या सामाजिक, राजकीय जाणीवांमुळे वैचारिक साहित्याचे दालन फुलू लागले आहे. मराठी पुस्तकांना मागणी आहे. वाचकांना वैविध्यपूर्ण पुस्तके हवी आहेत. नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुस्तके नव्या, तरुण वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरजही वाढली आहे. कॉपीराइट हा अनेक ठिकाणाचा कळीचा मुद्दा आहे. हक्क अबाधित असा उल्लेख नसला तरीही कॉपीराइट असतोच. लेखकाच्या मृत्यूनंतर ६० वर्षांपर्यंतच हा कायदा लागू होतो. नव्याने लेखनादि क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या पिढीसाठी या गोष्टी नीट समजून घेण्याचे हे संमेलन योग्य व्यासपीठ आहे. मराठी साहित्याचे चांगले मार्केटिंग व्हायला हवे आहे. फेसबुक, व्हॉट्सअप आदि तंत्रज्ञानामुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. ‘वाचक नाहीत’ ही तक्रार चुकीची आहे. ई-बुक, ऑडिओ बुक हा मूळ छापील पुस्तकांना पर्याय नसून त्या नवतंत्रज्ञानाने युक्त संधी असल्याचे समजून घ्यायला हवे आहे. बनावट पुस्तकांचा (पायरेटेड) मुद्दा सर्वत्र अत्यंत गंभीर आहे. पायरेटेड पुस्तके कशी रोखावीत ? यावर आजही ठोस उत्तर मिळालेले नाही. लेखक आणि प्रकाशक नात्याचे अनेक पैलू राहिलेले आहेत. या दोनही ठिकाणी विश्वास, आपुलकी आणि सौहार्द समानतेच्या मांडवाखाली आणण्याचा प्रयत्न करणारे हे संमेलन आहे.

पुस्तक विकलं जाण्यासाठी आम्ही नवोदितांनी, ‘लेखक लिहितो आणि प्रकाशक छापतो’ यामधला पुस्तकाचा निम्मा शिल्लक प्रवास समजून घेण्याची गरज आहे. तो समजला तर चांगल्या पुस्तकांची निर्मिती शक्य आहे. पूर्वी लेखक, संपादक आणि प्रकाशक यांच्यात लेखनाविषयी चर्चा होतं. योग्य आणि अचूक लेखन वाचकापर्यंत पोहोचवायची कळकळ त्यामागे असायची. आताची पिढी या साऱ्याकडे व्यवसाय म्हणून अधिक बघते. कधीकधी लेखनाची गुणवत्ता चांगली असते, पण विक्रीमूल्य कमी असतं. तेव्हा प्रकाशकीय अंदाजाचा कस लागतो. आजही मराठी वाचक पुस्तकाच्या किंमतीचा खूप विचार करतो. तुलनेने अधिक किंमतीची इंग्रजी विकत घेतली जातात. सध्या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल घडलेत. संगणकायुगाने अलिकडे प्रिंट ऑन डिमांड पद्धत जन्माला घातली. साहित्यिक आणि वाचक जवळ आले आहेत. वितरण यंत्रणा बदलत आहेत. सोशल मीडिया, तंत्रज्ञानामुळे लेखकाला वाचकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. इंटरनेट, ईमेल, फेसबुक, व्हॉटस्अप, गुगलप्लस, ई-बुक, डिजिटल प्रिंटिंग आदि तंत्रज्ञानामुळे हे क्षेत्र पूर्णतः ढवळले गेले आहे. आज वाचकांची प्रगल्भता कमालीची वाढते आहे. पुढचा काळ कागदी प्रकाशकांचा नाही. असे काही ठिकाणी म्हंटले जाते, त्यात सर्वथा सत्यता नसावी. आज महाराष्ट्रात राजहंस, मॅजेस्टिक, मेहता पब्लिशिंग हाऊस, पॉप्युलर, मौज, ग्रंथायन, वरदा बुक्स, प्रगती अभियान, उत्कर्ष, रोहन, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, काँटिनेंटल प्रकाशन, मनोविकास, अनुबंध, देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि., परचुरे प्रकाशन, लोकवाङमय गृह – मुंबई, साकेत, स्नेहवर्धन, मधुश्री, विश्वकर्मा, मायबोली, रसिक आदिंसह सुमारे पाचशे हून अधिक प्रकाशन संस्था कार्यरत असाव्यात. तरुण वर्ग वाचत नाही, ही टीका अन्यायकारक आहे. तरुण वर्ग वाचत असतो. त्यांच्या वाचनाचे विषय, माध्यमं बदलत आहेत. त्यांच्या पसंतीस उतरतील असे विषय, पुस्तकंच येत नसतील तर ते काय वाचणार ? असा एक प्रश्न पुढे येत असतो. दुर्दैवाने जुनी जड वैचारिक पुस्तकं आजची पिढी वाचत नाही. आजचा वाचक चार पुस्तकं चाळून, बघून, त्यावर नजर टाकून मग पुस्तक विकत घ्यायचं की नाही ते ठरवतो. प्रकाशकांनी वाचकांपर्यंत पोहोचायला हवं हे सत्य आहे. प्रकाशकांना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता ऑनलाईन माध्यमांचा वापर करावा लागतो आहे. भविष्यात प्रकाशन संस्थांना पुस्तकांच्या मुद्रित कॉपींबरोबर ई-बुक्सही तयार करावी लागणार आहेत. मराठीत अनुवादित पुस्तकांचं प्रमाण आणि मागणीही वाढते आहे

आज लेखक स्वयं-प्रकाशनाबद्दल पाऊले उचलताना दिसतात. काही भक्कम यशही मिळवतात. अशांसाठी किमान लेखनाचे संपादन, पुस्तकाचा आकार, पुस्तकाचे मुखपृष्ठ, छपाई, पुस्तक बांधणी, वितरण, कमिशन, आय.एस.बी.एन. आदि बाबींचा किमान विचार करायला हवा, याची जाणीव करून देणारे हे संमेलन आहे. आजही पुस्तक हातात पडलं की काही वाचक एका बैठकीत ते वाचतात. पुस्तकातल्या विषयाचा विचार करतात. काही वेळा त्यातल्या व्यक्तिरेखेत गुंततात. एखाद्या वाक्यात हरवतात. हे सगळं लेखकाला अनुभवायला मिळतं. वर्तमान युगात, याही पुढे जाऊन ‘लेखक लिहितो आणि प्रकाशक छापतो’ यामधला पुस्तक निर्मितीचा प्रवास समजून घेतला तर नवलेखकांकडून अधिकाधिक दर्जेदार ग्रंथ निर्मिती शक्य होईल. मराठी ग्रंथनिर्मिती क्षेत्रात चैतन्य प्रस्थापित होईल.

000

-धीरज वाटेकर मो. ९८६०३६०९४८

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.