Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिल्ह्यातील नवीन होत असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश
जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यात होत असलेली सर्व कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे तसेच नवीन रस्ते दर्जेदार असावेत यासाठी त्यांची गुणवत्ता चाचणी करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा नियोजन समिती मार्फत पी डब्ल्यू डी, पोलीस विभाग, नाविम्यापूर्ण, सिव्हील हॉस्पिटल, डीन, अपारंपरिक उर्जा, व इतर मंजूर करण्यात आलेल्या 141 कोटी 63 लाखांच्या निधीतून 507 कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहरातील 100 कोटींच्या कामांबाबत सविस्तर आढावा अधीक्षक अभियंता पी.पी. सोनवणे यांनी सादर केला.
या बैठकीस आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनावणे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.
जिल्ह्यातील 68 मोठ्या विकासकामांपैकी 40 पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. रामानंद पोलीस स्टेशन पूर्णत्वास येत असून 10 पोलीस चौक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पशुवैद्यकीय विभागाच्या 16 पैकी 13 इमारतींची कामे अंतिम टप्प्यात आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्मारकाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
महत्त्वाची प्रकल्पे प्रगतीपथावर
महाराष्ट्रातील पहिले पशु रेतन केंद्र – जिल्हा नियोजन निधीतून हे अभिनव केंद्र उभारले जात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे*. भरोसा सेल इमारत, संविधान भवन बांधकाम, बहिणाबाई स्मारक, बालकवी ठोंबरे स्मारक, वारकरी भवन*-राज्यातील अनोख्या वारकरी भवनाच्या बांधकामालाही गती मिळाली असून लवकरच हे प्रकल्प पूर्ण होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा कायापालट
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय हे ब्रिटिशकालीन वारसा इमारतींपैकी एक आहे. त्यामुळे त्याचा हेरिटेज दर्जा कायम ठेवत सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेरिटेजच्या नियमांचे पालन करत कार्यालयाचे नूतनीकरण होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील परिसर हिरवाईयुक्त असा विकसित करण्यात येणार असल्याचे अधिक्षक अभियंता श्री. सोनावणे यांनी सांगितले. या सर्व प्रकल्पांच्या वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ततेसाठी संबंधित विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
शेळगाव बॅरेज प्रकल्पातून पहिल्यांदाच सुटणार आवर्तन – २५ गावांना मोठा दिलासा
जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच आवर्तन सोडले जाणार आहे. सध्या 67% पाणीसाठा उपलब्ध असल्याने जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा तालुक्यातील 25 गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे यांना तात्काळ कार्यवाही करून पुढील दोन दिवसांत पाणी सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातील पुलांचे काम, भूसंपादन आणि बुडीत क्षेत्रातील अनुषंगिक कामांना तृतीय सुप्रमा मिळण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले.
या बैठकीला आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (व्हीसीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीची कार्यवाही
सध्या जिल्ह्यात अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला त्वरित पाणीपुरवठ्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः धरणगाव, जळगाव आणि यावल काठच्या गावांना तातडीने पुरेसा पाणीपुरवठा होईल, याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.
“जनतेच्या गरजा लक्षात घेऊन प्रशासनाने आवर्तन सोडण्याचा त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईमुळे त्रास होऊ नये, यासाठी शासन वचनबद्ध आहे. जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.” असे निर्देश त्यांनी दिले.
गावकऱ्यांना दोन महिन्यांचा दिलासा
शेळगाव बॅरेज प्रकल्पातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयामुळे परिसरातील 25 गावांना सलग दोन महिने पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने यासाठी तातडीने कार्यवाही सुरू केली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे आणि कार्यकारी अभियंता कामेश पाटील हे नियोजन करत आहेत.
या गावांना होणार थेट फायदा
सध्या 67.50 द.ल.घ.मी. (61.15%) पाणीसाठा असून, आवर्तन सोडल्यानंतर प्रकल्पात 25.00 द.ल.घ.मी. (21.00%) पाणी शिल्लक राहणार आहे. 60 ते 70 दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होणार आहे.
फायदा होणारी गावे:
जळगाव तालुका: आसोदा, भादली, ममुराबाद, शेळगाव, तुरखेडे, आमोदे, भोकर, कानसवाडे, आवार, घार्डी, भोलाणे, विदगाव, धानोरे, सुजदे, डीकसाई, करंज, लिधुर, किनोद
यावल तालुका: टाकरखेडे, भालशिव, शिरागड
चोपडा तालुका: पुनगाव, मितावली, पिंप्री, वडगाव, वटार सुटकार, खेडी, भोकरी, कोळंबे, सनफुले, कठोर, कुरवेल, निमगव्हाण, तावसे, खाचणे
धरणगाव तालुका: धरणगाव शहर, नांदेड, पिंप्री, पथराड या निर्णयामुळे गावकरी आणि शेतकरी संतोष व्यक्त करत असून त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प तृतीय सुप्रमा मिळाल्यास कामांना येणार गती
शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातील पुलांचे काम, भूसंपादन, बुडीत क्षेत्रातील रस्ते, कडगाव-जोगलखेडा उंच पूल, शेळगाव-बामनोद उंच पूल, तसेच यावल उपसा सिंचन योजना यांसारख्या अनुषंगिक कामांसाठी तृतीय सुप्रमा मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
तृतीय सुप्रमा प्रस्ताव तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांना 6 ऑगस्ट 2024 रोजी तांत्रिक तपासणीसाठी सादर केला असून, मंजुरी मिळाल्यास या कामांना गती मिळणार आहे.
बळीराजा जलसंजिवनी योजनेअंतर्गत यावल उपसा सिंचन योजनेस शासनाने 12 जुलै 2024 रोजी तत्त्वतः मान्यता दिली असून, तृतीय सुप्रमा प्रस्तावात योजनेचा समावेश केला असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
००००
०००