Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘पिफ २०२२’मध्ये रंगला जुन्या-नव्या विषयांचा संवाद

6

पुणे, दि. ४ मार्च – ‘ओटीटी हे खूप चांगले सर्जनशील माध्यम आहे. त्याचा प्रेक्षक आणि चित्रपट तयार करणाऱ्या दोघांनाही उपयोग होत असल्याचे मत गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.

पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (‘पिफ २०२२’) मध्ये महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जावेद अख्तर यांच्याशी अनेक जुन्या-नव्या विषयांवर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अख्तर म्हणाले, “काही विषय असे असतात, की जे दोन तासांच्या चित्रपटातून मांडता येत नाहीत. त्यासाठी अनेक भाग गरजेचे असतात. अशा वेळी ओटीटी या माध्यमातून अनेक मोठे विषय दाखवता येतात. ओटीटीमुळे खूप बोल्ड विषयांना हात घालता येतो. त्यामध्ये अनेक प्रयोग करता येतात. या पिढीकडे मोबाईल सारखी साधने असल्याने ते या पिढीचे माध्यम आहे.”

यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना देखील अख्तर यांनी दिलखुलास उत्तरे दिली. बदलता चित्रपट या विषयावर बोलताना अख्तर म्हणाले, की ५० च्या दशकातील नायक हा कामगार वर्गातून येणारा होता मात्र ९० च्या दशकात नायक हा कामगार वर्गातील नव्हता. त्याला या देशातील सामाजिक राजकीय परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. आता पुन्हा गोष्टी बदलत आहे. छोट्या गावांतून चित्रपट येत आहेत. त्यामध्ये भारतातील या छोट्या गावांचे चित्रण आहे आणि हे चित्रपट मोठ्या शहरातील लोक मल्टिफ्लेक्समध्ये बघत आहेत. ते म्हणाले, “९० च्या दशकात परिस्थिती बदलली. आत्ताच्या पिढीच्या गोष्टी बदलल्या, त्यांना प्रश्न पडू लागले की आम्ही कोण आहोत. त्यांची जिज्ञासा त्यांना पुढे घेऊन गेली. या पिढीचे सामाजिक भान खूप चांगले आहे. आता बदलत्या वेळेप्रमाणे चित्रपट अधिक चांगले होत आहेत. मला भविष्याकडून आशा आहे.”

अख्तर म्हणाले, की आपण एक देश म्हणून चित्रपटांवर प्रेम करतो. ते प्रेम आपल्या हजारो वर्षांच्या अनेकविध कलांमधून आले आहे. आपण गाण्यांसह चित्रपट बघणे पसंत करतो आणि यामध्ये भाषा महत्त्वाची आहे. भारतामध्ये अनेकविध भाषा आणि कला आहेत आणि आपण त्याचा आस्वाद घेण्यासाठी भाषेच्या भिंती ओलांडून जायला हवे. अख्तर म्हणाले, “इंग्रजी आलेच पाहिजे पण मातृभाषेला पर्याय नाही. मातृभाषेशिवाय तुमचे अस्तित्व नाही. मातृभाषा येत नसेल, तर जमिनीशी तुमचे नाते संपते. आम्ही मुंबईत आल्यानंतर आम्हाला समजले की मराठीमध्ये किती समृद्ध ज्ञान आहे आणि माझ्यामते विजय तेंडुलकर हे भारतातील सर्वश्रेष्ठ नाटककार आहेत.”

हाच विषय पुढे नेताना अख्तर म्हणले, की ज्यांच्याकडे समृद्ध भाषा नसते ते लेखक चित्रपटात शिव्यांचा वापर करतात. ते भाषा नसल्याचे दारिद्र्य आहे. अख्तर पुढे म्हणाले, “आमच्या पिढीच्या प्रायोरिटी वेगळ्या होत्या. आम्ही संपत्ती मिळवण्याच्या मागे होतो. आम्ही कला संस्कृती आमच्या मुलांना शिकवल्या नाहीत. आमच्या भाषांमधील म्हणी, वाक्प्रचार, दोहे हे ज्ञान आहे, हे आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना दिलेच नाही.”

अख्तर पुढे म्हणाले, की आम्ही समाज म्हणून एकाच वेळी सर्वांत जुना आणि सर्वांत तरुण आहोत. हा समाज अनेक छोट्या मोठ्या अतिजहाल गोष्टी घडल्याने बदलत गोष्ट बदलत नाही. आमचे शेतकऱ्यांचे रक्त आहे आणि ते कट्टर नाही. लुटारू नाही. दोन तीन दशकांमध्ये काही घडले, की हा देश उध्वस्त होत नाही. तो पुढारलेला आहे आणि दोन-तीन दशकांपेक्षा मोठा आहे.”

आजच्या चित्रपटातील जातीयवाद आणि धर्मांधता याविषयी बोलताना ये म्हणाले, की ज्यांना आपल्या चित्रपटाशी नव्हे तर स्वतःचे आणि स्वतःच्या लोकांचे हितसंबंध जपायचे असतात, ते धर्मांधता असलेले चित्रपट बनवतात. ज्यांना आपले चित्रपट हिट आणि लोकप्रिय करायचे असतात ते असे करू शकत नाहीत. आणि ज्यांना आपले अस्तित्त्व दाखवायचे असते आणि ज्यांनी आयुष्यात काहीच केलेले नसते ते कोणतेही कारण काढून चित्रपटांना विरोध करत असतात.

सरकारने चित्रपटाला निधी देण्यापेक्षा ते प्रदर्शित कसे होतील, याकडे लक्ष दिले पाहिजे. जास्तीत जास्त चित्रपटगृहे तयार केले पाहिजेत. त्यामुळे चांगल्या चित्रपटांना फायदा होईल, असेही अख्तर म्हणाले.

यावेळी अख्तर यांनी आपला चित्रपट क्षेत्रातील प्रवास कसा सुरु झाला हेही यावेळी सांगितले. ते म्हणाले, “मी खरे तर दिग्दर्शक बनण्यासाठी मुंबईला आलो, पण लेखक झालो. मला गुरुदत्त यांच्याबरोबर काम करायचे होते, पण मी ऑकटोबर १९६४ मध्ये मुंबईत आलो आणि ४ दिवसांत गुरुदत्त यांचे निधन झाले.” आपल्यावर मदर इंडिया, गंगा जमना, जाल, श्री ४२०, गाईड, या चित्रपटांचा प्रभाव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.