Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पंचकुला, ८ (क्रीडा प्रतिनिधीता ताऊ देवीलाल स्टेडियमसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाच्या नजरा महाराष्ट्राच्या परफॉर्मन्सवर लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कुस्ती संघाने आज सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. ५५ किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलने (रा. बानगे, कोल्हापूर) सुवर्णपदक पटकावले. ५३ किलो वजनगटात कल्याणी गादेकर हिने रौप्य पदक मिळवले. ६५ किलो वजनगटात पल्लवी पोटफोटे (वडगाव दरेकर, दौंड, पुणे) हिने कांस्य पदकावर नाव कोरले.
महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांनी हरियानातील आखाडा चांगलाच गाजवला. ५५ किलो गटात वैभव पाटीलने केलेल्या कुस्त्या नेत्रदीपक ठरल्या. कल्याणीच्या कुस्त्यांनीही वाहवा मिळवली. मात्र, तिचे सुवर्णपदक थोडक्यात
हुकले.
अॅथलेटिक्स मैदानही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक मिळाले होते. उद्या पाच ते सहा पदके मिळण्याचा आशावाद प्रशिक्षक जयकुमार टेंबरे यांनी व्यक्त केला.
———–
४० सेकंदात चीतपट
हरियाना आणि महाराष्ट्राच्या मल्लांमध्ये नेहमीच टक्कर होत असते. याही स्पर्धेत टशन पहायला मिळाली. सुवर्ण आणि कांस्य पदकासाठी या दोन राज्यांच्या पैलवानांमध्ये लढती झाल्या. ५५ किलो वजन गटात फ्री स्टाईलमध्ये वैभव पाटीलच्या कुस्तीने वाहवा मिळवली. त्याची अंतिम कुस्ती हरियानाच्या सुरिंदरसोबत झाली. ही कुस्ती त्याने अवघ्या ४० सेकंदात चीतपट केली. सुरिंदरला डावपेच करण्यापूर्वीच वैभव कुस्ती करून महाराष्ट्राचे वैभव वाढवले. पहिल्यांदा दस्ती ओढून दोन गुण घेतले. आणि नंतर भारंदाज लावला आणि पट काढत त्याला चीतपट केले.
———–
कुस्तीसाठी विकली जमीन
कुस्तीत आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्राचेच खेळाडू वर्चस्व गाजवित आले आहेत. मराठवाड्यात थोडेफार मल्ल घडू लागले आहेत. मात्र, वाशिमसारख्या जिल्ह्यातून आलेल्या कल्याणी गादेकरचे कुस्तीतील राष्ट्रीय यश कौतुकास्पद आहे. गावात किंवा परिसरात कोणतीही तालिम नसताना तिने आतापर्यंत खेलो इंडियात दोन पदक उंचावली आहेत. कॅडेटच्या कुस्तीतही ती पदकविजेती आहे. तिच्या वडिलांनी कुस्तीसाठी शेतातच माती टाकून तालिम बनवली. याच तालमीत तिचे इतर भावंडेही सराव करतात. मुलींनी कुस्तीत पुढे जावे यासाठी, कल्याणीच्या वडिलांनी तिला हरियानात प्रशिक्षणासाठी पाठवले. तेथील खर्च आवाक्याबाहेर असल्याने आता ती साईचे अमोल यादव (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलींना कुस्तीत खुराक कमी पडू नये म्हणून तिच्या वडिलांनी आतापर्यंत जवळपास साडेचार एकर जमीन विकली आहे. त्यांची जिद्द आणि मुलांच्या मेहनतीमुळे कुस्तीत पदके मिळत आहेत. गादेकर कुटुंबियांची कहाणी फोगट भगिनींसारखीच आहे. साईच्या विभागीय संचालक सुश्मिता ज्योतिषी यांनीही कल्याणीच्या खेळाचे कौतुक केले.