Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पालखीमार्ग व पालखीतळांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यी भेट

3

पुणे, दि. ८: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली तसेच पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-सासवड-जेजुरी-नीरा या पालखीमार्गाला व पालखी तळ, विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, दौण्ड- पुरंदर उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, हवेली प्रांताधिकारी संदेश शिर्के, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक संजय कदम, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते, पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने, पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे मनपा क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

वारकऱ्यांना कोणत्याही असुविधांना तोंड द्यावे लागू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालखीमार्गावर आरोग्य सुविधा, पुरेसा औषध साठा, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, पाणी, वीज आदी सर्व सुविधा प्राधान्याने पुरवण्यात याव्यात. कोविड तपासण्यांची व्यवस्था करण्यात आली असून खबरदारी म्हणून जास्तीत जास्त नमुने घेण्यात यावेत, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी यावेळी दिले.

पालखीमार्गाच्या साईडपट्टया भरुन घेण्यासह खड्डे तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी मुरूम व अन्य पर्यायांचा वापर करुन डागडुजी करावी. हे काम कोणत्याही परिस्थितीत २० तारखेच्या आत पूर्ण करुन घ्यावे. दिवे घाटाचा टप्पा पार केल्यानंतर झेंडेवाडी विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांना मोठा विसावा घ्यावा लागतो. तेथील विसाव्याच्या लगतच्या शेतकऱ्यांनी संरक्षक जाळ्या (कंपाऊंड) केलेले आहे. त्या ठिकाणी वारकऱ्यांना विसावा घेता यावा यासाठी प्रशासनाने संबंधित खातेदारांशी संपर्क साधून व्यवस्था करावी.

सासवड पालखीतळ येथे पावसाचे पाणी साचते त्यामुळे या पालखीतळाची उंची वाढवण्याचे काम सुरू असून ते गतीने पूर्ण करण्याच्या सूचना सासवड नगरपरिषदेला दिल्या. कऱ्हा नदीवरील पुलाचे कामही पालखी प्रस्थानापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जेजुरी पालखीतळ नवीन तयार करण्यात येत असून त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार काम सुरू आहे. वाल्हे पालखीतळासाठी वेगळी प्रवेश कमान आणि प्रस्थान कमानीचे काम सुरू आहे. नीरा पालखीतळाच्या बाजूचे मजबुतीकरणाचे (पिचींग) काम सुरू आहे. नीरा नदीवरील पुलाचे संरक्षक कठड्यांची दुरूस्ती तात्काळ करुन घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

हवेली तालुक्यात ऊरुळी देवाची पोलीस ठाण्याजवळील विसाव्याच्या ठिकाणाची डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या. वडकी विसावा येथे स्थायी स्वरुपात सिमेंट काँक्रेटचे स्टेज बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते पालखीपूर्वी पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.

*घाटामध्ये मेडिकल वेस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई*
दिवे घाटामध्ये रात्री वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) टाकण्यात येत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने घाटामध्ये दिवसा तसेच रात्री गस्त घालण्यात यावी. असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात घटना आढळल्यास नागरिकांना तक्रार करणे सोपे जावे यासाठी घाटमार्गावर अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक रंगविण्यात यावेत, असेही निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.