Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सध्या कोपरखैरणे, तुर्भे, कोपरी, एपीएमसी आणि वाशी येथील वाहनचालकांना पनवेलकडे जाण्यासाठी गजबजलेल्या वाशीतील मुख्य रस्त्याने, मोराज सर्कल किंवा एपीएमसी मार्गाने जावे लागते. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाशी शहरातील वाहतुकीतून किमान १० ते १५ मिनिटांचा अधिकचा वेळ खर्च करून मार्गक्रमण करावे लागते. यावर उपाय म्हणून सायन-पनवेल महामार्गावरून पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी पाम बीच मार्गावर वाशी, सेक्टर-१७ मधील सिग्नल ओलांडल्यानंतर नाल्यावरून पनवेलच्या दिशेने एका आर्म ब्रिजची उभारणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणने (एमसीझेडएमए) परवानगी दिल्यानंतर सुमारे ९.५ कोटी खर्चाच्या या आर्म ब्रिजचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित ठेकेदाराला कार्यादेशही देण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. या आर्म ब्रिजमुळे वाशी शहरातून वाशी महामार्ग अथवा एपीएमसी मार्गे पनवेल-सीबीडीच्या दिशेने जाणाऱ्या चालकांच्या प्रवासाचा कालावधी किमान १० ते १५ मिनिटांनी वाचणार आहे.
वाशी आणि तुर्भे रस्त्यावरील गर्दी कमी व्हावी आणि वाहनचालकांना पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी जलद प्रवेश मिळावा यासाठी महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. २९० मीटर लांब आणि ६.५ मीटर रुंद असणाऱ्या या पुलाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाची (एमसीझेडएमए) परवानगी मिळाली असल्याचे संजय देसाई म्हणाले. एमसीझेडएमएने महापालिकेला बॉक्स कल्व्हर्ट डिझाइन न वापरता पिअर सिस्टीम (पाइल्स फाउंडेशन) वापरण्यास सांगितले आहे. त्यामुळे खाडीच्या पाण्याचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी, प्रस्तावित पुलाला खांबांचा आधार असेल. त्यानुसार आम्ही प्रकल्प बदलला असून या योजनेसाठी आयआयटीकडून त्याची तपासणी करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
२१ झाडे कापावी लागणार
या आर्म ब्रिज प्रकल्पामध्ये २१ झाडे बाधित होणार असल्याने त्यासंबंधीचा प्रस्ताव इंजिनीअरिंग विभागातर्फे वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) केलेल्या सूचनेनुसार आम्ही पिलर उभारणीमध्ये आणि जागांमध्ये बदल केला आहे. आर्म ब्रिज प्रकल्पातील पुलांचा मुख्य पाया पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण केला जाईल. त्यानंतर पुलावरील स्लॅबची कामे करण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली.