Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.२: शहरातील पाणी वापर नियंत्रित करण्यासाठी मनपाकडून करण्यात असलेल्या उपाययोजनांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. समान पाणी पुरवठा योजनेसह पाणीपुरवठ्याची अन्य सर्व कामे महानगरपालिकेने निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण करावीत, कोणताही विलंब होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, राहूल कुल, सुनील टिंगरे,मनपा आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते.
पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आपण स्वतः दर महा महानगरपालिकेकडून आढावा घेणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, पाण्याच्या टाक्यांची कामे महापालिकेने निर्धारित कालमर्यादेतच सप्टेंबर २०२३ पर्यंत तर पाईपलाईनचे काम जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे. समान पाणी पुरवठा प्रकल्पामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढवून ३३ टक्क्यांपर्यंत होईल, सर्वांना समान पाणी मिळेल.
ते पुढे म्हणाले, पाणी गळती थांबवण्यासाठी जुन्या पाईपलाईन बदलण्यात याव्यात. आवश्यकतेनुसार कर्मचारी संख्या वाढवून गळती रोखण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत. सोसायट्यांमधील पाणी गळतीची कामे तात्काळ पूर्ण करुन घ्यावीत. बांधकामाला, बागेला शुद्ध पाणी वापरले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे.
यावेळी मंजूर पाण्याचा कोटा, मागील वर्षातील पाण्याच्या स्त्रोत निहाय दैनंदिन पाण्याचा वापर, पाण्याचे अंदाजपत्रक, जल शुद्धीकरण केंद्रनिहाय झोन, समान पाणी पुरवठा प्रकल्प, टाक्या प्रकल्प, पाईपलाईन कामाची प्रगती व नियोजन, मीटर्स बसविण्याच्या कामाची प्रगती व नियोजन याबाबतचा आढावा घेण्यात आला.
शहरातील सोसायट्यांमध्ये होत असलेल्या पाणी गळतीवर लक्ष देण्याची गरज असून जायका प्रकल्पाच्या अंमलबजावणी बाबत मनपा अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते श्री. पवार विचारणा केली.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाण्याचा व्यापार होणार नाही याकडे लक्ष देत पाणी गळतीची अन्य कारणेही शोधावीत असे सांगितले.
बैठकीला महानगरपालिका व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सिंहगड रोडवरील उड्डाण पूलाचा आढावा
सिंहगड रोडवर होत असलेल्या उड्डाणपूलाच्या प्रतिकृतीची (मॉडेल) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्कीट हाऊस येथे पाहणी केली.
आमदार भीमराव तापकीर यांनी उड्डाणपूल बांधताना स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घ्याव्यात अशी मागणी केली. त्यास अनुसरून नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने आराखड्यात काही बदल करावयाचा झाल्यास अधिकचा निधी उपलब्ध करुन देऊ असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
उड्डाणपूल बांधताना पर्यायी रस्ते नागरिकांना उपलब्ध होतील याकडे लक्ष देऊन त्याठिकाणी असणारी खाऊ गल्ली, अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
****