Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

8

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांनी कृषी पर्यटनासाठी जिल्ह्यातील संधींना केले अधोरेखित

नाशिक : दि. (जिमाका वृत्तसेवा) : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतू आमचा शेतकरी बांधव हे सर्व पचवून मार्गक्रमण करत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज आत्मा प्रकल्पाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या. तर आमदार सीमा हिरे, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा कृषी अधिकारी रमेश‍ शिंदे, आदर्श महिला शेतकरी मनिषा इंगळे यांच्यासह कृषी विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.भुसे म्हणाले, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजित करण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्याने सर्वप्रथम केली, हे कौतुकास्पद आहे. आज या महोत्सवात महिला शेतकऱ्यांनी आवर्जून सहभाग नोंदवला असून शेतीमध्ये कुटुंबातील महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना कृषी योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे धोरण शासनाने अंगीकारले आहे. त्याचबरोबर घरातील महिलांचे नाव शेतीच्या ७/१२ उताऱ्यावर असल्यास लक्ष्मी योजनेचा लाभ महिला शेतकऱ्यांना घेता येणार आहे, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, सुमारे ६५ हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला असून, या योजनेत सहभागी होताना योजनेतील अटी व शर्ती काळजीपूर्वक पाहाव्यात. त्यासाठी हा अर्ज जाणीवपूर्वक मराठीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. ७२ तासांच्या आत साध्या कागदावर अर्ज केल्यास त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळते. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास अशा शेतकऱ्यांनाही मदत करण्याचा अत्यंत लाभदायक निर्णय शासनाने घेतला आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याचाही निर्णय घेऊन शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही या सर्व निर्णयातून शासनाने दिली असल्याची भावना यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात कृषी पर्यटनाला मोठा वाव संधी : डॉ. भारती पवार

यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे बोलताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कृषी पर्यटनासाठी जिल्ह्यातील वाव व संधींना अधोरेखित करताना सांगितले की, जिल्ह्यात विविध पिकांचे शेती उत्पादन घेण्यात येते. त्याचप्रमाणे कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना, कृषि तंत्रज्ञान, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव यांच्या जोरावर उत्पादन वाढीत चांगली भरारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी पर्यटनाला मोठा वाव व संधी उपलब्ध होणार असल्याने त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी केले.

कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांनी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आपला जिल्हा हा मुंबई सारख्या शहरास भाजीपाला पुरवठा करणारा जिल्हा असून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून बाजाराभिमुख व्यवसाय करण्याची सुरुवात  देखील  जिल्ह्यात करण्यात येत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष देऊन नाशवंत शेतमालाची प्रक्रिया करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा (PMFME) जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्यात येऊन शेतकऱ्यांनी लहान प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून शेतकरी बांधव हे आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, तृणधान्य, भरडधान्य जसे तांदुळ, बाजरी, ज्वारी, नागली, वरई या पिकांमध्ये पोषणमुल्ये जास्त प्रमाणात असल्याने त्यांचा दैनंदिन जीवनातला वापर वाढावा यासाठी 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याअनुषंगाने केंद्रीय अर्थसंकल्पातही मिलेट शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या महोत्सवात तृणधान्य पाककृतीतून लोकांपर्यंत त्याचे महत्त्व पोहोचविण्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलण्यात आली आहेत. केंद्र शासनाने अॅग्रीकल्चर इंन्फ्रास्ट्रक्चर फंड (AIF), द्राक्ष क्लस्टर अशा योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात. शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या असलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा, यासाठी कृषी विभागांमार्फत आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व माती पूजनाने करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी मनोगत व्यक्त करत महोत्सवास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान नियंत्रित शेती या घडीपत्रिका व पुरस्कारार्थी  शेतकऱ्यांच्या परिचय पुस्तिकेचे देखील विमोचन करण्यात आले. तसेच आदर्श शेतकरी व शेतकरी गटांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला.

000000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.