Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. १ : मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न आयोजित केले जाणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
मराठी भाषा विभागामार्फत मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया येथे दि. ४ ते ६ जानेवारी, २०२३ या कालावधीत “मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
संमेलनास परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे ४९८ मराठी मंडळातील प्रतिनिधी, ६२ परदेशस्थ उद्योजक, ४७० परराज्यातील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी, १६४ राज्यातील नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. तसेच, राजघराण्यातील मान्यवर, परकीय वकीलातीतील राजदूत इत्यादी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. केसरकर यांनी आज दिली.
उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे हा देखील हेतू असल्यामुळे, परेदशातील निमंत्रित उद्योजकांसमवेत संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे दि. ०६ जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग कल्पनांच्या आदान-प्रदानाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती यांचे सादरीकरण तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्ष घेणे हा देखील या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये लेझीम, ढोल, ताशांसारखे मराठी पारंपरीक खेळ, नाटक, लावणी, लोकसंगीत आदी मराठी पारंपरीक मनोरंजन, ग्रंथ प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल अशी मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे.
संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी जनांची अभिरुची लक्षात घेऊन संमेलनाच्या दि. ४, ५ व ६ जानेवारी २०२३ या दिवशी संध्याकाळी ६ नंतर अनुक्रमे चला हसू या, सांस्कृतिक संचालनालयाचा महासंस्कृती लोकोत्सव आणि मराठी बाणा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक संचालनालयाकडून सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विविध सांस्कृतिक पैलू सादर केले जातील. यातील ‘महाताल’ वाद्यमहोत्सवात १५ वेगवेगळ्या दुर्मिळ वाद्यांचे सादरीकरण ५० कलाकारांच्या माध्यमातून होणार आहे. तसेच, पुणेरी ढोल, नाशिक ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण व सर्व वाद्यांच्या तालावर महाराष्ट्र गीताचे सादरीकरण होईल ‘वाद्य जुगलबंदी’मध्ये ढोलकीची जुगलबंदी, संबळ व हलगी या वाद्यांचे एकत्रित सादरीकरण केले जाईल. ‘महासंस्कृती लोकोत्सव’मध्ये महाराष्ट्रातील भक्ती संस्कृती, जागर, आदिवासी संस्कृती, बंजारा नृत्य तसेच शिवकालीन लोककला, कोळीगीते, बोहाडा व सोंगी मुखवटे यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायं. ६ ते १० या वेळेतील कार्यक्रम सर्वसामान्य जनतेसाठी खुले ठेवण्यात आले आहेत.
000